भारताची राजधानी दिल्ली असून भारतातील सर्वात मोठे शहर हे मुंबई असून भारताची आर्थिक राजधानी सुद्धा मुंबईच आहे. देशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,287,263 चौरस किमी इतके आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1,210,854,977 इतकी आहे. (आजची-2017 ची लोकसंख्या 1,293,057,000 इतकी असावी.) भारताची साक्षरता 86.43 टक्के आहे. भारताच्या राष्ट्रीय अधिकृत भाषा हिंदी आणि इंग्रजी या असल्या तरी देशात त्या त्या राज्याच्या प्रांतीय भाषा अधिकृत मान्यताप्राप्त आहेत. दंतकथेतील भरत वंशावरून देशाचे नाव भारत झाले असा समज आहे.

वेदकालापासून भारताचा ज्ञात इतिहास आहे. ख्रिस्तपूर्व 3101 हा वेदकाल समजण्यात येतो. भारताचा प्राचीन कालखंड इ.स. पूर्व 400 – इ. स. 1000 आहे. प्राचीन काळात सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, चक्रधरांचा महानुभाव पंथ व ज्ञानेश्वर यांचा समावेश करता येईल. ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून अर्वाचीन इतिहास म्हणता येईल. विसाव्या शतकात भारतात खूप वेगाने घटना घडत होत्या.

भारत देश हा अनेक राज्यांमध्ये विभागलेला होता. भारतात अनेक संस्थानात अनेक राजे राज्य करत होते. परकीयचक्र येऊन अनेक राजांनी स्थानिक राजांना हरवून भारताच्या विविध भागात आपले बस्तान बसवले होते. इंग्रजांची सत्ता ही भारतावर शेवटची सत्ता होती. भारतातील विविध स्थानिक राजांची राज्य खालसा करून इंग्रजांनी एकछत्री अंमल सुरू केला. इंग्रजांनी जवळ जवळ दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर अनेक स्वांतत्र्य सैनिकांच्या चळवळीने आणि बलिदानाने शेवटी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. आणि 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून भारत जगात ओळखला जातो. 15 ऑगस्ट 1947 ला भारत दोन देशात विभागला गेला. भारताच्या राजकारणात असलेल्या जीना यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने भारतातून पाकिस्तान हा मुस्लीम धार्जिणा देश निर्माण झाला. तरीही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लीम लोकसंख्या आज भारतात आहे. पाकिस्तान ज्या धार्मिक पायावर स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला तो आज विफल झाला असून जगातला अविश्वसनीय देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. जगातील अनेक दहशतवादी पाकिस्तानात राजरोसपणे वास्तव्य करू शकतात.

भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर तर उत्तरेला हिमालय पर्वत आहे. भारताच्या वायव्य ते पूर्व दिशेपर्यंत अनुक्रमे पाकिस्तान, चीन, तिबेट, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार (ब्रम्हदेश) या देशांच्या सीमा आहेत.

भारत हा देश लोकसत्ताक गणराज्यांचा असून विविध वंश, जाती, धर्म मिळून येथील लोक गुण्यागोविंदाने राहतात. औद्योगिक राष्ट्रात भारताचा दहावा क्रमांक लागतो. भारताची तटीय रेखेची लांबी 7516.6 किमी. (अंदमान, निकोबार व लक्षद्विपसह) आहे.

प्राकृतिकरीत्या भारताचे पाच विभाग पडतात. ते पुढीलप्रमाणे:

उत्तरेकडील हिमालय पर्वत श्रेणी

उत्तरेचा मैदानी प्रदेश

द्विपकल्पांचे पठार

तटीय मैदानी प्रदेश

बेटे असे हे पाच विभाग.

भारतात अनेक खनिजे, वने आणि वनस्पती आढळतात. बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र होते. भारत हा प्रचंड मोठा देश असल्याने देशात भौगोलिक विविधता दिसून येते. कुठे असह्य असे प्रचंड ऊन- उष्णता तर कुठे कडाक्याची थंडी, कुठे एप्रिल महिन्यातही पडणारे बर्फ, कुठे रोज पडणारा पाऊस तर कुठे भाजून टाकणारे वाळवंट. अशा असमान वातावरणात प्रचंड तफावतीचा भारत हा देश आहे.

हिंदू – 79.8%, इस्लाम - 14.2% , ख्रिश्चन - 2.3%, शिख -1.7%, बौद्ध - 0.7%, जैन - 0.4%, आणि 0.9% इतर धर्मिय लोक. जगातील सर्व प्रमुख धर्माचे लोक भारतात राहतात. भारत हे निधर्मी राष्ट्र असून भारतातील लोक सहिष्णु आहेत. या व्यतिरिक्त अनेक पंथ, संप्रदाय आपापल्या परंपरा पाळताना दिसतात.

लेखक - डॉ.सुधीर राजाराम देवरे

स्त्रोत - महान्युज