सुष्टांचा विजय आणि दुष्टांचे निर्दालन ही कल्पना दर्शविण्यासाठी हा शब्दप्रयोग प्रथम ट्रॅजडीज ऑफ द लास्ट एज (१६७८) मध्ये टॉमस ऱ्हायमरने वापरला.

काव्यन्यायाचा पुरस्कार करणारे ललित वाङ्मयाकडे बोधवादी दृष्टीने पाहतात. त्यांच्या मते अन्यायांचे परिमार्जन करणारी दयाशील शक्ती विश्वाची सूत्रे हाती ठेवते. ह्या परिस्थितीच्या चित्रणामुळे कथावस्तूची रचना जीवनाचे यथार्थ दर्शन घडवीत नाही.

काही शोकांतिकांत काव्यन्यायाचा एक विशिष्ट प्रकार आढळतो. त्यातील काही पात्रांची कृती त्यांच्यावरच उलटते. लेआर्टेस हॅम्लेटला ठार करण्यासाठी सुऱ्याच्या टोकाला विष लावतो; परंतु त्याच सुऱ्याने हॅम्लेट लेआर्टेसला जखमी करतो. ही घटना अटळ विधिलिखिताची परंपरागत कल्पना सुचविते.

लेखक: कुमुद मेहता

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश