पश्चिमी आफ्रिकेच्या गिनीच्या आखातावरील एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक. क्षेत्रफळ ५६,७८५ चौ. किमी. लोकसंख्या १९,५५,९१६ (१९७०). विस्तार ६° १०' ते ११° ५' उ. आणि १° ७५' पू. ते ०° २५' प. यांदरम्यान आहे. ह्याची उत्तर दक्षिण लांबी ५१२ किमी. असून जास्तीत जास्त रुंदी मध्यभागी १४४ किमी. आहे. ह्याच्या उत्तरेस अपर व्होल्टा, पूर्वेस दाहोमी व पश्चिमेस घाना हे देश असून दक्षिणेस गिनीचे आखात आहे. समुद्रकिनारा फक्त १४४ किमी. आहे. भूवर्णन टोगाच्या मध्यभागी घानातील आक्वापीम टेकड्यांपासून दाहोमीतील आटाकोरा डोंगरापर्यंत गेलेली शेन डू टोगो ही सरासरी ७०० मी. उंचीची डोंगररांग नैर्ऋत्य ईशान्य गेलेली आहे. तिचे सर्वोच्च शिखर पिक बौमान ९८६ मी. उंचीचे आहे. ह्या टेकड्यांच्या उत्तरेला आणि पश्चिमेला व्होल्टाची ओटी ही उपनदी वाहते. ती काही अंतरापर्यंत टोगो व घाना यांमधील सीमा आहे. तिला पूर्वेकडून कारा, मो इ. उपनद्या मिळतात. ओटी नदीच्या उत्तरेस ओटी वालुकाश्म पठार हा सॅव्हाना गवताळ प्रदेश आहे. अगदी वायव्येस ग्रॅनाइट आणि नीस यांचा अधिक उंच प्रदेश असून तेथेच दापांगो क्लिफ्स हा वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहे. मध्यवर्ती टेकड्यांच्या दक्षिणेस सु. ४३० मी. उंचीचा पठारी प्रदेश असून त्यावरून मोनो व तिच्या उपनद्या-आनीए व ओगू आणि हाहो, सीओ–वाहतात. या पठाराच्या नैर्ऋत्येस सु. ३० किमी. रुंदीचा व सरासरी ६० ते ९० मी. उंचीचा वाच्ची पठार हा जांभ्या दगडाचा प्रदेश आहे. त्याला लागून चिंचोळी किनारपट्टी असून ती पुळणी व खारकच्छयुक्त आहे. या अंतर्गत खारकच्छांपैकी लेक टोगो हे सर्वांत मोठे आहे. ही खारकच्छे पूर्वीच्या नद्यांच्या खाड्या असाव्यात. हवामान टोगो हा देश उष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात येतो. तेथे दक्षिणेकडे एप्रिल ते जुलै आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर असा दोन वेळा पाऊस पडतो. किनारी प्रदेशात सर्वांत कमी ६० ते ९० सेंमी. पाऊस पडतो. किनाऱ्यापासून सु. १०५ किमी. आत पालीमे विभागात सर्वांत जास्त ११२ सेंमी पाऊस पडतो. उत्तरेकडे पाऊस एकदाच एप्रिल ते जुलै सु. ७२ सेंमी. पडतो. बाकीच्या काळात उष्ण, कोरडे, धूलियुक्त हरमॅटन वारे प्रभावी असतात. येथील सरासरी तपमान २६° से. असते. ऑगस्टमध्ये डोंगराळ भागात सर्वांत कमी २०° सें. तपमान असते, तर उत्तरेकडे मार्च-एप्रिलमध्ये सर्वांत जास्त ३३° से. तपमान असते. सापेक्ष आर्द्रतेचे सरासरी प्रमाण उत्तरेस ४९% पर्यंत असते, तर दक्षिणेस ते ९५ % पर्यंत वाढत जाते. वनस्पती पूर्वी ह्या प्रदेशात घनदाट उष्ण कटिबंधीय अरण्ये होती. आता नद्यांच्या खोऱ्यांत