ह्या शतकातही प्रबोधनकालीन मानवतावादाचा प्रभाव होताच. तथापि लॅटिनमध्ये होणाऱ्या ग्रंथरचनेचे प्रमाण कमी झालेले दिसते; तसेच इटालियन भाषेकडे पाहण्याची अनादराची दृष्टीही बऱ्याच प्रमाणात नाहीशी झालेली आढळते. सर्जनशील इटालियन साहित्यिकांना आता आत्माविष्कारासाठी इटालियन भाषांच विशेष जवळची वाटू लागली. काव्याबरोबरच नाटक, आत्मचरित्र यांसारखे इतर साहित्यप्रकारही नावारूपास आले. इतिहास, राज्यशास्त्र इ. क्षेत्रांतही श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथ निर्माण झाले. दान्ते, पीत्रार्क आणि बोकाचीओ हे जसे चौदाव्या शतकातील इटालियन साहित्याचे आधारस्तंभ; तसेच प्येअत्रो बेंबो (१४७०–१५४७), लोदोव्हीको आरिऑस्तो (१४७४–१५३३), मॅकिआव्हेली (१४६९–१५२७), फ्रांचेस्को ग्वीत्चार्दीनी (१४८३–१५४०), तोरक्वातो तास्सो (१५४४–१५९५) हे सोळाव्या शतकातील इटालियन साहित्याग्रणी. प्रबोधनकाळाची वैशिष्ट्ये ह्या शतकातील इटालियन साहित्यात पूर्णत्वाने आविष्कृत झाली. उन्नत कलाभिरुची, इहलोकपर तत्त्वज्ञान आणि व्यक्तीची प्रतिष्ठा यांविषयीची सखोल आस्था ह्या काळातील श्रेष्ठ वाङ्मयकृतींत आढळून येते. बेंबो याचा Prose della volgar lingua (१५२५) हा ग्रंथ म्हणजे इटालियन भाषेचा जाहीरनामाच होय. ह्याच ग्रंथात त्याने लॅटिनऐवजी वाङ्मयीन भाषा म्हणून इटालियनचाच स्वीकार व्हावा आणि ही इटालियन भाषा म्हणजे इटलीतील तस्कन बोलीच असावी, असे विचार व्यक्त केले. पीत्रार्क आणि बोकाचीओ ह्यांसारख्या वाङ्मयश्रेष्ठींनी तस्कन भाषेला प्राप्त करून दिलेले सामर्थ्य आणि संपन्नता लक्षात घेता, ती भाषा केवळ तस्कनीची राहिलेली नसून संपूर्ण इटलीचीच झालेली आहे, अशा स्वरूपाचा त्याचा विचार होता. इटालियन भाषेच्या व्याकरणविषयक नियमांचाही समावेश ह्या ग्रंथात आहे; तसेच वाङ्मयीन शैलीविषयीचे महत्त्वपूर्ण विचारही आहेत. काव्याच्या बाबतीत पीत्रार्कचा आदर्शच काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे, ही त्याची धारणा होती. बेंबो याला प्राप्त झालेली प्रतिष्ठा एवढी मोठी होती, की हयातभर त्याने इटलीचे वाङ्मयीन नेतृत्व केले. त्याने पुरस्कारलेल्या पीत्रार्कवादाचा प्रभाव सोळाव्या शतकातील इटालियन भावकवितेवर प्रकर्षाने पडला. तथापि काही पीत्रार्कवादी कवींनी केवळ पीत्रार्कचे अनुकरण न करता काही प्रमाणात स्वत:चे वेगळेपणही दाखविले. अशा कवींत जोव्हान्नी ग्वीदीत्चोनी (१५००–१५४१) व जोव्हान्नी देल्ला कासा (१५०३–१५५६) ह्यांचा समावेश होतो. ह्याच काळात व्हेरीनीका गांबारा (१४८५–१५५०), व्हीत्तॉर्या कोलोन्ना (१४९२–१५४७) अशा काही कवयित्री उदयास आल्या. त्यांची सुनीतादी रचना भावोत्कट आहे. मायकेलअँजेलो (१४७५–१५६४) आणि