स्थैर्यदायी घूर्णी जहाजाचे हेलकावणे कमी करण्यासाठी घूर्णीचा उपयोग करतात. अशा उपकरणास स्थैर्यदायी घूर्णी म्हणतात. अशा तऱ्हेची रचना १८७० च्या सुमारास काही जर्मन आणि इटालियन बोटींवर जर्मन अभियंते ओटो श्लिक यांनी प्रथम करून दिली. यात एक मोठे वजनदार चक्र एका मोठ्या चौकटीत बसविलेले असते. हे घूर्णीचे चक्र क्षैतिज प्रतलात असून त्याचा अक्ष उदग्र ठेवलेला असतो. ही चौकट जहाजाच्या रुंदीला समांतर अशा एका दांडीला बांधून ठेवलेली असते व त्या दांडीशी ती झोपाळ्याप्रमाणे आंदोलन करू शकते. या आंदोलनामुळे घूर्णीचा अक्ष पुढे-मागे म्हणजे जहाजाच्या मार्गाच्या दिशेत डोलू शकतो. या झोपाळ्याचा गुरुत्वमध्य आडव्या दांडीच्या बराच खाली असल्यामुळे तो समतोलात असतो. आ. ७. स्थैर्यदायी घूर्णी (जहाजाच्या रुंदीला समांतर छेद) घूर्णीचा परिवलन अक्ष. जहाजांचे आपल्या कुशीवर हेलकावणे सुरू झाल्याबरोबर घूर्णीचा अक्ष जो प्रथम उदग्र स्थितीत असतो त्यावर परांचनकारी प्रेरणा निर्माण झाल्यामुळे तो मागे-पुढे डोलू लागतो. या दोन आंदोलनांच्या क्रिया एकाच दोरीवरून होणाऱ्या समान लांबीच्या दोन लंबकांच्या आंदोलनाप्रमाणे घडतात. प्रथम एक लंबक स्थिर ठेवून दुसऱ्याला आंदोलन गती दिल्यास पहिल्याचे आंदोलन हळूहळू सुरू होते आणि दुसऱ्याचे हळूहळू नष्ट होत जाते. थोड्या वेळाने दुसऱ्याचे आंदोलन सुरू होते व पहिल्याचे नष्ट होते. आंदोलन ऊर्जा अशी एका लंबकाकडून दुसऱ्याकडे दिली जाते. याचप्रमाणे हेलकावण्याच्या आंदोलनाची ऊर्जा घूर्णीच्या व तिच्या झोपाळ्याच्या आंदोलनासाठी उपयोगात आणली जाते व हेलकावणे नष्ट होते याचवेळी, योग्य तऱ्हेने गतिरोधक (ब्रेक) लावून झोपाळ्याची आंदलने नष्ट करता येतात. मात्र यासाठी दोन्ही आंदोलनांचा काळ समान मूल्याचा ठेवावा लागतो. ओटो श्लिक यांनी सिल्व्हान बोटीत बसविलेल्या घूर्णीचा व्यास १·८ मी. होता व याचे वजन सु. ५ टन होते. दर मिनिटाला त्याचे १,८०० फेरे होत. या उपकरणामुळे जहाजाचे हेलकावणे ९०-९५ टक्क्यांनी कमी होते. घूर्णीची चौकट व झोपाळा यांच्या आंदोलनाची व्याप्ती ३०० ते ४०० इतकी होई. दरमापक घूर्णी (रेट जायरो). हे उपकरण ज्या वाहनात बसविलेले असते त्याचा कोनीय संवेग मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. जहाजाच्या स्थैर्यदायी यंत्रणेत हेलकाव्यांचे मान दर्शविण्याकरिता या घूर्णीचा उपयोग होतो. विमानामध्ये चालकाला विमान डाव्या किंवा उजव्या बाजूला व किती वेगाने वळत आहे याची माहिती मिळविण्यासाठी दरमापक घूर्णीचा उपयोग होतो व त्यानुसार त्याला विमानाच्या मार्गात योग्य ती दुरुस्ती करता येते. विमानाची तिन्ही दिशांत होणारी हालचाल नियंत्रित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्वयंचालक (ऑटोमॅटिक पायलट) यंत्रणेत तसे तोफा डागण्याकरिता व इतर अनेक यंत्रणांत या घूर्णीचा उपयोग करतात. आ. ८. दरमापक घूर्णी बैठक परिवलन अक्ष कडी फिरती चकती दर्शक काटा. स्वयंचलित वाहने, रॉकेट यांचा वापर वाढत्या प्रमाणात असल्यामुळे घूर्णीची तंत्रविद्या झपाट्याने विकास पावत आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारात देखील घूर्णीचा किती उपयोग आहे हे सहज लक्षात येत नाही. सायकलीचे चाक हेदेखील एक घूर्णी आहे आणि सायकल चालविताना घूर्णीच्या गुणधर्माचा, नकळत का होईना आपण उपयोग करीत असतो. उदा., आपला डावीकडे तोल जात आहे असे वाटले की, आपण डावीकडे सायकल वळवून आपला तोल सावरतो.सायकल कलती झाल्यावर तिचे वजन व त्याची जमिनीवरील प्रतिक्रिया यांच्या प्रेरणायुग्मामुळे सायकलीच्या चक्राचे परांचन घडते व डाव्या बाजूला सायकल वळविल्यास गतीला स्थैर्य येते. संदर्भ : Campbell, R. W. Tops and Gyroscopes, New York, 1959. Deimel, R. F. Mechanics of Gyroscope, New York, 1929. Machover, C. Basics of Gyroscopes, 2 Vols., New York, 1960. Scarborough, J. B. The Gyroscope : Theory and Application, New York, 1958. Gyroscope : Theory and Application, New York, 1958. स्त्रोत - मराठी विश्वकोश