व नैर्ऋत्येकडील जास्त पावसाच्या भागात ही अरण्ये आढळतात. दाट अरण्यांचे काही प्रदेश मध्यवर्ती डोंगराळ भागातही आहेत. इतर ठिकाणी येथील नैसर्गिक वनस्पती सॅव्हाना प्रकारची आहेत. पावसाळ्यात प्रदेश हिरवागार होतो, तर उन्हाळ्यात लहानलहान झुडपे व गवताशिवाय काही दिसत नाही. दक्षिणेकडील पठारी प्रदेशात गोरखचिंचेसारखे मोठे वृक्ष आढळतात. अरण्यांतून कठीण लाकूड, डिंक व पामची उत्पन्ने मिळतात. बहुतेक जमीन शेतीच्या दृष्टीने निकृष्ट आहे. समुद्रकिनाऱ्याकडे जाड गवताचा पट्टा आढळतो. खारकच्छांच्या दलदलींच्या भागात लव्हाळे व खारफुटी (मॅनग्रोव्ह-कच्छ वनस्पती) यांची दाटी झालेली दिसते. अरण्यांबरोबर वन्य श्वापदांची संख्याही कमी झाली आहे. उत्तरेकडे अजूनही हत्ती, सिंह, चित्ते दृष्टीस पडतात. तसेच हिप्पोपोटॅमस व मगरी ह्या नद्यांजवळ बऱ्याच आढळतात. सर्वसामान्यपणे सर्व भागात सर्व प्रकारची माकडे आढळतात. किनाऱ्याजवळील दलदलीच्या प्रदेशामध्ये विविध प्रकारच्या सापांची व सरड्यांची संख्या भरपूर आहे. सान्साने-मांग्गोजवळच्या चानागा अभयारण्यात रानरेडे, गाढवे, चार सुळ्यांचे रानडुक्कर, हरिण, मृग इत्यादींचे कळप आढळतात. पक्षी व कीटक विपुल आहेत. किनाऱ्याजवळ मॅकेरल, बास, सीब्रीम, रेडस्नॅपर, ट्रिगरफिश, डोरॅडो, रे, सोल इ. मासे सापडतात. शेवंडे व कोळंबी हे कवचधारी आढळतात. इतिहास बाराव्या ते चौदाव्या शतकांमध्ये नायजरच्या खोऱ्यातून इव लोक टोगोलँडमध्ये आले असावेत. सध्या टोगोत व जवळच्या घाना प्रदेशात ह्या लोकांची संख्या जास्त आहे. पंधराव्या ते सोळाव्या शतकांत पोर्तुगीज लोक आले व त्यांनी येथे गुलामांचा व्यापार सुरू केला. गुलामांच्या साहाय्याने त्यांनी किनऱ्याजवळच्या प्रदेशात नारळ, मका इत्यादींचे पीक काढण्यास सुरुवात केली. ते ह्या पिकांचा उपयोग आपल्या बोटीवरील खलाशांसाठी करीत असत. त्यानंतर १६२६ मध्ये फ्रेंच आले व त्यांनी ग्रँड पोपो व पेटिट पोपो येथे ठाणे मांडले; पण त्यांना तीव्र विरोध झाला. १७८७ मध्ये याची पुनरावृत्ती झाली. मग त्यांनी पॉर्टो सेगूरो येथे १८६५ ते १८८३ पर्यंत व्यापार केला. १८५६ मध्ये जर्मन लोकही ग्रँड पोपो येथे आले. १८८० नंतर त्यांनी बराच प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. ५ जुलै १८८९ रोजी टोगोगावच्या प्रमुखाशी डॉ. गुस्टाव्ह नाख्टिगल याने तह करून समुद्र किनाऱ्यावरील भाग घेतला. जर्मनांनी आपली राजधानी बागुदा येथे, नंतर झेबे येथे व १८९७ मध्ये लॉमे येथे केली. १८९७ मध्ये इंग्रज व फ्रेंच यांच्याशी त्यांचा सीमेबद्दल वाद व नंतर वाटाघाटी होऊन व्होल्टा नदीच्या उजवीकडील प्रदेश गोल्ड कोस्टच्या ताब्यात आला. यामुळे अडजा, वात्यी इ. लोक तीन देशांत विखुरले गेले. जर्मनांनी उत्तर भागातील देशही आपल्या ताब्यात घेतला व तेथे त्यांनी रस्ते व लोहमार्ग बांधले. आर्थिक व सामाजिक प्रगतीला सुरुवात झाली; पण लवकरच पाहिले महायुद्ध पेटले. फ्रेंचांनी व इंग्रजांनी टोगोचा ताबा घेतला. १९२२ मध्ये राष्ट्रसंघाचा महादिष्ट प्रदेश म्हणून हा भाग फ्रेंच व इंग्रज यांजकडे दिला गेला. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रज व फ्रेंच यांचेकडे टोगोलँड संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश म्हणून आला. ह्या दोघांनीही टोगोलँडचा भाग आपल्याकडे असावा, अशी संयुक्त राष्ट्रांकडे मागणी केली, तर १९४७ मध्ये एव्ही लोकांना एकाच राज्यात ठेवावे अशी त्यांनी मागणी केली. तसेच टोगोलँड हे एक राष्ट्र करावे अशीही मागणी पुढे आली. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत ९ वर्षेपर्यंत खितपत पडला. याला तद्देशीय लोकांतील दुही हेही एक कारण होते. ९ मे १९५६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली ब्रिटिश टोगोलँडमध्ये मतदान घेण्यात आले आणि त्यामध्ये ब्रिटिश टोगोलँडचा प्रदेश स्वतंत्र गोल्ड कोस्टमध्ये समाविष्ट असावा असे ठरले. २८ ऑक्टोबर १९५६ रोजी फ्रेंच टोगोलँडमध्ये लोकमत अजमावण्यात आले. त्यानुसार टोगोलँड प्रदेश विश्वस्त म्हणून फ्रेंचांकडे जावा असा जनतेने कौल दिला; पण हा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी मान्य केला नाही. २८ एप्रिल १९५८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली नवीन निवडणुका घेण्यात आल्या. ह्यात राष्ट्रीय संयुक्त संघाचा विजय झाला आणि त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. टोगो विधिमंडळातील ४८ जागा त्यांनी जिंकल्या आणि त्यांचा नेता सिल्व्हॅनस ऑलिंपो हा पंतप्रधान झाला. १३ ऑक्टोबर १९५८ मध्ये फ्रेंच सरकारने टोगोच्या नेत्याशी वाटाघाटी करून टोगोला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे असे ठरविले व २७ एप्रिल १९६० रोजी टोगो हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक अस्तित्वात आले. १३ जानेवारी १९६३ रोजी ऑलिंपोची हत्या झाली आणि निकोलास गृनिट्झ्की सत्तेवर येऊन मेमधील निवडणुकीने तो राष्ट्राध्यक्ष झाला. ३ जानेवारी १९६७ रोजी ले. क. एटिएन्ने इयाडेमा याच्या नेतृत्वाखाली लष्करी क्रांती होऊन संविधान स्थागित आणि विधिसभा बरखास्त झाली. तीन महिन्यांनी इयाडेमा राष्ट्रध्यक्ष झाला. त्याने मुलकी संविधान तयार करण्यासाठी एक समिती केली; परंतु १९६८ मध्ये तिने दिलेला मसुदा पुढे आला नाही. नंतर जनरल इयाडेमाने मुलकी कारभार अनिश्चित काळापर्यंत स्थागित केल्याचे जाहीर केले. स्त्रोत: मराठी विश्वकोश