माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील 453 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या निवडणुकीसाठी मतदान सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2017 रोजी तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2017 रोजी होणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील 38, कडेगाव 43, तासगाव 26, कवठेमहांकाळ 29, जत 81, खानापूर 46, आटपाडी 26, पलूस 16, वाळवा 88 व शिराळा तालुक्यातील 60 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

निवडणूक प्रक्रिया दि. 22 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणामध्ये होणे आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिताविषयक निर्गमित केलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. या निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहिता पाळण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांची माहिती या लेखात दिली आहे.

काय करावे व काय करु नये

काय करावे ?

• चालू असलेले कार्यक्रम / योजना पुढे सुरु ठेवता येईल.

• ज्याविषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात, राज्य निवडणूक आयोग / महानगरपालिका / आयुक्त / जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण / मान्यताप्राप्त करण्यात यावी.

• पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साह्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व चालू असलेल्या योजना पुढे सुरु ठेवता येतील.

• मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तिंना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल.

• शांततामय व उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तिच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे.

• प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानगी मिळविण्यात याव्यात.

• प्रस्तावित सभेच्या जागी निर्बंधात्मक व प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक त्याबाबत सवलत मिळवण्याविषयी अर्ज केले पाहिजेत व वेळीच अशी सवलत मिळविली पाहिजे.

• प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक (Loudspeaker) किंवा कोणत्याही इतर अशा सवलतीचा वापर करण्यासाठी परवानगी मिळविली पाहिजे.

• कोणत्याही मिरवणुकीची प्रारंभीची वेळ व जागा, मिरवणूक ज्या मार्गाने जाईल तो मार्ग व मिरणुकीची अखेर होईल अशी वेळ व स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी व पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी.

• मिरवणूक ज्या वस्तीमधून जात असेल त्या वस्त्यांबाबत कोणतेही निर्बंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्याविषयी खात्री करुन त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्व वाहतूक नियमांचे व अन्य निर्बंधाचे अनुपालन करण्यात यावे.

• ज्यांचा क्षेपके किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल अशा कोणत्याही वस्तू प्रचार फेरीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी बाळगू नयेत.

• मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेने पार पडावे यासाठी सर्वतोपरी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य देण्यात यावे. उमेदवार व त्याच्या अधिकृत कार्यकर्त्यांनी विहित परवानगी घेऊन योग्य असे बिल्ले आणि ओळखपत्रे निवडणूक प्रशासनाकडून मिळवावीत आणि ती दर्शनी भागावर लावावीत.

• मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठ्या साध्या (पांढऱ्या) कागदावर देण्यात येतील व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव यांचा निर्देश असणार नाही.

• मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधाचे पूर्णपणे पालन करण्यात यावे.

• निवडणूक आयोगाचे, महानगरपालिका आयुक्त यांचे अथवा जिल्हाधिकाऱ्यांचे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे दिलेले वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याहीवेळी मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. वरच्या दर्जाच्या कोणत्याही व्यक्तींना (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य) यातून सूट देण्यात आलेली नाही.

• निवडणूक पार पाडण्याच्या संबंधातील कोणतीही तक्रार किंवा समस्या, निवडणूक निर्णय अधिकारी / क्षेत्र / प्रभाग/ दंडाधिकारी यांच्या किंवा राज्य निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निर्दशनास आणून देण्यात यावी.

काय करु नये ?

• शासकीय वाहने किंवा कर्मचारी किंवा यंत्रणा यांचा निवणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये.

• शासकीय वाहनात पुढील कार्यालयाच्या वाहनांचा समावेश असेल. केंद्र शासन, राज्य शासन, केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, मंडळे, महामंडळे, केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा / नगरपंचायती, पणन मंडळ (कोणत्याही नावाचे), सहकारी संस्था, जिल्हा परिषदा / पंचायत समित्या/ ग्रामपंचायती किंवा ज्यामध्ये सार्वजनिक निधी मग तो एकूण निधीच्या हिश्श्यातील कितीही अल्पांशाने गुंतविण्यात आला आहे, अशी कोणतीही संस्था आणि तसेच, संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची आणि गृह मंत्रालय व राज्य शासन यांच्या केंद्रीय पोलीस संघटनेच्या मालकीची असलेली पुढील वाहने - मालमोटारी, लॉरी, टेंपो, जीपगाड्या, ऑटोरिक्षा, बसगाड्या, विमाने, हेलिकॉप्टर, जहाजे, बोटी, हॉवर क्रॉप्ट व इतर सर्व वाहने.

• सत्तेमध्ये असलेल्या पक्ष/शासन यांनी साध्य केलेल्या उदिष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देऊ नये.

• कोणतीही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते इ. बांधण्याचे वचन देणे इत्यादी गोष्टी करु नयेत.

• शासन / सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही नवीन नियुक्त्या करु नयेत.

• निवडणूक मोहीम / प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये.

• मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये. कोणत्याही वस्तूंचे वाटप करु नये. यामध्ये ई-कॉमर्समधील ऑनलाईन खरेदीचा देखील समावेश होतो.

• मतदाराच्या जातीय व धार्मिक भावनांना आवाहन करण्यात येऊ नये.

• विभिन्न जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील मतभेद ज्यामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्य किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये.

• निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादीसाठी कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर करण्यात येऊ नये.

• लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे व तेथून परत नेणे यासारख्या भ्रष्ट प्रथा किंवा निवडणूकविषयक अपराध करण्यास प्रतिबंध आहेत.

• कोणत्याही व्यक्तिला, कोणत्याही व्यक्तिची जमीन, इमारत आवार, भिंत इत्यादींचा वापर त्यांच्या मालकांच्या परवानगी खेरीज करणे, ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीशी चिकटविणे किंवा घोषणा इत्यादी लिहिणे यासाठी करता येणार नाही. यामध्ये खाजगी व सार्वजनिक जागांचा समावेश असेल.

• ध्वनिवर्धकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत सकाळी 6.00 वाजण्यापूर्वी किंवा रात्री 10.00 वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असल्याखेरीज वापर करु नये.

• तसेच संबंधित प्राधिकाऱ्यांची पूर्व लेखी परवानगी असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा प्रचार फेरीत ध्वनिवर्धकाचा वापर करु नये. अशा सभा / प्रचार फेरी रात्री 10.00 वाजल्यानंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटीचे पालन करावे. याखेरीज ती स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षिततेच्या आवश्यकतेचा स्थानिक दृष्टीकोन आणि हवामान सणासुदीचा मोसम, परीक्षेचा काळ यांच्या अधीनतेने असतील.

• निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या मद्याचे वाटप करण्यात येऊ नये.

वरील सूची केवळ माहितीसाठी असून ती सर्वसमावेशक नाही. मात्र, आचारसंहितेची अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी, याबाबत सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत.

संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

माहिती स्रोत: महान्युज