परिचय महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार असा हा रायगड किल्ला महाड तालुक्यात आहे. रायगडावर रोजी शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि ते खऱ्या अर्थाने छत्रपती झाले. हा किल्ला म्हणजे हिंदवी स्वराज्याची राजधानी होता. आता त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आहे. होळीचा माळ, भवानी मंदिर, चित्त दरवाजा, खुबलढा बुरुज, महादरवाजा, मेणादरवाजा, राणीवसा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा, गंगासागर तलाव, नगारखाना, जगदिश्वर मंदिर, बारा टाकी, वाघदरवाजा, टकमक टोक, रामेश्वर मंदिर व शिवछत्रपती समाधी इत्यादी ठिकाणे तेथे आहेत. वाघ्या कुत्र्याचे स्मारक महाराजांचा होळी माळावरील सिंहासनाधीश्वर पुतळा दारूची कोठारे अशीही अनेक स्थळे बघण्यासारखी आहेत. कसे पोहोचाल? रायगडला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत. गडावर जाण्यासाठी रोप वेची व्यवस्था आहे. माथेरान पश्चिम घाटातले मुंबईजवळचे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणजे माथेरान. वाहनांना प्रवेश निषिद्ध असल्याने हा परिसर प्रदूषणमुक्त आहे. नेरळहून मिनिट्रेनने माथेरानकडे जाता येते.माथेरानला जाताना ‘टॉय ट्रेनने’ होणारा दोन तासाचा प्रवास स्मरणीय असतो. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाला भेट देताना विविध पक्षी, माकडे आणि हिरव्यागार डोंगररांगा सभोवती असल्याने हा प्रवास संपूच नये असे वाटते. सोबत पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, वनट्री हील, सिमसन आणि शार्लोट तलाव असे विविध पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतात. कसे पोहोचाल? मुंबई किंवा पुण्याहून माथेरानला जाताना कर्जतपर्यंत रेल्वे अथवा लोकलने जावे. तेथून नेरळला लोकलने जावे. नेरळपर्यंत एसटी बसेसचीदेखील सोय आहे. नेरळहून ’टॉय ट्रेन’ अथवा खाजगी टॅक्सीने जाता येते. खाजगी वाहन मात्र केवळ ’दस्तुरी पॉईंट’ पर्यंत नेता येते. त्यानंतर घोड्यावर बसून अथवा पायी भटकंती करावी लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे येथील वडिलोपार्जित घराचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. डॉ.आंबेडकर यांचे हे मूळगाव आहे. स्मारक परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून हा परिसर अत्यंत सुंदर आहे. कसे पोहोचाल? मुंबई ते मंडणगड एसटी बसेस उपलब्ध असून मंडणगडपासून आंबडवे हे गाव 18 किलोमीटरवर आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे सागरकिनाऱ्यावरील रम्य परिसरात श्रीक्षेत्र गणपतीपुळे आहे. परिसरातील उद्यान आणि अथांग समुद्रकिनारा यामुळे हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. मंदिराभोवती 1 किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग असून तो अत्यंत रमणीय आहे. कसे पोहोचाल? मुंबई ते रत्नागिरी एसटी बसेस उपलब्ध असून रत्नागिरीपासून 25 कि.मी.अंतरावर हे मंदिर आहे. स्त्रोत - महान्युज