एम. एल. वसंतकुमारी (३ जुलै, १९२८ - ३१ ऑक्टोंबर, १९९०) मद्रास ललितांगी वसंतकुमारी ज्या "एमएलव्ही" या नावानेही लोकप्रिय आहेत.भारतीय उत्तर हिंदुस्थानी संगीत व कर्नाटक संगीतातील पुरुषप्रधान गायकी संस्कृतीमध्ये त्यावेळी एम. एल.वसंतकुमारी आणि त्यांच्या समकालीन डी. के. पट्टममल, एम एस सुब्बलक्ष्मी यांना कर्नाटक संगीतातील महिला त्रिमूर्ती म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते. कर्नाटक व उत्तर हिंदुस्थानी संगीतातील शास्त्रीय गायिका,भारतीय विविध भाषेतील चित्रपट गीतांसाठी कर्नाटक संगीतकार, चित्रपटांसाठी पार्श्वगायिका म्हणूनही एम.एल.वसंतकुमारी लोकप्रिय आहेत.तर संगीत कलानिधी या पुरस्काराने गौरवित करण्यात आलेल्या सर्वात तरुण महिला गायिका म्हणजे एम. एल. वसंतकुमारी. ३ जुलै,१९२८ रोजी मद्रास येथे एका सांगीतिक परंपरा लाभलेल्या कुटुंबात एमएलव्ही यांचा जन्म झाला होता. ब्राह्मण वडील कुथानुर अय्या स्वामी अय्यर हे सुप्रसिद्ध संगीतकार होते तर त्यांची देवदासी वंशाच्या आई ललितांगी या देखील एक उत्तम संगीतकार होत्या.मात्र मुलींने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करावे अशी आई-वडिलांची इच्छा होती. एमएलव्ही यांचे शालेय शिक्षण मद्रास येथे एका कॉन्व्हेंटमध्ये झाले. तिने शाळेत वरिष्ठ केंब्रिज पूर्ण करून इंग्रजी विषयामध्ये प्राविण्य प्राप्त केले. यामुळे त्यांच्या संगीतातून प्रतिबिंबित होणारी त्यांची तीव्र बुद्धी विकसित झाली. घरातील सांगीतिक वातावरणामुळे एमएलव्ही यांना संगीत गाण्याची सवय व आवड होती. एकदा त्यांचे सांगीतिक गुरू जीएनबी (गुडलुर नारायणस्वामी बालसुब्रमण्यम) यांनी एमएलव्हीचे गायन ऐकले आणि तिला संगीत शिकवण्याचा तिच्या आई-वडिलांकडे आग्रह केला. तेव्हापासून एमएलव्ही यांचे जीएनबी यांच्याकडे संगीतातील पहिल्या शिष्या म्हणून संगीताचे विधीवत शिक्षण सुरू झाले. आपल्या महान गुरूंची योग्य शिष्या म्हणून एमएलव्ही यांनी स्वतःला सिद्ध केले. आपल्या गुरूंनी दिलेल्या सल्ल्याचे व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करत एमएलव्ही यांनी संगीतातील सर्वोत्कृष्ट गुण आत्मसात केले मात्र या काळात त्यांनी आपल्या गुरूंचे कधी अनुकरण केले नाही. एम. एल. वसंतकुमारी यांनी आपल्या गुरूच्या म्हणजेच जीएनबीच्या अद्वितीय बाणीप्रमाणेच आपल्या मूळ गाण्याची स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली. वयाच्या १२व्या वर्षापासून एम. एल. वसंतकुमारी यांनी आपली सांगीतिक कारकीर्दीची सुरुवात केली. सन १९४०मध्ये आपल्या आईवडिलांच्या परवानगीने एमएलव्हीचे पहिले स्वतंत्र गायन शिमला येथे झाले. तर अवघ्या दोन वर्षानंतर एम. एल.