मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 22,327 चौरस किमी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 27,21,756 इतकी आहे. राज्यात साक्षरतेचे प्रमाण 79.85 टक्के आहे. मणिपूर राज्यात नऊ जिल्हे आहेत. राज्याची प्रमुख भाषा मणिपुरी ही आहे. 21 जानेवारी 1972 ला मणिपूर राज्याची स्थापना झाली. अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात असूनही मणिपूरचा अत्यल्प लिखित इतिहास उपलब्ध आहे. इतिहासकारांच्या मते पाखंग्बा हा इसवी सन तेहतीस मध्ये सात प्रमुख प्रदेशांपैकी एका प्रदेशाच्या गादीवर आरूढ झाला व त्याने एका प्रदीर्घ राजघराण्याची स्थापना केली. इसवी सन 1891 पर्यंत या घराण्याचे मणिपूरवर राज्य होते. 1949 ला ‘क’ प्रभागातील राज्य म्हणून भारतीय संघराज्यात मणिपूरचे विलीनीकरण झाले. आधी तीस निर्वाचित व दोन नामनिर्दिष्ट सदस्य असलेल्या प्रादेशिक कौन्सिलची स्थापना झाली. 1963 मध्ये (टेरीटोरीज अॅक्ट) नुसार प्रदेशात विधानसभा स्थापित झाली. प्रशासक पातळीचा दर्जा, मुख्य आयुक्तपासून लेफ्टनंट गव्हर्नरपर्यंत मिळाला. नंतर तो 19 डिसेंबर 1969 पासून वाढवला. 21 जानेवारी 1972 मध्ये मणिपूरला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. तेव्हापासून साठ निर्वाचित सदस्यांची विधानसभा स्थापित झालेली. राज्य भौगोलिकदृष्ट्या दोन प्रभागात विभागले जाते. पाच जिल्ह्यांचा पर्वतमय प्रदेश व चार जिल्ह्यांचा सपाट प्रदेश मिळून मणिपूर राज्य आहे. पूर्वेला (ब्रम्हदेश) म्यानमार, उत्तरेला नागालँड, पश्चिमेला आसाम व नागालँड आणि दक्षिणेला म्यानमार व मिझोराम ही सभोवतालची राज्ये आहेत. ग्रामीण भागातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय तसेच राज्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. 1946 ला लहान प्रमाणात सुरू झालेल्या शेतीच्या वेगवेगळ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा प्रशिक्षित अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग राज्याने निर्माण केला आहे. 17384 चौरस किमी जंगल क्षेत्रापैकी 1467 चौरस किमी क्षेत्र राखीव जंगल आहे. 4171 चौरस किमी संरक्षित जंगल व 11746 चौरस किमी क्षेत्र हे अवर्जीकरण जंगलक्षेत्र आहे. उखरूल जिल्ह्यातील सिरॉय खेड्यात वाढणारी सिरॉय लिली (लिलीयम मॅकलीनीज) ला नंदनवनातील फूल म्हणतात, ते जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. झ्युको खोरे दुर्मिळ वनस्पतींचे आगार आहे. इथल्या वनस्पती जगात कुठेही उगवत नाहीत. तर कपाळी शिंगांची हरिणी ह्या फक्त मणिपूर मध्येच आढळतात. स्थानिक भाषेत त्यांना संगाई म्हणतात. केबूल लामजाब हे जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान मणिपुरात आहे. लाई- हरोबा रास लिला, चैराओबा, निंगोल, चकीबा, रथजत्रा-ईद-उल-फित्र, गानगाय, लुईगाईनी, ईद-उल-जुहा, यायोसंग (होली), दुर्गापूजा, मेरा हौचौगंबा, दिवाळी, कुट, चुंफा, चेइराओबा, कांग आणि हेइक्रु हीडोंगबा, ख्रिसमस इत्यादी सण व उत्सव मणिपूर मध्ये उत्साहात साजरे केले जातात. राज्याची प्रमुख भाषा मणिपुरी असली तरी राज्यात काही घटक बोली बोलल्या जातात त्यांची भाषा व त्या कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे : अैमोल - अैमोल; आनल – आनल; चिरू - चिरू; चोटे - चोटे; गांगटे – गांगटे; हमार - हमार; काबुई - नागा-काबुई; कोझिंग - कोझिंग; कोम – कोम; लम्गाँग - लम्गाँग; माओ - नागा माओ; मराम - कोईरावो, नागा-मराम; मारिग - नागा- मारिग; मोन्साग – मोन्साग; मोयोन – मोयोन; पाइटे - मिझो- पाइटे; तांग्खूल - नागा- तांग्खूल; वाइफेई – वाइफेई; थाडो – थाडो; झोऊ - झोऊ मणिपूर मध्ये असे 29 प्रकारचे आदिवासी लोक राहतात आणि त्यांना स्वतंत्र आपापल्या भाषा आहेत. मणिपुरी लोक हे गंधर्व म्हणून ओळखले जातात. तसेच ते संगीतकार आणि नृत्य कलाकार आहेत. वैदिक परंपरांचे ते गायन करतात, आपल्या नृत्यातून वैदिक परंपरा साकार करतात. म्हणूनच मणिपूरला गंधर्वदेश असेही म्हणतात. खुल्लोंग इशेइ, पेना इशेइ, लाइ हारोबा इशेइ असे मणिपुरी लोक संगीताचे प्रकार आहेत. रास लिला, थांग टा, ढोल चोलोम, खांबा थोइबी नृत्य, मैबी नृत्य, नुपा पाला आदि लोकनृत्य मणिपूर मध्ये विविध आदिवासींकडून सादर केले जातात. खैरम्बद बाजार हा संपूर्ण महिलांनी चालविलेला भारतातील सर्वात मोठा बाजार आहे. उखरूल हे थंड हवेचे ठिकाण. केईबुल लामजावो इथले लोकतक सरोवर व लोकतक सरोवराजवळील राष्ट्रीय उद्यान हे जगातील एकमेव तरंगते उद्यान आहे. एकशिंगी हरणे फक्त इथेच पहायला मिळतात, माओ हे थंड हवेचे ठिकाण, मोईरंग येथील आझाद हिंद सेनेचे स्मारक, सिरोही हिल्स आणि राष्ट्रीय उद्यान, गोविंदजी टेंपल, वार सेमिस्ट्रीज, शहीद मिनार, नुपीलाल मेमोरिअल, इम्फाळ, खोगोपात, आर्ची, डेरियम मेमोरियल, केबुल लामजी राष्ट्रीय उद्यान, विष्णु टेम्पल, विष्णुपूर, सेंद्री मोरहे, झुको व्ह्याली, स्टेट म्युझियम, केना टुरिस्ट होम, खोंग्जाम बार मेमोरियल आदी पर्यटन स्थळे महत्त्वाची समजली जातात. इंफाळ, उखरू, बिष्णुपूर, थौउबाल, चानदेल, सेनापती, तामेनग्लोंग, चौराजीनपुर आदी गावांजवळ अनेक पर्यटन केंद्रे पाहण्यासारखी आहेत. मनिपूरला भारताचे स्वित्झर्लंड म्हटले जाते. निसर्गावर प्रेम करणारे लोक मनिपूरला मुद्दाम भेट देतात. मणिपूरच्या निळ्या टेकड्या आकर्षिक करतात. मणिपूरला भारताचा हिरा असे नेहरूंनी म्हटले होते. मणिपूरला आठ महत्त्वाच्या मोठ्या नद्या आहेत. मणिपूर, इंफाळ, इरील, नामबुल, सेकमाइ, चाकपी, थौऊबाल आणि खुगा या त्या आठ नद्या असून या व्यतिरिक्त काही उपनद्याही आहेत. (या व्यतिरिक्त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात, ही विनंती.) लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे स्त्रोत - महान्युज