अमीर खुसरो : एक अद्वितीय सारस्वत हजरत अमीर खुसरो हे चिस्ती सुफी काळातील महान संतकवी (फारसी व हिंदवी),लेखक, साहित्यकार, कहानीकार, भाषाविद्वान, इतिहासकार, कोशकार, खगोलशास्त्रज्ञ, ज्योतिषी, हकीम, पत्रकार, वादक, खत्तात(सुलेखक), कातीब(लेखक), गायक, संगीतकार, गीतकार, बहुभाषिक, व्यंगचित्रकार, नर्तक, दूरदर्शी, पुस्तकालयाध्यक्ष, मूळ रुपातील फारसी भाषेतील शायर आणि आजच्या आधुनिक ब्रजभाषा व हिंदीमधील प्रथम कवी, विविध प्राणी व पक्ष्यांचे आवाज ओळखणारे शूर सेनापती होते. त्यांचे वडील अमीर मोहम्मद सैफुद्दीन हे आशिया खंडातील तुर्कस्तान देशातील कश या शहरातील तुर्की लाचीन कबील्याचे सरदार होते. मात्र मंगोलियन शासक चंगेज खान यांच्या आक्रमणास कंटाळून सुख व शांती यासाठी बलबन (सन १२६६ - १२८६) याचे वंशज शमशुद्दीन इलतुत्मिश यांच्यासोबत प्रथम लाहोर येथे पुढे दिल्लीमध्ये आले. त्यावेळी त्यांना अमीर हे पद तसेच पटियाली (मोमिनाबाद/मोमीनपूर) जिल्हा एटा उत्तरप्रदेश राज्यातील हा प्रदेश जहागिरी म्हणून देण्यात आला होता. याच काळात त्यांचा विवाह बलबनचे सेनापती ऐमादूलमुल्क रावत अर्ज यांची मुलगी मायादेवी ज्यांचे पुढे दौलतनाज किंवा सय्यदा मुबारक बेगम हे नाव ठेवण्यात आले. यांना सन १२५३ मध्ये मुलगा झाला. त्याचे नाव अबुल हसन यमीमुद्दीन मोहम्मद(अमीर सैफुद्दीन खुसरो) ठेवण्यात आले जे पुढे अमीर खुसरो या नावाने ओळखले जाऊ लागले. अमीर खुसरो यांचे लहानपणाचे शिक्षण हे दोन मिश्र संस्कृतीमध्ये झाले. त्यामुळे अमीर खुसरो यांना अरबी, तुर्की,फारसी भाषांसोबतच कुराण शरीफ,शरिअत (धार्मिक नियम) व हदिस (प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांनी सांगितलेले सुविचार) यांचे शिक्षण घेतले. त्याच वेळी आपल्या आईकडील हिंदवी (खडी हिंदी भाषा) व संस्कृत या सोबतच हिंदू धर्मातील चार वेद, उपनिषद, पुराण, दर्शनशास्त्र, भगवतगीता, महाभारत, रामायण यांचेही अमीर खुसरो यांनी सूक्ष्म अध्ययन केले होते. अमीर खुसरो आपल्या वडिलांसोबत दिल्ली येथील "नमक की सराय" या ठिकाणी राहत होते.अमीर खुसरो यांना दोन भाऊ होते मोठे बंधू इजुद्दिन अली शहा हे अरबी फारसी भाषेचे विद्वान होते. तर छोटे भाऊ हिसमुद्दिन हे कुतलग होते.जे आपल्या वडिलांसोबत शाही फौजेमध्ये शूर योद्धा म्हणून कार्यरत होते. अमीर खुसरो यांचे वडील अधिक शिक्षित नव्हते. मात्र त्यांनी आपल्या मुलांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रवेश देऊन उच्च शिक्षण दिले. ज्ञानाबरोबरच रोजच्या जीवनात येणाऱ्या अनुभवातूनही अमीर खुसरो यांनी शिक्षण घेतले. याच काळात खुसरो यांच्या वडिलांनी त्यांना चिस्ती सुफीचे वंशज महान संत हजरत निजामुद्दीन अवलिया यांचे शिष्य बनवले होते. वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षापासून त्यांनी काव्यरचना करण्यास सुरुवात केली. सन १५६४मध्ये खुसरो यांचे वडील एका युद्धामध्ये मारले गेले. त्यावेळी