लूईजी तान्सील्लो (१५१०–१५६८) हेही उल्लेखनीय कवी. मायकेलअँजेलोच्या सुनीतांतून आणि माद्रिगलगीतांतून त्याचे समर्थ व्यक्तिमत्त्व आणि प्लटॉनिक प्रेमभावना प्रत्ययास येते. लूईजी तान्सील्लोचे Le lagrime di San Pietro (१५८५) हे एक उत्कृष्ट धर्मकाव्य होय. त्याने काही उत्कृष्ट सुनीतेही लिहिली. तथापि लोदोव्हीको आरिऑस्तोचे Orlando Furioso (१५३२) हे महाकाव्य म्हणजे ह्या शतकातील एक श्रेष्ठ काव्यकृती होय. मात्तेओ बोयार्दो ह्याच्या अपूर्ण राहिलेल्या Orlando Innamorato ह्या महाकाव्याचाच पुढील भाग म्हणून आरिऑस्तोनो हे महाकाव्य लिहिले. प्रबोधनकालीन आदर्शवाद्याचे सौंदर्यविश्व आरिऑस्तोने काव्यरूपात आविष्कारिले. Orlando... मधील नायकनायिका ही प्रबेधनकालीन आदर्शांचीच रूपे होत. बोयार्दो आणि लूईजी पूल्ची ह्यांनी निर्मिलेल्या रम्याद्भुत महाकाव्याचे तंत्र आरिऑस्तोने पूर्णत्वास नेले. आरिऑस्तोच्या धर्तीवर बेरनार्दो तास्सो (१४९३–१५६९) ह्याने L'Amadigi di Gaula (१५६०) हे महाकाव्य लिहिले. तसेच जांजोर्जो त्रीस्सिनो (१४७८–१५५०) ह्याने अॅरिस्टॉटलच्या काव्यशास्त्रांतर्गत नियमांनुसार L' Italia liberata dai Goti (१५४७) ह्या महाकाव्याचीही रचना केली. मात्र हे प्रयत्न फारसे लक्षवेधी ठरले नाहीत. आरिऑस्तोच्या महाकाव्यानंतर नाव घेण्यासारखे महाकाव्य म्हणजे तोरक्वातो तास्सोचे Gerusalemme Liberata (१५७५) हे होय. मार्टिन ल्यूथरच्या धर्मसुधारणेच्या चळवळीविरुद्ध इटलीत तीव्र वातावरण असताना हे महाकाव्य रचिले गेले. पहिल्या धर्मयुद्धात गॉडफ्री ऑफ बूयाँने जेरूसलेम कसे जिंकून घेतले, हा या महाकाव्याचा विषय. अॅरिस्टॉटलप्रणीत महाकाव्यानियमांचे तास्सोने उल्लंघन केल्याने त्यावर इटलीत बरीच टीका झाली. हे महाकाव्य भावगेय (लिरिकल) असले, तरी त्यातील नैतिक आणि धार्मिक उद्देश स्पष्टपणे प्रतीत होतात. ह्या काळातील विनोदी काव्यलेखनात फ्रांचेस्को बेर्नी (१४९८?–१५३५) याचा उल्लेख आवश्यक आहे. तत्कालीन जीवनावरील उपरोधपूर्ण भाष्य त्याच्या कवितांत आढळते. जोव्हान्नी रूचेल्लाई (१४७५–१५२५), लूईजी आलामान्नी (१४९५–१५५६) ह्यांसारख्या कवींनी बोधवादी स्वरूपाची काव्ये लिहिली. रूचेल्लाईचे Le api (इं. शी. द बीज) हे काव्य व्हर्जिलच्या जॉर्जिक्समधील चौथ्या खंडावर आधारित आहे. लूईजी आलामान्नी ह्याने निर्यमक छंदात Della Coltivazione (१५४६) हे शेते आणि उद्याने ह्यांची निगा कशी राखावी, ह्या विषयावरील दीर्घकाव्य लिहिले. ‘मरलायनस कॉकेयस’ ह्या टोपण नावाने लिहिणाऱ्या तेऑफीलो फोलेंगो (१४९१–१५४४) ह्या कवीने काव्यरचनेसाठी माध्यम म्हणून लॅटिन आणि इटालियन ह्यांचे चमत्कारिक मिश्रण करून घडविलेली भाषा वापरली. ह्या भाषेस ‘मॅकरॉनिक लॅटिन’ असे म्हटले जाते. ह्या शतकातील गद्यलेखन वैविध्यपूर्ण आहे. कथालेखनावर बोकाचीओचा प्रभाव जाणवतो. त्यावेळचा एक शिल्पकार व सुवर्णकार बेनव्हेनूतो चेल्लीनी (१५००–१५७१) ह्याने लिहिलेल्या आत्मचरित्रात प्रबोधनकालीन इटलीचे जीवन प्रतिबिंबित झाले आहे. त्यातील कथनशैली निर्भीड आणि मनमोकळी आहे. जगातील नामांकित आत्मचरित्रांत त्याची गणना केली जाते. चित्रकार व वास्तुकार जोर्जो व्हाझारी (१५११–१५७४) ह्या सु. दोनशे इटालियन कलावंतांची चरित्रे लिहिली. ही चरित्रे Le vite de'piu eccellenti Pittori, scultori e architettori (१५५०, इं. शी. लाइव्ह्ज ऑफ द मोस्ट एक्स्लंट पेंटर्स, स्कस्प्टर्स अँड आर्किटेक्ट्स) ह्या ग्रंथाच्या तीन खंडांत विभागली असून हे तीन खंड इटालियन कलेच्या तीन विकासावस्था सुचित करतात. ह्या चरित्रमालेसोबतच वास्तुकला, मूर्तिकला आणि चित्रकला ह्यांवर महत्त्वपूर्ण विवेचक लेख आहेत. प्रबोधनकालीन इटालियन कलेचा इतिहास मसजून घेण्याच्या दृष्टीने ह्या चरित्रांचे मोल फार मोठे आहे. प्रबोधनकालीन इटालियन साहित्यातील एक अभिजात गद्यकृती म्हणून बाल्दास्सारे कास्तील्योने ह्याने लिहिलेला Il libro del cortegiano (१५२८, इं. शी. द बुक ऑफ द कोर्टिअर) हा दरबारी आचारविषयक ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. ह्या ग्रंथाची लोकप्रियता केवळ इटलीपुरती मर्यादित राहिली नाही, तर तिला एकूण यूरीपीय साहित्यातही महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. नाट्यलेखनाच्या क्षेत्रात श्रेष्ठ दर्जाची अशी एकही शोकात्मिका लिहिली गेली नाही. तथापि Sofonisba (१५१५) ही खऱ्याखुऱ्या अर्थाने पहिली इटालियन शोकात्मिका ह्याच काळात जांजोर्जो त्रीस्सिनो ह्याने लिहिली. ह्या नाटकात अॅरिस्टॉटलप्रणीत ऐक्यत्रयापैकी कालैक्य आणि कृती-ऐक्य ह्यांचे कसोशीने पालन केले होते. काही काळ शोकात्मिकांचा अभिजात आदर्श पुढे ठेवला गेला. तथापि जीराल्दी चींत्स्यो (१५०४–१५७३) ह्या नाटककाराने ग्रीक नाटकांऐवजी सेनीकाच्या नाट्यकृतींचा आदर्श पुढे ठेवावा, असे विचार पुढे आणले. तथापि ह्या आदर्शविषयक परिवर्तनातून नाट्यकृतींचा दर्जा मात्र उंचावला नाही. शोकात्मिकांच्या मानाने सुखात्मिकांची गुणवत्ता अधिक वाटते. ह्या सुखात्मिकांपुढे मुख्यतः प्लॉटस आणि टेरेन्स ह्या रोंमन नाटककारांच्या सुखात्मिकांचा आदर्श होता. आरिऑस्तोचा Cassaria (१५०८) आणि I Suppositi (१५०९) ह्या सुखात्मिका त्या दृष्टीने लक्षणीय आहेत. बेर्नार्दो दोव्हीत्स्यो दा बीब्येअना (१४७०–१५२०) ह्याची La Calandria (१५१३) ही सुखात्मिकाही उल्लेखनीय आहे. आगोस्तीनो बेक्कारी (?–१५९०) ह्याने Sacrificio (१५५४) हे नाटक लिहून गोपनाट्य हा नवा नाट्यप्रकार इटलीत आणला. त्याच्या धर्तीवर तोरक्वातो तास्सोसारख्या साहित्यिकाने Aminta (१५७३) हे गोपनाट्य लिहिले. इतिहास आणि राज्यशास्त्र ह्या विषयांवर फ्रांचेस्को ग्वीत्चार्दींनी (१४८३–१५४०) आणि निक्कोलो मॅकिआव्हेली ह्या दोन विद्वानांनी महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. ग्वीत्चार्दीनीच्या Storia d' Italiaमध्ये (१५६१–१५६४) आठव्या चार्ल्सच्या इटलीप्रवेशापासून पोप सातव्या क्लेमंटच्या निधनापर्यंतचा इटलीचा इतिहास आलेला आहे. ह्या विवक्षित काळातील संपूर्ण इटलीतील राजकीय स्थित्यंतरांचा आलेख ह्यात सापडतो. हा त्याचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. इटलीचा ह्यात एकसंधपणे विचार केला आहे, हे ह्या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. Ricordi politicie civili हा त्याचा ग्रंथ १५७६ ते १५८५ च्या दरम्यान प्रसिद्ध झाला. त्यातील काही भाग राजकीय विचारांचा असला, तरी एकंदरीने ह्या ग्रंथात मानवी जीवनाच्या विविध अंगांसंबंधीचे चिंतन सु. दोनशे सुत्रांमधून व्यक्त झालेले आढळते. त्याच्या Del reggimento di Firenze मध्ये फ्लॉरेन्सच्या शासनव्यवस्थेच्या दृष्टीने श्रेयस्कार योजना कोणती असू शकेल, ह्यासंबंधीचे प्रतिपादन आहे व त्याच्या अनुषंगाने राजकारणातील अनेक मूलभूत बाबींचा विचार त्यात आला आहे. मॅकिआव्हेली हे तर एत चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. इतिहासविषयक आणि राज्यशास्त्रविषयक लेखनाबरोबरच त्याने नाटकासारखे साहित्यप्रकार हाताळले. त्याने लिहिलेल्या नाटकांपैकी La Mandragola (१५१३ ?, इं. शी. द मॅनड्रेक) ही प्रबोधनकाळातील एक उत्कृष्ट सुखात्मिका म्हणून ओळखली जाते. तथापि तथापिIl Principe (लेखनकाळ १५१२, प्रकाशित १५३२, इं. शी. द प्रिन्स) हा त्याचा जागतिक कीर्तीचा ग्रंथ होय. उत्तरकालीन राज्यशास्त्रीय विचारांवर त्याचा फार मोठा प्रभाव पडला आहे. मॅकिआव्हेली हा पूर्णतः वास्तववादी आहे. राजकारणात साध्यामुळे साधने समर्थनीय ठरू शकतात, ही त्याची धारणा. राजकीय सामर्थ्य आणि स्थैर्य प्राप्त करण्यासाठी शास्त्याने कोणतेही सूक्तासूक्त मार्ग अवलंबावयास हरकत नाही, ही त्याची भूमिका. व्यक्तीपेक्षा राज्याला तो अधिक श्रेष्ठ मानतो. यांशिवाय त्याने फ्लॉरेन्सचा इतिहास (Istorie Fiorentine, लेखनकाळ १५२५, प्रकाशित १५३२) लिहिला आणि युद्धशास्त्रावरही लेखन केले. इटालियन भाषेच्या विकासाविषयीही त्याला आस्था होती. Dialogo intorno alla lingua (१५१४ ?) हा त्याने लिहिलेला ग्रंथ या संदर्भात उल्लेखनीय आहे. लेखक : अ. र.कुलकर्णी ; राजेंद्र सिंह आहलूवालिया (इं.); द. स. शिरोडकर (म.) स्त्रोत : मराठी विश्वकोश