व्ही यांनी बेंगलोर मध्ये आपले स्वतंत्र एकल गायन केले. त्यावेळी त्यांची पहिली ७८आरपीएम डिस्क देखील तयार करण्यात आली. ज्यामुळे त्या काळातील अनेक पुरुषप्रधान गायक, संगीतप्रेमी, संगीत कलावंत यांच्यामध्ये खळबळ उडाली होती. सन १९५० पर्यंत मद्रास ललितांगी वसंतकुमारी यांनी एक स्टेज आर्टिस्ट म्हणून स्वतःमधील असणारी अलौकिक सांगीतिक गुण स्थापित केले. ज्यामुळे त्या हळूहळू एमएलव्ही या नावाने प्रसिद्ध होऊ लागल्या. एम.एल.वसंतकुमारी राग आलापना व निरावल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजामुळे उत्कृष्टपणे सादर करत. स्वरप्रस्थारामध्येही त्या प्रेरणादायीपणे सर्जनशील,अत्यंत तरलतेसह आश्चर्यकारक स्वर संयोजनासह आपले गायन सादर करत. वसंतकुमारीच्या कुचेरिंमध्ये सामान्यतः रागम, थनम, पल्लवी, वर्णम,संकरीभरणम्, कल्याणी, भैरवी, कंबोजी, तोडी, खरारप्रिया या प्रमुख रागातील कृत्यांशिवाय अमृतावर्शिनी, मोहनम, अरबी, अंडोलीका, हिंदोलम, पुर यासारख्या रागातही वसंतकुमारीच्या कृत्यांचा समावेश होतो. त्यांनी नारायण तीर्थ यांची "कल्याण गोपालम" ही रचना राग सिंधू भैरवी मध्ये प्रस्तुत करून लोकप्रिय केली. तसेच पुरंदरदास यांच्या गीतांचे उत्कृष्ट प्रस्तुतीकरण हे एम. एल. वसंतकुमारी यांच्या मैफलीचे प्रमुख आकर्षण होते. पुरंदरदासांची "व्यंकटेशचला निलयं" ही सिंधूभैरवी मधील रचना खूप लोकप्रिय झाली होती. एम.एल.वसंतकुमारी यांच्या मैफलीमध्ये मृदंग वादक पालघाट मणी अय्यर तसेच मन्नारगुडी एस्वरण, श्रीमुष्नम व्ही राजा राव, सेरकाझी जे स्कंदप्रसाद, तिरुवरुर बकथावथसलम, आर. रमेश, कराईकुडी कृष्णमूर्ती, जी. हरिशंकर यांना आपल्या सोबत साथ-संगत करण्यासाठी संधी व प्रोत्साहन देऊन आपल्या विविध मैफली सादर केल्या. व्हायोलिन वादक ए. कन्याकुमारी यांच्यासोबत त्यांनी दोन दशकांपेक्षा जास्त काळ मैफली सजवलेल्या आहेत. सन १९४६ पासून एमएलव्ही यांनी आपली पार्श्वगायनाची कारकीर्द सुरू केली. त्यांचा पहिला मोठा चित्रपट सन १९५१ मध्ये "मन मागल " होता. यामध्ये त्यांनी रागमालिकेमधील "एल्लाम इनबामायम" हे गीत तसेच सुब्रमण्यम भारथियार यांची सदाहरित रचना "चिन्नमचिरू किलया" गायले होते. सन १९५१ मध्ये "अरे इरवू" या चित्रपटात "अय्या सामीही" गायले होते. हे गाणे समाधी या चित्रपटाच्या गोरे गोरे या गाण्यावर आधारित होते. जे क्युबान पीट या चित्रपटाच्या पोर्तो रिकोमधील लॅटिन अमेरिकन गाणे चिको चिको या गीतावरून तयार करण्यात आले होते. तसेच सन १९५२ मध्ये " थयुलम" या चित्रपटात एमएलव्ही यांनी "कोंजुम पुरवे" हे गीत गायले, जे "थंडी हवाये " या प्रसिद्ध हिंदी गाण्यावर आधारित होते. एमएलव्ही यांनी गायलेल्या इतर गाण्यांमध्ये वैरमालाई, विक्रमादीथियान आणि सोरनाकिली या चित्रपटांमध्ये अदीस्याम वनाथू अरिवूमायम, सेंटमराई कन्नने, वन्ना तमिझ आणि अडूम अरुल जोती यांचा समावेश आहे. या सर्व गाण्यांमध्ये कल्याणी रागाचा उपयोग केला होता ज्याला त्यावेळी उत्तम प्रतिसाद मिळाला. एमएलव्ही यांनी “मुन्नीता पवलींचू नागाशायना” सारख्या दशावतारातील गाणे सुरेखपणे गायले. एम. एल. वसंतकुमारी यांनी सन १९५१ मध्ये कैलामानी विक्टम आर. कृष्णमूर्ती यांच्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा के. शंकररामन आणि मुलगी के.