त्यांचे वय अवघे नऊ वर्ष होते. त्यामुळे त्यांचे पुढील पालन-पोषण त्यांच्या आजोळी त्यांचे आजोबा ऐमादूलमुल्क यांच्या देखरेखीमध्ये झाले. त्यावेळी त्यांच्या आजोळी गायन-वादन, संगीताचे तसेच सुफी परंपरेचे अलौकीक वातावरण व प्रभाव होता. अमीर खुसरो यांनी शायरी मध्ये त्याकाळच्या अनेक शायरांचे अध्ययन केले. वयाच्या २८ व्या वर्षी म्हणजेच १२८१ मध्ये सुलतान बलबनचा मुलगा शहजादा मोहम्मद कान उर्फ खान ए शाजिद यांच्या शाही दरबारात मुलतान मध्ये पाच वर्ष त्यांनी नोकरीही केली होती. यावेळी शाही शायर यासोबतच मुशफदार (कुरान- ए - शरीफ संरक्षक) या पदी कार्यरत होते. वयाच्या ३२व्या वर्षी म्हणजेच सन १२८५ मध्ये शहजादा मोहम्मद सोबत लाहोर व दिपालपूर येथे केलेले युद्ध हे त्यांच्या आयुष्यातले पहिले युद्ध होते. सन १२९६मध्ये अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीच्या तख्तावर आल्यानंतरही अमीर खुसरो यांची लोकप्रियता, असामान्य प्रतिभा, शायरी व संगीतकार या विविध गुणांमुळे त्यांना शाही कवी व सैन्यांमध्ये प्रमुखपदी कायम ठेवण्यात आले होते.सन १३०१मध्ये सुलतान अल्लाउद्दिन खिलजी यांनी केलेल्या अनेक युद्ध मोहिमांचे सविस्तर वर्णन अमीर खुसरो यांनी आपल्या फारसी ग्रंथात "खजाइनुल फुतुह" (सुलतान अल्लाउद्दीन खिलजीच्या विजयी मोहिमांचे वर्णन) केलेले आहे. यामुळेच अल्लाउद्दीन खिलजी याने खुसरो यांना " अमीर " पदवीने विभूषित केले होते. सन १३१६मध्ये खुदबुद्दीन मुबारक शहा खिलजी दिल्लीच्या राजगादीवर आल्यानंतर अमीर खुसरो यांनी आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ "मसनवी नूर सिपहर " (नऊ आसमान) लिहिली. हीच मसनवी(दोन वेगळ्या भाषांचा - रदीफ व काफीए - वापर करून तयार झालेला काव्यप्रकार / शेर) पुढे विश्वविख्यात झाली होती.यामध्ये अमीर खुसरो यांनी आपली देशभक्ती, बहमनी लोकांचे ज्ञान - संपत्तीची प्रशंसा, तसेच हिंदुस्तानाला जगात सर्वात चांगला देश म्हणून गौरविलेले आहे. यासोबतच हिंदुस्थानातील खेळ, सण-समारंभ, जत्रा, पशुपक्षी, ज्योतिष, ज्ञान, खगोलशास्त्र, धर्म, वेद, पुराण, भाषा, रितीरिवाज, साधुसंत, संगीत, वाद्य अशा विविध गोष्टींची मनापासून प्रशंसा केलेली आहे. अमीर खुसरो यांच्या या मसनवीसाठी सुलतान मुबारक शाह यांनी त्यांना एका हत्तीच्या वजनाइतके सोने बक्षीस दिले होती जे अमीर खुसरो यांनी आपले गुरु व सुफी संतांच्या आश्रमासाठी दान दिले होते.अमीर खुसरो यांनी आपले संपूर्ण जीवन राजाश्रयामध्येच व्यतीत केले. ते जवळजवळ ११ सुलतानांच्या साम्राज्याच्या उत्थान व पतनाचे साक्षीदार होते. अमीर खुसरो यांचे संशोधन कार्य हजरत अमीर खुसरो यांच्या काळात प्रबंध आणि छंद ब्रजभाषा व संस्कृत भाषेतच होते. त्याच्या उच्चारणात मुस्लिम गायकांना अडचणी येत. यामुळे अमीर खुसरो यांनी हिंदुस्तानी उत्तर भारतीय संगीत आणि इराणी - अरबी संगीत यांचे कुशलतेने संमिश्रण करून नवीन संशोधन केले. हिंदुस्तानी उत्तर भारतीय संगीत आणि इराणी व अरबी मुस्लिम संगीत यांचे सर्वप्रथम संमिश्रण करण्याचे श्रेय प्रामुख्याने अमीर खुसरो यांनाच दिले जाते. यातूनच संगीतातील विविध गीतप्रकार यांचा अमीर खुसरो यांनी शोध लावला व ते सर्व गीतप्रकार प्रचलित केले. यामध्ये १.