मध्य प्रदेशचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,08,245 चौरस किमी असून राजधानी भोपाळ आहे. भारतातील राज्यांच्या क्षेत्रफळात हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्यातील सर्वात मोठे शहर भोपाळ हेच आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 7,25,97,565 इतकी आहे. साक्षरता 70.63 टक्के आहे, तर राज्याची भाषा हिंदी आहे. राज्यात एकूण 51 जिल्हे आहेत. मध्य प्रदेश या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. मध्य प्रदेशातील सांची येथे भारतातील सर्वात भव्य स्तूप आहे. मालवा, बुंदेलखंड, बाघेलखंड, निमार, महाकोशल आणि गिर्द हे विभाग चंबळच्या खोऱ्यात आहेत. 1 नोव्हेंबर 1956 ला अविभाज्य मध्य प्रदेश राज्य अस्तित्वात आले. नंतर 1 नोव्हेंबर 2003 ला मध्यप्रदेश या राज्याचे विभाजन होऊन छत्तीसगड हे राज्य तयार झाले. उज्जैनवर अशोकाचे राज्य होते. सण 300- 500 नंतर गुप्त साम्राज्य आले. अकराव्या शतकात मुस्लिमांचे आगमन झाले. मोहम्मद गजनीचे आक्रमण झाले. मुहम्मद घोरीच्या दिल्ली साम्राज्यात समावेश करण्यात आला. नंतर मुघलांचे राज्य सुरू झाले. 1794 पर्यंत मराठ्यांचे वर्चस्व होते. नंतर उज्जैनचे लहान राज्यात विभाजन झाले. इंदुरची राणी अहिल्याबाई होळकर, गोंड महाराणी कमलादेवी आणि दुर्गावती या महिला शासक होऊन गेल्या. मध्य प्रदेशच्या पूर्वेला छत्तीसगड, पश्चिमेला राजस्थान व गुजराथ, उत्तरेला उत्तरप्रदेश आणि दक्षिणेला महाराष्ट्र ही राज्ये आहेत. मध्यप्रदेशातील 74.73 टक्के लोक खेड्यात राहतात. शेती व्यवसायातील 49 टक्के जमीन पेरणीयोग्य आहे. गहू, तांदुळ, ज्वारी, कापूस, तेलबिया, डाळी, सोयाबीन, हरभरा व जवस ही या राज्यातील मुख्य पिके आहेत. पेट्रोकेमिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन्स, अॅटोमोबाईल्स, ऑपटिकल फायबर निर्मिती. इंदुरजवळील पिथमुरला ॲटोमोबाईल उद्योग. भोपाळला भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड. होशंगाबादला सिक्युरिटी पेपर मील, देवासला बँक नोट प्रेस, नेपानगरला (न्यूज प्रिंट) वृत्तपत्रीय कागदाचा कारखाना. दगडी कोळसा, बॉक्साइट, लोहखनिज, मॅगनिज, फॉस्फेट, डोनामाइट, तांबे, चुनखडी इत्यादी खनिजांचे उत्पादन मध्य प्रदेशात होते. मध्य प्रदेशातील भगोरिया हा मुख्य सण आहे. शिवरात्री व रामनवमी, तानसेन संगीत समारोह, ग्वाल्हेर कालिदास समारोह, उज्जैन, खजुराहोचा नृत्य समारोह आदी समारोह पर्यटकांना आकर्षित करीत असतात. राज्यात लोकरंग नावाचा उत्सव दरवर्षी पाच दिवस केला जातो. 26 जानेवारीला हा उत्सव सुरू होतो. मध्य प्रदेश आदिवासी लोककला अकादमी या कार्यक्रमाचे आयोजन करते. यात प्रामुख्याने आदिवासी लोककला, हस्तकला, प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असते. प्रसिद्ध मंदिर खजुराहो हे प्रमुख आकर्षण आहेच. इथे खजुराहो नृत्य उत्सव साजरा केला जातो. हे मंदिर चंदेल कालखंडात इ.स.पूर्व 250 ते 1050 च्या दरम्यान बांधले गेले असावे असा अंदाज आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात हा उत्सव आठवडाभर सुरू असतो. ओडीशी, कुचिपुडी, कथकल्ली, भरतनाट्यम आदी नृत्य यावेळी सादर केले जातात. भारतातून आणि विदेशातून आलेले पर्यटक या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. तानसेन संगीत समारोहही मध्य प्रदेशातील महत्त्वाचा उत्सव आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम भारतीय अभिजात संगीताला वाहिलेला असून हा समारोह दरवर्षी नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात संपन्न होत असतो. पचमढी, भेडाघाटचा धुंधार धबधबा, कान्हा राष्ट्रीय उद्यानातील बारसिंगा आणि बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील ऐतिहासिक गुहा विशेष प्रसिद्ध. ग्वाल्हेर, मांडु, दतिया, जबलपूर, सांची, विदिशा, उदयगिरी, इंदुर व भोपाळ येथील प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारके. महेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन, चित्रकुट व अमरकंटक ही धार्मिक स्थळे. खजुराहोला जगप्रसिद्ध मंदिरे आहेत. (या पुढील उत्तरार्ध पुढच्या भागात...) लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे स्त्रोत - महान्युज