श्रीविद्या हे होते. मुलगी के. श्रीविद्या या उत्तम गायिकासोबतच भारतीय चित्रपटातील उल्लेखनीय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. एम.एल.वसंतकुमारी यांनी सन १९४६ पासून सन १९७० ह्या कालावधीत हिंदी, कन्नड, मल्याळम, तेलुगु तामिळ या विविध भाषांमधील चित्रपटांमधून पार्श्वगायन केले.या सर्व चित्रपटांमधील गाणी सुपरहिट झाली. यामध्ये १. हिंदी भाषिक चित्रपट : - एमएलव्ही यांनी हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलेल्या चित्रपटांपैकी श्री.संपत(१९५२),चोरी चोरी(१९५०) या चित्रपटात पार्श्वगायन केले. २. कन्नड भाषिक चित्रपट : - एमएलव्ही यांनी कन्नड भाषिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलेल्या चित्रपटांपैकी बेदारा कण्णप्पा (१९५४), मायाबाजार(१९५७), भुकेलास(१९५८), श्री. पुरंदरा दासरू (१९६७) या चित्रपटात पार्श्वगायन केले. ३. मल्याळम भाषिक चित्रपट :- एमएलव्ही यांनी मल्याळम भाषिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलेल्या चित्रपटांपैकी प्रसन्ना(१९५०), कंजना(१९५२), आशादीपम (१९५३), बेदारा कांनाप्पा (१९५४), कुडापिरप्पू (१९५६), थस्करविरे (१९५७), चथूरंगम(१९५८), सिथा (१९६०), कृष्णा कूचेला(१९६१), उममिनी थांका (१९६१), सुशीला (१९६३), पिंचुहृदयम्(१९६५), शकुंतला (१९६५) या चित्रपटात पार्श्वगायन केले. ४. तेलगू भाषिक चित्रपट : - एमएलव्ही यांनी तेलगू भाषिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलेल्या चित्रपटांपैकी बीडला पाटलू (१९५०), नववीते नवरत्न, पेल्ली कुतरू, सौदामिनी (१९५१), कांचना, मुग्गुरु कोडूकुलु (१९५२), इन्स्पेक्टर, कोदरी काम, ना इल्लू (१९५३), श्री कलहातिश्वर महात्म्य (१९५४), आदर्श सती(१९५५), नागुला चवथी (१९५६), भाले अम्मायलू, मायाबाजार, सती अनुसया (१९५७), भुकेला (१९५८), जयभेरी (१९५९) या चित्रपटात पार्श्वगायन केले. ५.तामिळ भाषिक चित्रपट : - एमएलव्ही यांनी तामिळ भाषिक चित्रपटांमध्ये सर्वाधिक पार्श्वगायन केलेल्या चित्रपटांपैकी कृष्णभक्ती, राजमुक्ती(१९४८), कण्णीयिनी कथाली, नल्लाथांबी, नामनाडु, वाजकाई (१९४९), एझाई पदुम पाडू, मंथिरी कुमारी, परिजाथम(१९५०), मनमागल, मायामालाई, ओर इरावू, राजमबल, सौदामिनी (१९५१), अंदमान कैदी, एन थंगाई, कांचना, मुंड्ररु पिलॅगल,पनम, परसाक्षी, पेन मनम, पुरती वीरा, श्यामला, थाई उल्लाम,वेलकरी मगल (१९५२), आशाई मगन, अंबू, एन विडू, गुमस्थ, इन्स्पेक्टर, जथगम, कंगाल, मामियार, मनम पोला मंगल्यायम, मनिधानम मिरूगमम, मॅनिथन, मारूमागल,नलवार, नाम, वाझ पिरमधवल, उलागम (१९५३), अम्मा यप्पन, कनाऊ, कुडूम्बम, पुठू युगम, रथा कंनेर, रथ पासम, थुकाकु थूककी, थुली विशाम, वैरी मलाई (१९५४), कळवळीन कडाळी, कावेरी, कोटेस्वरण, माहेश्वरी, वल्लीइन