क्लेमंट रिचर्ड अॅटली : (३ जानेवारी १८८३–८ ऑक्टोबर १९६७). ज्यांच्या कारकीर्दीत हिंदुस्थानला स्वातंत्र्य लाभले, ते ब्रिटनचे मजूरपक्षीय पंतप्रधान (१९४५–५१). पट्नी (लंडन) येथे जन्म. ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेऊन पुढे ते बॅरिस्टर झाले. शिक्षणानंतर त्यांनी वकिली न करता स्वतःला सामाजिक कार्याला वाहून घेतले. पहिल्या महायुद्धकाळात त्यांनी सैन्यात प्रवेश केला व १९१९ मध्ये ते मेजर म्हणून निवृत्त झाले. १९२२ मध्ये ब्रिटिश संसदेत निवडून आल्यानंतर १९२७ ते ३५ पर्यंत विविध समित्यांतून त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.

१९३५ ते ४० या काळात ते ब्रिटिश संसदेतील विरोधी पक्षाचे नेते होते. दुसऱ्या महायुद्धकाळात चर्चिल यांच्या संयुक्त मंत्रिमंडळात त्यांना उपपंतप्रधानपद देण्यात आले. अॅटली ब्रिटनते पंतप्रधान असताना हिंदुस्थानप्रमाणेच ब्रह्मदेश व सीलोन (श्रीलंका) या देशांनाही स्वातंत्र्य देण्यात आले. अॅटलींनी काळाची पावले ओळखली व या राष्ट्रांना स्वातंत्र्य देऊन ब्रिटनबरोबरचे त्यांचे पूर्वापार संबंध स्नेहाचे राखण्यास मदत केली. त्यांनी लिहिलेल्या समाजवादावरील पुस्तकांपैकी द विल अॅन्ड वे टू सोशॅलिझम (१९३५), द लेबर पार्टी इन परस्पेक्टिव्ह (१९३७), द ट्वायलाइट ऑफ एम्पायर (१९६२) ही प्रसिद्ध आहेत. त्यांचे अॅज इट हॅपन्ड (१९५४) हे आत्मचरित्रही खूप गाजले.

लेखक - आशा लिमये

स्त्रोत - मराठी विश्वकोश