ख्याल, २.त्रिवट, ३.चतुरंग, ४.तराना,५.गझल, ६.कव्वाली, ७.ठूमरी, ८.दादरा, ९.होरी - धमार, १०.कलबाना, ११.सवेला, १२.सादरा १३.बसित १४.गीत, १५.विदाई गीत, १६.गीत रागमाला, १७. बुलावणी, १८.सोहेला, १९.राग सागर,२०. कौल हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामध्ये ध्रुपद गायनाने ऐवजी ख्याल गायन शैलीचा अविष्कार केला. त्यामुळे खयाल गायनाची सर्वप्रथम गुरू म्हणून अमीर खुसरो यांना ओळखले जाते. त्रिवट व तराना या गायनशैलीचा अविष्कार अमीर खुसरो यांनी केला. यामध्ये मृदुंगाचे बोल अधिक प्रमाणात वापरलेले असतात. चतुरंग या गीत प्रकाराचा अविष्कार अमीर खुसरो यांनी केला. यामध्ये ख्याल, तराना, सरगम व त्रिवट याचा समावेश असतो. अमीर खुसरो यांनी कव्वाली गायन हे शास्त्रीय गायनाप्रमाणेच विविध रागांमध्ये स्वरबद्ध करून प्रचलित केले. कव्वाली मध्ये रुचाव व दफ (वाद्यवृंद व डफ) तसेच टाळी वाजवणे, वज्रासनात बसून गायन करने इ. नवीन प्रकारचे बदल केले. "मअदनुल मौसिकी मोहम्मद करम इमाम" यांच्या मतानुसार अमीर खुसरो यांनी सतरा तालांची निर्मिती केल्याचे मत आहे. त्यापैकी काही ताल खालीलप्रमाणे. १.आडाचौताल, २. चंपक, ३.फरोदस्त, ४. सवारी, ५.पहलवान, ६.जनानी सवारी, ७.अव्वल खमसा, ८.पश्तो, ९. झूमर, १०. कव्वाली. औरंगजेब यांच्या दरबारातील अमीर मिर्जा फकीरूल्लाह यांच्या "तजुर्मा - ए - मानकुतूहल" व "रिसाला - ए - दर्पण"या ग्रंथानुसार अमीर खुसरो यांनी १२ रागांचे संशोधन केले असा उल्लेख सापडतो. यामध्ये खालील रागांचा समावेश होतो. १. गनम(घनम) - राग पुरी मधील स्वरांमध्ये बदल करून. २. सरपरदा - रास्त मध्ये गौड, बिलावल व गौडसारंग या रागांचे मिश्रण. ३. जीलफ - फारसी राग शहनाज मध्ये खट रागांच्या स्वरांचे मिश्रण. ४. फरगाना - फारसी मकाम गौरा व गुणकालियंद या रागांचे मिश्रण. ५. मुवाफिक (विलाबली) - बैरागी, मालश्री, तोडी, दुर्गा, यामध्ये हुसेनी आणि दोगह यांचे मिश्रण. ६. मुहय्यीर - तोडी रागांमध्ये पंचगाह यांचे मिश्रण. ७. फरदोस्त - फारसी अहंग व सरपरदा यामध्ये कानडा, गौरी, पूर्वी या रागांचे मिश्रण. ८. यमन - एमन, हिंडोल, नैरेज या रागांचे मिश्रण. ९. उश्शाक - गौरा रागासोबत भारतीय सारंग आणि बसंत या रागांचे मिश्रण. १०. सनम - नैरेज व कल्याण यांचे मिश्रण. ११. मजिब - गारा व अन्य फार्सी धून यांचे मिश्रण. १२. देसकार - फारसी मकाम बार्खज यामध्ये फारसी मकाम यांचे मिश्रण. १३. साजगिरी - पूर्वी, विभास, गौरी, गुणकली यासोबत फारसी मकाम यांचे मिश्रण. १४. ईराक - राग पूर्वी, विभास, गौरा आणि गुणकली यांचे मिश्रण. १५. बगरू - फारसी मकाम व देसकर यांचे मिश्रण. याबरोबरच आणि अन्य काही राग खालील प्रमाणे १६. कौल, १७. तालेलाना, १८. तराना, १९. नक्श, २०.