जैन शौरसैनी भाषेतील षट्खंडागम ह्या दिगंबर जैन तत्त्वज्ञानपर ग्रंथाचा सहावा खंड, महाबंध ह्या नावानेही तो ओळखला जातो. आचार्य भूतबली (इ. स. चे दुसरे शतक) हा त्याचा कर्ता.

चाळीस हजार श्लोकसंख्या असलेल्या ह्या ग्रंथाचे सात भाग असून त्यांत जीव व कर्म ह्यांच्या बंधप्रकारांची प्रकृती, स्थिती, अनुभाग व प्रदेश ह्या दृष्टींनी सखोल व प्रदीर्घ चर्चा केलेली आहे.

हा ग्रंथ १९१५ पर्यंत कर्नाटकातील मुडिविद्री मठात अज्ञात अवस्थेत राहिलेला होता. १९४७−५८ ह्या कालखंडात काशी येथील भारतीय ज्ञानपीठातर्फे तो सात भागांत प्रकाशित करण्यात आला. आ. ने. उपाध्ये, हिरालाल जैन आणि सुमेरुचंद दिवाकर ह्यांनी तो संपादिला आहे.

लेखक: ग. वा. तगारे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश