अरूणाचल प्रदेश पूर्वीचे नॉर्थ ईस्ट फ्रण्टिअर एजन्सी म्हणून परिचित होते. पश्चिमेस, उत्तर - पूर्वेस, उत्तरेस व पूर्वेस क्रमश: भूतान, तिबेट, चीन व म्यानमार या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहेत. आसाम आणि नागालँड ही भोवतालची राज्य. पर्वत पायथा व पर्वत रांगांनी बनलेल्या प्रदेशाचा आसामच्या मैदानाकडे उतार आहे. कोमेंग, सुबानगिरी, सियांग लोहीत व तिराप या नद्यांच्या खोऱ्यांद्वारा अरूणाचल विभाजित झाला आहे. प्रामुख्याने पर्वतांच्या पायथ्याशी मिळालेले ऐतिहासिक अवशेष व इतर मौखिक साहित्य वगळता राज्याचा इतिहास अज्ञात आहे. संशोधनानुसार अवशेष अंदाजे प्रारंभिक ख्रिस्तकालीन असल्याचे निष्कर्ष निघतात. ऐतिहासिक पुराव्यानुसार हा प्रदेश सुप्रसिद्ध तसेच या प्रदेशातील लोकांचे देशातील इतर भागांशी घनिष्ट संबंध असल्याचे अनुमान निघते. 24 फेब्रुवारी 1826 यांदाबुचा तहानुसार आसामात ब्रिटींशांचे अधिपत्य प्रस्थापित झाल्यापासून त्याच्या आधुनिक इतिहासास आरंभ झाला. 1962 पूर्वी नॉर्थ - ईस्ट फ्रण्टियर एंजेन्सी (नेफा) आणि संविधानानुसार अरूणाचल हे आसामचा एक भाग म्हणून सुपरिचित. 1965 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रशासनाखाली व त्यानंतर गृहमंत्रालयाच्या अंतर्गत राज्यपालाकरवी प्रशासित होते. 1972 साली केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना आणि अरूणाचल प्रदेश असे नामांतर झाले. 20 फेब्रुवारी 1987 रोजी भारतीय संघराज्याचे 24 वे राज्य अशी मान्यता मिळाली. राज्याचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. मुख्यत: झुम लागवड पद्धतीने होते. बटाट्यासारखी नगदी पिके व सफरचंद, संत्रा, अननस यांच्या लागवडीकरीता राज्य सरकारचे प्रोत्साहन मिळते. आदिवासींचे मोपीन व सोलुंग, मोनपासचे लोसार, हिलमिरीसाचे बुरी - बुटू, अपाटानिसांचे शरडुकपेन्स आणि ड्री. तागिन्सचे सी - डोन्यीस, इदू मिशमिसांचे रेह, निशजमातीचे न्योकुम आदी सण आणि उत्सव आहेत. बहुतेक उत्सवात प्राण्यांचे बलिदान ही साधारण प्रथा आहे. तवांग, डीरांग, बोमदिला, तिपी, इटानगर, मालिनीथान, लिकाबाली, पासीघाट, अॅलाँग, तेजू, मिआओ रोईंग, दापोरीजो, नामदफा़, भिष्मकनगर, परशुरामकुण्ड व खोनसा, अकाशीगंगा, भालूकपाँग, झिरो, बसार, तेलंगाना, लेडो, बिरसा मुंडा धबधबा, मेहाओ सरोवर आदी पर्यटन स्थळे राज्यात पाहण्यासारखी आहेत. राज्यात अनेक लोकगीते गायली जातात. प्रत्येक उत्सवाला वेगवेगळी गीते गायली जातात. जा-जीन-जा नावाचे लोकगीत पुरूष आणि स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीने आणि कोरसमध्येही गातात. ही गीते लग्नसमारंभात, सामाजिक संमेलनात आणि उत्सवातही गायली जातात. बरई नावाचे गीत हे स्थानिक परंपरेचे मिथक गीत असून ही गीते तासनतास गायली जातात. या गीतांमध्ये कथानक असल्याने ती गायला काही तास लागतात. ही गीते सुद्धा सामाजिक व धार्मिक संमेलनात गायली जातात. नइवोगा हे गीत लग्नानंतरच्या कार्यक्रमात गायले जाते. नवरीला तिच्या नव्या घरी सोडताना तिच्या भावी आयुष्यासाठी आणि तिला उपदेश करण्यासाठी गायले जाते. इदू मिशमी नावाचे नृत्य हे बीजरोपण विधीनृत्य म्हणून ओळखले जाते. बारडो छाम हे नृत्य हे असत्यावर सत्याचा जय यासाठी केले जाते. 12 वाईट गोष्टींवर विजय असा या नृत्याचा अर्थ आहे. वाईट गोष्टींशी लढा देणे म्हणजे हे नृत्य. पोनुंग नृत्य हे तरूणींकडून केले जाते. एकमेकांचे हात धरून फेरा नृत्य केले जाते. अजि लामू नृत्य हे मोनपा नावाचे आदिवासी करतात. प्राण्यांचे मुखवटे तोंडाला बांधून पर्यटकांसमोर हे नृत्य सादर केले जाते. अशा प्रकारचे अनेक लोकनृत्य प्रकार राज्यात परंपरेने जतन केले जात आहेत. तनघका पेंटींग हे प्रसिद्ध पेंटींग समजले जाते. तनघका म्हणजे ध्वनीमुद्रीत संदेश. तीन प्रकारचे वाद्य अरूणाचल प्रदेशात आहेत. हवाईवाद्य, वस्तुवाद्य आणि तारवाद्य. उजूक तापू, जिंगरे तापू, प्युप तापू हे हवाई वाद्य समजले जातात. यात बाटली, कामट्या, बांबू, बोकडाचे हाड आदींचा वापर करून हवेच्या विशिष्ट फुंकण्याने ही वाद्य वाजतात. पोनू योकसी, अमे बाली, कीरींग, घुंगरू, इमूल हे वस्तुवाद्य आहेत. यात धातू, काठी, तार आदींचा वापर केला जातो व ते हाताने वा पायाने हलवून – ठोकून वाजले जातात. पुई नावाचे वाद्य हे तारवाद्य म्हणता येईल. यातून येणारा नाद ऐकण्यासारखा असतो. अरूणाचल प्रदेशात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यात ब्रम्हपुत्रा नदीचा उत्सवही आहे. या उत्सवाला सियांग नदी उत्सव म्हणतात. हा सण डिसेंबर महिन्यात साजरा केला जातो. पांगसाऊ उन्हाळी सण (अलिकडे साजरा होणारा), झिरो उत्सव (संगीतावर आधारलेला), सोलुंग उत्सव (शेती व्यवसायाशी निगडीत), नायोकुम उत्सव (नायोकुम या आदिवासींची मोठा उत्सव), लोसार उत्सव (मोनपा या आदिवासींचा सण), ड्री उत्सव (अपतानी या आदिवासींचा उत्सव) असे अनेक उत्सव अरूणाचल प्रदेशात धामधुमीत साजरे केले जातात. ब्रम्हपुत्रा, मानस, दिबांग, ड्री, कमेंग, लोहीत, पार, सुबानसिरी, तिराप, येपाक या नद्या अरूणाचल मधून वाहतात तर मिश्मी, डाफला, पातकई हे पर्वत अरूणाचलमध्ये आहेत. (लेखाचा उत्तरार्ध पूर्ण. या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात, ही विनंती.) डॉ. सुधीर राजाराम देवरेमोबाइल : 75886 18857Email : drsudhirdeore29@gmail.com,sudhirdeore29@rediffmail.com स्त्रोत - महान्युज