त्रिपुरा राज्य भारताचे त्याच्या ईशान्य भागातील एक घटक राज्य. क्षेत्रफळ १०,४७६ चौ. किमी. लोकसंख्या १५,५६,३४२ (१९७१). विस्तार २२°५६′ उ. ते २४° ३२′ उ. आणि १९° १०′ पू. ते ९२° २२′ पू. यांदरम्यान. हे उत्तर, पश्चिम व दक्षिणेकडून बांगला देशाने वेढलेले असून फक्त ईशान्येस भारतातील आसाम व मिझोराम राज्ये आहेत. राजधानी अगरतला. भूवर्णन या बव्हंशी डोंगराळ प्रदेशाच्या पूर्व भागात ४ दक्षिणोत्तर नदीखोरी आणि पश्चिम भागात पश्चिमेकडे उतरत जाणारा मैदानी भाग आहे. सर्वांत पूर्वेकडचे धर्मनगर खोरे पूर्वेच्या ६०० ते ९०० मी. उंचीच्या जमराई व पश्चिमेच्या ३०० ते ७५० मी. उंचीच्या सखन (साखोन) या डोंगररांगांच्या दरम्यान वाहणाऱ्या उत्तरवाहिनी देव, जूरी नद्यांचे आहे. उत्तरेत त्याचे रूपांतर उर्मिल सपाटीत होते व तेथे सधन शेती व दाट वस्ती असून, जूरी नदीकाठचा धर्मनगर हा बाजाराचा गाव आहे. या खोऱ्याच्या पश्चिमेस कैलाशहर खोरे १९ किमी. रूंदीचे असून ते सबंध दक्षिणोत्तर गेले आहे. त्याच्या पश्चिमेस लांगतराई डोंगररांगेत सर्वोच्च शिखर ४५७ मी. आहे. या खोऱ्यात मनू नदी व तिच्या उपनद्या आहेत. खोऱ्याचा दक्षिण भाग विच्छिन्न व वनाच्छादित, तर उत्तर भाग खुला व थोड्या दलदलीचा आहे व त्यात भातशेती आढळते. मनू नदीच्या उजव्या तीरावरचे कैलाशहर बाजाराचा गाव आहे. याच्या पश्चिमेच्या कमलपूर खोऱ्यातून उत्तरेकडे धालाई नदी वाहते. तिच्या पश्चिमेकडील अथारमुर रांगेची सर्वाधिक उंची ४४६ मी. पर्यंत आहे. या खोऱ्याचा दक्षिणेकडील भाग वनाच्छादित असून बाकीच्या भागात जंगलतोड झाली आहे. भात हे मुख्य पीक आहे. बाजाराचा गाव कमलपूर धालाईच्या डाव्या तीरावर आहे. चौथ्या व सर्वांत पश्चिमेकडच्या खोवई खोऱ्यात लोकवस्ती दाट आहे. खोऱ्याच्या पश्चिमेची देवतामुरा रांग २५० मी. पर्यंत उंचीची आहे. उत्तरवाहिनी खोवईच्या उजव्या तीरावर खोवई गाव आहे. सर्व उत्तरवाहिनी नद्या राज्याबाहेर सुरमेला मिळतात. राज्याच्या दक्षिणार्धातील सोनामुरा, उदयपूर, अमरपूर, बेलोनिया व साब्रूम या पाच उपविभागांत वाहणाऱ्या अनेक नद्यांपैकी सर्वांत मोठ्या गुमतीला बरेच दक्षिणवाही नालेओढे मिळतात व ती डोंगररांगा तोडून खोल दरीतून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत राधाकिशोरपूरजवळ सपाट प्रदेशात उतरते व शेवटी मेघनेला मिळते. त्रिपुराचा हा भाग जास्त खुला असून, यात शासकीय ठाण्याच्या गावांखेरीज खेडीही बरीच आहेत. सर्वांत विस्तीर्ण सपाट भूमी देवतामुरा डोंगररांगेच्या पश्चिमेस आहे. तिच्यावर सधन शेती व संपन्न खेडी असून, हाओरा नदीच्या उभय तीरांवर समुद्रसपाटीपासून अवघ्या १३ मी. उंचीवर अगरतला राजधानी वसली आहे. राज्यातील सखल भागात अनेक लहानमोठी तळी आहेत. त्यांपैकी मोठे रूद्रसागर सरोवर अगरतलापासून ५३ किमी. आहे. मृदा नदीखोऱ्यातल्या गाळाच्या प्रदेशातील मृदा सुपीक आहे. अन्यत्र जंगल जाळून फिरती शेती करणाऱ्या गिरिजनांच्या झुमिआ पद्धतीमुळे कुजलेल्या पाल्यापाचोळ्याची उणीव असून मृदा निकस आहेत. कमी डोंगरउतारावरही