उत्तम शेती, मध्यम व्यवसाय कनिष्ठ नोकरी असं आपल्याकडे बऱ्याचदा म्हटले जाते. कुठल्याही राष्ट्राच्या विकासात्मक वाटचालीत उद्योगांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशातील अनेक यशस्वी उद्योजक जागतिक पातळीवरील यादीत अग्रक्रमावर आहेत. ज्या पद्धतीने नोकरीसाठी मनुष्यबळ तयार करत असताना खास उद्योगासाठी उद्योजक घडविणे गरजेचे आहे. व्यवसायाची निवड, पायाभरणी, उभारणी कशी करावी? भांडवल कुठून उभारायचे? कामगारांची नेमणूक, जबाबदारीचे वाटप, यासारख्या गोष्टींचे व्यवस्थापन तुम्हालाच करावे लागते तसेच कर भरण्याविषयी सल्ला, व्यवसायाचे बजेट याचाही विचार करावा लागतो. जर कोणत्याही व्यवसायाचे व्यवस्थापन नीट असेल तर तो व्यवसाय नफ्यात जाऊ शकतो. नव्याने उद्योजक म्हणून घडू पाहणाऱ्या प्रत्येकासमोर अनेक प्रश्न असतात. येणाऱ्या आव्हानांना तोंड देताना, मार्गक्रमण करताना नेमके काय निर्णय घ्यावेत आणि कशा पद्धतीने यशस्वी उद्योजक व्हावे याचा घेतलेला छोटासा आढावा खास करिअरनामासाठी… व्यवसाय निवडण्यापूर्वी व्यवसाय करणे ही धाडसाची गोष्ट असते. किंबहुना व्यवसाय निवडण्यापूर्वी आपल्या आवडीनिवडी काय आहेत त्यानुसार व्यवसायाची निवड करावी कारण आवड हाच व्यवसाय झाल्यास त्यातील यशाच्या सर्वोत्तम पायरीवर पोहचण्याच्या शक्यता वाढतात. सर्वप्रथम आपण व्यवसाय करू शकतो का? आपणांमध्ये स्वतंत्र व्यवसाय करण्याची वा जोखीम घेण्याची तयारी आहे काय? आपण अकस्मात येणाऱ्या अडचणींवर मात करून प्रकल्प तडीस नेऊ शकतो किंवा नाही? आपल्यामध्ये त्यासाठी लागणारे कौशल्य, व्यवसायाचे ज्ञान व व्यावहारिक दृष्टिकोन आहे का या आदी प्रश्नांची उत्तरे शोधून व्यवसाय करावयाचा किंवा नाही याबद्दल ठाम निर्णय घ्यावा. कोणता व्यवसाय करावयाचा ठरविल्यानंतर त्या व्यवसायाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करावा. तशाच प्रकारचा व्यवसाय कुणी यशस्वी केला असल्यास त्या उद्योगाला भेट द्यावी आणि त्यांच्याकडून माहिती घ्यावी. तसेच आपण निवडलेल्या उद्योगाला पूरक वातावरण आपल्याकडे उपलब्ध आहे का याचा अंदाज घेऊन पुढे पाऊल टाकावे भांडवलाची उभारणी व्यवसाय उभा करायचा म्हटल्यावर भांडवलाची गरज भासते. ते उभा करण्यासाठी एकतर आपल्याकडे रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे किंवा कर्जरूपात ती उभा करावी लागते. तसेच उद्योगासाठी जमिनीची उपलब्धता महत्त्वाची असते. कधीकधी लहान उद्योजकांना कर्ज उभारणीसाठी अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर भागीदारीत व्यवसाय केल्यास आर्थिक साहाय्य होण्यास मदत होत असते. तसेच अलीकडे अनेक शेतकरी समूहाने एकत्र येऊन लहान उद्योगांना सुरुवात करत आहेत. आता शासनाच्या विविध योजनामधून अर्थसहाय्य उपलब्ध होतेय. शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे मुद्रा बँक योजना होय. अनेक लघु उद्योजकांना या योजनेतून आपला व्यवसाय उभारण्यास मदत झाली आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अनेकांना उद्योजक होण्यास पाठबळ मिळाले आहे. पीएमईजीपी योजनेतून चार लाख लोकांना आजवर सहकार्य लाभले आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यामतून अर्थसहाय्य होते आहे. आणि महिला उद्योजकतेचा विकास होण्यासाठी आता महिलांना व्यवसायासाठी नव्याने प्रेरित केले जात आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून अनेकांना कर्जरूपात साहाय्य केले जाते. एका अर्थाने भांडवल हा उद्योगांचा आत्मा असतो. प्रशिक्षण व्यवसायाची उभारणी करण्यापूर्वी त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे त्यामुळे त्या क्षेत्रातील बारकावे समजण्यास मदत होईल. व्यवसायातील आव्हाने, संधी, अडचणी आणि आपला आवाका याचा अंदाज येतो. तसेच उत्पादन निर्मिती, त्याचे टप्पे, तांत्रिक बाबी, घ्यावयाच्या खबरदारी याची माहिती मिळते. अनेक संस्था प्रशिक्षणाचे आयोजन करत असतात. काही ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडूनही वेळोवेळी प्रशिक्षणे आयोजित केली जातात. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून मधुमक्षिका संगोपन या विषयाचे प्रशिक्षण महाबळेश्वर आणि पुणे येथे दिले जाते. प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. प्रशिक्षणामुळे व्यावसायिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. बाजारपेठेचा अभ्यास आणि मार्केटिंग जे विकते ते पिकवा असे एका अर्थाने म्हटले जाते. यानुसार बाजारपेठेची नेमकी मागणी काय आहे याचा उद्योजकाला अभ्यास असणे आवश्यक आहे. त्यानुसार त्याने उत्पादन करावे. कालबाह्य झालेल्या अनेक गोष्टी वेळोवेळी वगळत आणि नव्या गोष्टी आत्मसात करत उद्योजकाला पुढे जावे लागते. तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि मार्केटींगच्या, जाहिरातीच्या नवनव्या कल्पना उदयास येत आहेत. त्या अनुसरणे आवश्यक असते. प्रभावी माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त लोकापर्यंत आपले उत्पादन नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तसेच विक्री कौशल्य आणि मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. उद्योगाची पुनर्रचना, पुनर्बांधणी, पुनर्संघटन, पुनर्शोध आदी बाबींचा अभ्यास करून वेळोवेळी उद्योजकाला पुढे जावे लागते. त्यामुळे त्याने यासाठी तयार असणे आवश्यक आहे. उद्योजक होण्यासाठी मुळातच कठोर परिश्रमाची तयारी हवी. एखादा व्यवसाय नफ्यात यायला किमान दोन ते तीन वर्षाचा कालावधी जावा लागतो. कधीकधी मोठ्या संकटाना सामोरे जावे लागते अशावेळी अनेक मानसिक स्थित्यंतरे होत असतात. यावर मात करण्याची तयारी ठेवावी लागते. पण एकदा का उद्योगाची उभारणी झाली की तुम्ही अनेकांना रोजगार देऊ शकता. समाजाप्रती जबाबदारी म्हणून अनेक समाजोपयोगी कामे करू शकता. अर्थातच उद्योजक म्हणून मिळणारी प्रतिष्ठा मोठी असते. चला तर मग यशस्वी उद्योजक होण्यास मनपूर्वक शुभेच्छा. लेखक - सचिन पाटील स्त्रोत - महान्युज