सेलवान(१९५५),आमारा दिपम, कालम मारी पोचू, कनिन मनिगल, कूलादेवम, मदुरै विरान,ओंद्रे कुलम, पुन्नीवाठी, राजा राणी, थाईककुपी थाराम(१९५६), चक्रवर्ती तिरुमागल,इरू सगोधारिगल, कर्पू करासी, मायाबाजार राणी ललिथंगी, सौभाग्यवती, वानंगमुडी (१९५७), भक्त रावण, कनिनी सबथम , मंगलम भाग्यम् (१९५८), कलैवानन, कल्यानिकु कल्याणम, कावेरी कानवन, ममियार मेचिना मारूमागल, मतीमेकालाई, मींनल विरन,ओरे वाजळी, पेन कूलॅथिन पोंविलाकाकु,अध्यक्ष पंचायताराम, थंगा पादूमाई (१९५९), मन्नाधी मन्नान, मींदा सॉरगम, पार्थीबन कानाऊ, पेट्रा मनम, राजभक्ति, राजा देसूनु, थिलकाम (१९६०), कोंगुत्त्तु थांगम, मल्लथाम मंगलम (१९६१), विक्रमाधीथन(१९६२), मॅग्नेय केल (१९६५), रंगूला रत्नम (१९६६) या चित्रपटात पार्श्वगायन केले. एम.एल.वसंतकुमारी यांनी कर्नाटक संगीतातील अनेक संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपट गीतांचे पार्श्वगायन केले. यामध्ये एस. दक्षिणामूर्ति, जी. रामनाथन, सी.आर. सुब्बुरमन, एस. एम. सुबय्या नायडू, के राघवन, शंकर-जयकिशन, के. व्ही.महादेवन, मास्टर वेनवा, चित्तोर व्ही., वेधा, टीआर पप्पा, विश्वनाथन राममूर्ती, जी. व्ही.दक्षिणामूर्ति, टी. चलापती राव, एम. एस. ज्ञानमनी, आर गोवर्धनम्, नागैय्या, जी. अस्वस्थामा, टी.जी. लिंगप्पा, एस. व्ही. वेंकटरमण, के. जी. मूर्ती, जी. देवराजन, एस. राजेश्वरराव, सी. एन.पांडुरंगन, पेंदयाला नागेश्वरा राव, के. राघवन, आर. सुधारसनम, कुंनाकुडी व्यंकटरमण अय्यर, जी. गोविंदाराजूलु नायडू, टी.ए. कल्याणम, घंटाळा, सी.एस. जयरामन या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या विविध चित्रपट गीतांचे पार्श्वगायन एमएलव्ही यांनी केले. एम. एल. वसंतकुमारी यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्या काळातील अनेक गायक व गायिकांसोबत युगलगीत (डुएट्स) यांचेही पार्श्वगायन केले. यामध्ये ए. एम.राजा, तिरूची लोगानाथन,सेरकाझी गोविंदराजन, एस जयरमन, पी. बी. श्रीनिवास, के. जे. येशुदास, के. एस. जॉर्ज, टी.ए. मोथी, व्ही. दक्षिणामूर्ति, एम.के. त्यागराज भगवथर, जी.के. वेंकटेश, व्ही. एन. सुंधाराम, टी.एम. सुंदरराजन, सी.आर. सुबुरबन या गायकांसोबतच, राधा जयलक्ष्मी, पी. लीला, टी.व्ही. रथीनम, एस. जानकी, के. जमुनारानी, सुलंगमलम राजलक्ष्मी, टी.एस. बागवती, वाणी जयराम, ए. पी.कोमला, पी. सुसीला, पी. भानुमाथी, के. एस. छित्रा, जीकी, एन.एल.गणसरस्वती या गायिकांसोबतही एमएलव्ही यांनी अनेक चित्रपट गीतांचे पार्श्वगायन केले. एम. एल. वसंतकुमारी यांनी आपल्या २४ - २५ वर्षाच्या पार्श्वगायन कारकिर्दीमध्ये अनेक चित्रपटगीतांचे गायन केले. यामध्ये १९४८ - राधा समिधा कृष्ण, इंद्र वेदुगो-हे राघवा(कृष्णभक्ती), एन्ना आणंदम, संध्यामशाही अंबर वरुव(राज मुक्ती), १९४९ - पुवी राजा, कानबाबा (कण्णीयनी कथाली), १९५० - युवान्मे आहा