थायलंड (प्राथेट थाय). आग्नेय आशियातील एक सार्वभौम देश. प्राचीन काळी भारतीय लोकांनी वसाहती केलेल्या देशांपैकी बृहत् भारतातील महत्त्वाचा देश. ६° ते २०° उ. व ९७° ते १०६° पू. यांदरम्यान असून कमाल दक्षिणोत्तर लांबी १,५०० किमी. व कमाल रूंदी ८३० किमी. आहे. क्षेत्रफळ ५,१४,००० चौ. किमी. असून देशाची एकूण लोकसंख्या ३,९९,५०,३०६ (१९७३). १९३९ पूर्वी याचे ‘सयाम’ असे नाव होते. थाई भाषेत देशाचे नाव मुआंग थाय व अधिकृत नाव प्राथेट थाय (स्वतंत्रांची भूमी) असे असून इंग्रजी भाषेत थायलंड असे नाव १९३९–४५ व त्यानंतर १९४९ पासून आजतागायत प्रचलित आहे. त्यापूर्वी व १९४५–४९ या कालावधीत सयाम हे नाव वापरात होते. थायलंडच्या पूर्वेस व ईशान्येस लाओस, पश्चिमेस व वायव्येस ब्रह्मदेश, आग्नेयीस ख्मेर प्रजासत्ताक आणि दक्षिणेस थायलंडचे आखात (सयामचे आखात) असून दक्षिणेस तेनासरीम पट्टीच्या क्रा संयोगभूमीच्या दक्षिण टोकास मलेशियातील मलाया द्वीपकल्पाची सीमा आहे. बँकॉक (लोकसंख्या ३९,६७,०८१–१९७३) ही थायलंडची राजधानी आहे. भूवर्णन थायलंड पूर्णपणे उष्ण कटिबंधात मोडतो. देशाचा उत्तर भाग व विशेषतः दक्षिणेचा भाग चिंचोळा व लांब आहे. दक्षिणेचा भाग तेनासरीम म्हणून ओळखला जातो व तो क्रा संयोगभूमीचा भाग आहे. देशास दीर्घ किनारा लाभला असून त्याची लांबी २,७०० किमी. आहे. देशाचा सर्वसाधारण आकार व एकूण भौगोलिक रचना यांबाबत ब्रह्मदेश व थायलंड यांत बरेच साम्य आहे; पण थायलंड हा यूरोपीयांची कधीही वसाहत नव्हता. ब्रिटिश आणि फ्रेंच हितसंबंधांबाबत तडजोडीचे धूर्त धोरण ठेवून थाई लोकांनी आपला देश वसाहतीच्या धोक्यापासून स्वतंत्र राखला; पण हे करताना आज थायलंड फिलिपीन्सप्रमाणे पाश्चात्त्य धर्तीचे जीवन स्वीकारून बसला आहे. थायलंडच्या पश्चिम बाजूस डोंगराळ भाग असून त्याची उंची उत्तरेस वाढत जाते. पूर्व बाजूस उत्तरेस रूंद असणारे खोरातचे पठार आहे व मध्यभागी चाऊ फ्राया ह्या देशातील प्रमुख नदीचे सखल मैदान आहे. प्राकृतिक रचनेनुसार देशाचे चार विभाग पडतात उत्तरेकडील पर्वतप्रदेश मध्य मैदान खोरात (कोराट) पठार तेनासरीम थायलंड (द. चिंचोळी पट्टी – क्राची संयोगभूमी). उत्तरेच्या डोंगराळ भागात घड्यांचे पर्वत असून त्यांची रचना सामान्यतः दक्षिणोत्तर आहे. दोई इंतानॉन हे थायलंडमधील सर्वोच्च शिखर (२,५९५ मी.) या भागातच आहे. या डोंगररांगांमधूनच चाऊ प्रायाच्या सुरूवातीच्या उपनद्या दक्षिणेस वाहतात, त्यांत पश्चिमेकडून पूर्वेस वाहणाऱ्या पिंग, वांग, यॉम व नान या प्रमुख आहेत. मध्य मैदान किंवा मेनामचे खोरे हाच थायलंडचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. मेनाम (चाऊ फ्राया) या नदीच्या खोऱ्याचा हा प्रदेश दक्षिणोत्तर सु. ५०० किमी. व रूंदीने २५० किमी. आहे. उत्तर पर्वतापासून दक्षिणेस सयामच्या आखातापर्यंत सलगपणे हे मैदान पसरले आहे. चाइनात गावाच्या दक्षिणेस चाऊ फ्रायाच्या उपमुख नद्या सुरू होतात. या उपमुख नद्या व पूर्वेकडील पासाक आणि पश्चिमेकडील मेक्लाँग या नद्या कालव्यांनी परस्परांस जोडल्याने ह्या प्रदेशांत जलमार्गाचे विस्तृत जाळे निर्माण झाले आहे. या कालव्यांस खोलांग म्हणतात. चाऊ फ्राया व इतर नद्यांचा मिळून सयामच्या आखातात संयुक्त त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे (थाई भाषेतील मेनाम किंवा माएनाम या शब्दाचा अर्थ नदी असा आहे व त्यानंतर नदीचे विशेषनाम येते. उदा., माएनाम पिंग, माएनाम चाऊ फ्राया इ.; पण चाऊ फ्राया ही नदी इतकी मोठी व महत्त्वाची आहे, की तिचा उल्लेख बऱ्याच वेळा मेनाम–माएनाम–असाच करतात. जसा चीनमध्ये तांदूळ व जेवणे या दोहोंस एकच शब्द आहे.) हा सर्व प्रदेश दक्षिणेस अत्यंत सपाट व सखल आहे. अयुथ्थ्या हे किनाऱ्यापासून १०० किमी. अंतरावरचे शहर केवळ ४ मी. उंचीवर आहे. त्यामुळे दरवर्षी या भागात पुराचे खूपच पाणी साचते. खोरातचे पठार देशाचा एकतृतीयांश भाग व्यापते आणि त्यावर तेवढीच लोकसंख्या आहे. पठाराची पश्चिम व दक्षिण कडा दाट जंगलमय आहे. पठाराचा उतार मंद व पूर्वेस उतरता असून पठारावरून वाहणाऱ्या माएनाम ची व माएनाम मून या नद्या पूर्वेस वाहतात व पुढे एक होऊन सीमेवर मेकाँग नदी खोरात पठाराच्या पूर्व सीमेवरून वाहते व बऱ्याच अंतरापर्यंत ती थायलंड व लाओस यांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ची आणि मून नद्यांची खोरी उथळ आहेत व मेकाँगला पूर येताच बरेच पाणी मागे फिरून खोरी जलमय होतात; पण रेती खडकापासून बनलेली मातीच नापीक असल्याने पिके फारशी चांगली येत नाहीत.दक्षिणेकडचा तेनासरीमचा भाग अत्यंत अरूंद असून तो प्राचुआप किरीखान येथे केवळ २५ किमी. रूंद आहे. त्याच्या दक्षिणेस रूंदी वाढते व या भागास द्वीपकल्पीय थायलंड असे नाव आहे. ही पट्टी पुरातन पर्वतांनी बनली असून अधूनमधून छोटी खोरी आहेत.