बसित, २१. सोहीला, २२. निगार. #.हिंदुस्तानी प्राचीन वाद्य पखवाज यापासून अमीर खुसरो यांनी तबला व ढोलक या वाद्याची निर्मिती केलीअसे मानले जाते. # अमीर खुसरो यांनी तानपुरा आणि वीणा यांच्या संयोगातून " सितार " नावाच्या वाद्याची निर्मिती केली. #. इराणी आणि भारतीय छंदशास्त्र यांच्या समन्वयातून अनेक बंदिशी आणि रेखता(फारसी ख्याल) यांची सुद्धा निर्मिती केली. #.अमीर खुसरो हे जगातील पहिले शायर होते ज्यांनी सर्वप्रथम दोन भाषांचा उपयोग करून शायरी लिहिली. ज्यामध्ये कवितेची पहिली ओळ फारसी भाषेत आणि दुसरी व हिंदवी भाषेमध्ये होती. (मसनवी) #.पुस्तकांमध्ये भूमिका/प्रस्तावना लिहिण्याची परंपरा सर्वप्रथम अमीर खुसरो यांनी सुरू केली. #. अमीर खुसरो यांनी अनेक भाषांमध्ये प्रभुत्व संपादन केले होते. यामध्ये फारसी, अरबी, तुर्की, पुश्तो, दरी, पहिलवी, संस्कृत, हिंदवी,(खडी बोली, ब्रज भाषा, हरियाणी, अवधी, राजस्थानी, मुलतानी, पंजाबी, सिंधी, गुजराती, मराठी) # अमीर खुसरो यांच्या काळातील शाही दरबारात फारसी या भाषेचे राजभाषा म्हणून वर्चस्व असतानाही सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचे प्रतिबिंब असणाऱ्या सुफी विचारांचे आणि सर्वसामान्य लोकांच्या बोलीभाषेतील दररोजच्या जीवनाचे प्रतीबिंब असणाऱ्या श्रावण, वसंत, शिशिर, फागुन, चैत्र, हिंडोला, विवाह, विरह, प्रियकर, प्रेयसी, माहेर,परमेश्वर आराधना, प्रार्थना, होळी गीत, अंगाई गीत, रंगपंचमी, कृष्णभक्ती, रामभक्ती, अशा विविध गीतांचे हिंदवी भाषेतून लेखन केले. #.अमीर खुसरो यांनी लहान मुलांसाठी हिंदवी आणि फारसी हिंदवी यांच्या मिश्रणातून अनेक शेर व विविधांगी शैक्षणिक कोडीसुद्धा लिहिलेली आहेत. जे "प्रहेलिका" या नावाने पहावयास मिळतात. ही सर्व कोडी आजही जवळजवळ ७०० वर्षानंतरही नाविन्यपूर्ण वाटतात. #. अमीर खुसरो हे आज हिंदी - उर्दू भाषेचे जन्मदाता आणि हिंदवी चे पहिले शायर आहेत. अमिर खुसरो यांचे लेखन खूपच सुंदर होते ते स्वतः उत्तम लेखक (कातिब) तसेच उत्तम सुलेखक (खत्तात) म्हणूनही प्रसिद्ध होते. अमीर खुसरो यांनी वसंत पंचमी हा हिंदू सण सुफी व मुस्लिम समाजामध्ये साजरा करण्याची पद्धत सुरू केली. *अमीर खुसरो यांचे लेखनकार्य आणि ग्रंथसंपदा - अमीर खुसरो यांनी तब्बल ९९ विविध प्रकारचे ग्रंथ लिहिले आहेत. त्यापैकी फक्त २२ ग्रंथ उपलब्ध आहेत. अमीर खुसरो यांचे काव्य चार वर्गात विभक्त केले जातात. १. ऐतिहासिक मसनवी - किशनुससादैन, देवलरानी खिजरखा, मिफतोलफतह, नुर सिपहर, तुगलकनामा. २. अद्भुतरम्य मसनवी - मतलऊ लअनवार, शिरीन खुसरी, आईन - ए - सिकांदरी, मजनु लैला, हश्त विहश्त, ३. दीवान - तुहफ तुम सिगहर, वास्तुलहयात. ४. गद्य रचना - एजाजएखुसरवी,खजाइनुल फुतुह, वेदउलअजाईब, मसनवी शहरअसुब, चिस्तान, खालिकबारी (फारसी हिंदी