मृदा भुसभुशीत असल्याने पाणी धरून ठेवीत नाहीत. पावसाने त्यातील खनिजे धुपून जातात आणि नायट्रेट, फॉस्फेट, पोटॅश व सेंद्रीय द्रव्यांच्या अभावी मृदा अम्लिक झाल्या आहेत. हवामान त्रिपूरा राज्याचे सर्वसाधारण तपमान २०° ते ३०° से. असून हवामान समशीतोष्ण व आरोग्यपोषक आहे. वार्षिक पर्जन्य एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत १९० सेमी. आढळतो. वनस्पती व प्राणी राज्याची सु. ६२% भूमी वनाच्छादित असून वनस्पतीत शाल, गरजन, आर्द–पानझडी व सदाहरित वृक्ष, बांबू आणि मैदानी गवत यांचा समावेश होतो. वन्य पशू मुख्यतः हत्ती, रानरेडा, गेंडा, वाघ, चित्ता, कोल्हा, गवा, अजगर हे आढळतात. इतिहास परंपरागत समजुतीप्रमाणे चंद्रवंशीय ययातिपुत्र द्रुह्यूचा मुलगा बभ्रु याला कपिलमुनींनी या किरात देशाचा राज्याभिषेक केला. त्या वंशाचा पंधरावा राजा ‘प्रसेन’ दशरथाच्या अश्वमेघ यज्ञाला गेला होता. त्याचा वंशज ‘दैत्य’ हा अश्वत्थाम्याकडून धनुर्विद्या शिकला, तर नंतरचा ‘त्रिपूर’ याचे नाव राज्याला मिळाले. त्याचा पुत्र ‘त्रिलोचन’ युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात हजर होता व त्यानेच राजवंशाच्या चौदा कुलदेवतांची स्थापना केली. हा पुराणाख्यायिकांचा भाग सोडल्यास तेराव्या शतकात गौरच्या सुलतानाने त्रिपुरच्या परागंदा रत्न फा राजाला गादी परत मिळविण्यास मदत करून ‘माणिक्य’ ही वंशपरंपरागत पदवी दिली, असा इतिहासातला पहिला उल्लेख आहे. इतिहासकाळातही राज्याचा विस्तार सुंदरबनपासून ब्रह्मदेशापर्यंत व सागरापासून कामरूपपर्यंत होता. तेराव्या, चौदाव्या आणि सतराव्या शतकांत त्रिपुरावर मुसलमानांचे हल्ले झाले. सोळाव्या शतकातल्या पराक्रमी विजयमाणिक्य राजाने शेजारच्या इस्लामी राज्यावर मात करून त्याचा बराच प्रदेश जिंकला होता. अठराव्या शतकात मात्र मोगलांनी त्रिपुराचा मैदानी भाग आपल्या साम्राज्याला जोडला. डोंगरभागात तेवढे राज्य सुखरूप राहिले. १७६५ मध्ये बंगालची दिवाणी मिळाल्यावर इंग्रजांनी त्रिपुराशी राजनैतिक संबंध जोडला व क्रमशः तेथील राजा आपल्या तंत्राने चालेल अशी व्यवस्था केली. संस्थान खंडणी देत नव्हते; पण आजुबाजूच्या राज्यांशी संपर्क ठेवण्याचे स्वातंत्र्य त्याला उरले नाही. अठराव्या शतकाअखेर वीरचंद्र या राजाने प्रागतिक धोरण सुरू केले. १८७९ मध्ये गुलामीची व १८८८ मध्ये सतीची पद्धत त्याने बंद केली. तो साहित्य–कलांचा भोक्ता होता व रवींद्रनाथ टागोरांशी त्याचा परिचय होता. १९१९ पर्यंत मध्यवर्ती ब्रिटिश सत्तेला व नंतर १९३६ पर्यंत ईस्टर्न स्टेट्स एजन्सीला अंकित असलेले त्रिपुरा राज्य १९४९ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले. प्रथम ‘पार्ट सी’ राज्याचा त्याचा दर्जा १९५७ च्या राज्यपुनर्रचनेत बदलून तो केंद्रशासित प्रदेश झाला. १९६३ मध्ये त्याला विधिमंडळ व राज्यांतर्गत शासनाधिकार प्राप्त झाले. २१ जानेवारी १९७२ रोजी त्रिपुराला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. स्त्रोत: मराठी विश्वकोश