यौवणामे, सरसाकू राडे आणे( बीडाला पाडलू), नियय मिलादी बामा, थुलासी जगन्माता, पिराना नाथने, १९५१ - आंबे एम शिवमे, अंदरू लावये, मारा सुंदरा मधु आज आहे. (सौदामिनी), १९५२ - शिवकामेश्वरीम, मायात्व,(कांचना), अच्छे दिन आ रहे है, (श्री संपत), एझाईन, कोयले एन एडीम, (पनाम), १९५३ - जगदानंदकर, जननी जयिक्का निनाल, शरणम मयिलावाहना,(आशादीपम), अययाविन पेनडॅटिकू, डान्स बेबी डान्स, (गूमस्थ), आदीगादीगो गगाना सिमा, आरए एमए इटीडाका,(ना इल्लू), १९५४ कण्णाना थाई नाडे, एलीओरकु सुगा वाईवा इथू, इंगुम थाई पोंगल,(कणाऊ), १९५६ - नाला विनाई आयडे, व्हेली नीलावीलाईल,आरारो असई, अनविन धीपामिधे,(कनीन मनिगल), थिलना, (चोरी चोरी), १९५७ - कण्णाले मनंधी मन्नरम (राणी लालिथांगी),१९५८ - चल्लामुदन देवर कलम, (मायाबाजार), मां रूप नवा शोबाना,(सती अनुसया), १९५८ - क्षीरब्धी वरधामा नागा सयाना, (भूकैलास), १९५९ - कट्टे वा कडले वा, ओडककु झलम, (चथुरंगम), मोगणा रंग यंनाई, मैथूनरे मैथूनार, इल्लवू कथा कीलीपोल (ममीयार मेचीना मारू मागल), १९६० - अंधे मायंगुथाडी, वादिवेरू थिरूसुलम, मुंनम अवाणूदय,(पार्थिबन कानवू), १९६३ - थालोलाम(सुशीला), १९६५ - कामवधिनिम, कालील चिलंका, गुरुर्ब्रह्मा, (शकुंतला), १९६७ - आडीदानो रंगा, (श्री पुरंदर दासरु) या चित्रपट गीतांचे पार्श्वगायन केले. एम. एल. वसंतकुमारी या ज्याप्रमाणे एक उत्कृष्ट गायिका, संगीतकार, पार्श्वगायिका होत्या त्याचप्रमाणे त्या एक उत्तम गुरुही होत्या. आपल्या सांगीतिक प्रवासामध्ये त्यांनी आपल्या गुरूकडून प्राप्त केलेले ज्ञान आपल्या शिष्यांना भरभरून देत अनेक उत्तम शिष्य तयार केले. ज्यामध्ये त्यांची मुलगी श्रीविद्या, तर प्रथम शिष्या म्हणून सरस्वती श्रीनिवास यांच्यासोबतच सुधा रघुनाथन, चारुमाथी रामचंद्रन, ए. कन्याकुमारी, यमुना अरुमुगम, व्ही. कावेरी, मीना सुब्रमण्यम, योगम संथानम, त्रिचूर व्ही रामचंद्रन, गुलाब मुरलीकृष्णन, वानजा नारायणन,टी. एम. प्रभावती, निर्मला श्रीनिवासन, जयंती मोहन, योग संथनम, टी.एम. प्रभावती, बा.मा. विश्वेश्वरन, जयंती श्रीधरण, मीना सुब्रमण्यम, असे अनेक गायक-गायिका व संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत.तसेच त्यांची शिष्या जिद्द कृष्णमूर्ती यांनी सुरू केलेल्या ऋषी व्हॅली या स्कूलमध्येही त्यांनी संगीताचे शिक्षण दिले. एम एल व्ही त्यांच्या सांगीतिक योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कार देण्यात आलेले आहेत. १. भारतीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार -१९७० २. म्हैसूर विद्यापीठ यांच्याद्वारे पुरंदरदास यांच्या कार्यासाठी डॉक्टरेट पदवी - १९७६. ३. भारत सरकार तर्फे पद्मभूषण - १९७७ ४. भारतीय ललित कला संस्था चेन्नई यांच्याद्वारे संगीत कलासिखमनी पुरस्कार. - १९८७. वयाच्या ६२व्या वर्षी म्हणजेच ३१ ऑक्टोबर, १९९० रोजी चेन्नई येथे त्यांचे निधन झाले.