शब्दकोश) १०६१ हिजरी. सन १२९८ ते १३०१ या काळात अमीर खुसरो यांनी पाच अद्भुतरम्य मसनवी यांचे लेखन केले. १. मल्लोल अन्वर २. शिरीन खुसरो ३. मजनु लैला ४. आईने - ए - सिकंदर ५. हश्त विहश्त *अमीर ख़ुसरो यांच्या काही रचना - ऐ री सखी मोरे पिया घर आए -अमीर ख़ुसरो परदेसी बालम धन अकेली मेरा बिदेसी घर आवना -अमीर ख़ुसरो मेरे महबूब के घर रंग है री -अमीर ख़ुसरो छाप तिलक सब छीन्हीं रे -अमीर ख़ुसरो बहुत कठिन है डगर पनघट की -अमीर ख़ुसरो आ घिर आई दई मारी घटा कारी। -अमीर ख़ुसरो ज़िहाल-ए मिस्कीं मकुन तगाफ़ुल -अमीर ख़ुसरो दैया री मोहे भिजोया री शाह निजम के रंग में। -अमीर ख़ुसरो सकल बन फूल रही सरसों -अमीर ख़ुसरो तोरी सूरत के बलिहारी, निजाम -अमीर ख़ुसरो अम्मा मेरे बाबा को भेजो री -अमीर ख़ुसरो बहोत रही बाबुल घर दुल्हन -अमीर ख़ुसरो दुसुख़ने -अमीर ख़ुसरो जब यार देखा नैन भर -अमीर ख़ुसरो मोरा जोबना नवेलरा भयो है गुलाल -अमीर ख़ुसरो ढकोसले या अनमेलियाँ -अमीर ख़ुसरो जो पिया आवन कह गए अजहुँ न आए -अमीर ख़ुसरो बहुत दिन बीते पिया को देखे -अमीर ख़ुसरो काहे को ब्याहे बिदेस -अमीर ख़ुसरो हजरत ख्वाजा संग खेलिए धमाल -अमीर ख़ुसरो जो मैं जानती बिसरत हैं सैय्या -अमीर ख़ुसरो सूफ़ी दोहे -अमीर ख़ुसरो दोहे -अमीर ख़ुसरो *बहुत दिन बीते पिया को देखे -अमीर ख़ुसरो बहुत दिन बीते पिया को देखे, अरे कोई जाओ, पिया को बुलाय लाओ मैं हारी वो जीते पिया को देखे बहुत दिन बीते। सब चुनरिन में चुनर मोरी मैली, क्यों चुनरी नहीं रंगते? बहुत दिन बीते। खुसरो निजाम के बलि बलि जइए, क्यों दरस नहीं देते? बहुत दिन बीते। *ऐ री सखी मोरे पिया घर आए -अमीर ख़ुसरो ऐ री सखी मोरे पिया घर आए, भाग लगे इस आँगन को। बल-बल जाऊँ मैं अपने पिया के, चरन लगायो निर्धन को। मैं तो खड़ी थी आस लगाए, मेंहदी कजरा माँग सजाए। देख सूरतिया अपने पिया की, हार गई मैं तन मन को। जिसका पिया संग बीते सावन, उस दुल्हन की रैन सुहागन। जिस सावन में पिया घर नाहिं, आग लगे उस सावन को। अपने पिया को मैं किस विध पाऊँ, लाज की मारी मैं तो डूबी डूबी जाऊँ। तुम ही जतन करो ऐ री सखी री, मै मन भाऊँ साजन को। *अमीर खुसरो यांनी वैद्यराज खुसरो यांच्या रूपात काव्यात्मक घरगुती उपाय लिहिले आहेत. 1. हरड़-बहेड़ा आँवला, घी सक्कर में खाए! हाथी दाबे काँख में, साठ कोस ले जाए!! 2. मारन चाहो काऊ को, बिना छुरी बिन घाव! तो वासे कह दीजियो, दूध से पूरी खाए!! 3. प्रतिदिन तुलसी बीज को, पान संग जो खाए! रक्त-धातु दोनों बढ़े, नामर्दी मिट जाय!! 4. माटी के नव पात्र में, त्रिफला रैन में डारी! सुबह-सवेरे-धोए के, आँख रोग को हारी!! 5. चना-चून के-नोन दिन, चौंसठ दिन जो खाए! दाद-खाज-अरू सेहुवा-जरी मूल सो जाए!! 6. सौ-दवा की एक दवा, रोग कोई न आवे! खुसरो-वाको-सरीर सुहावे, नित ताजी हवा जो खावे!! भारतामध्ये या महान कलावंतास "हजरत" या उपाधीने सन्मानित केले गेले. सन १३२४ मध्ये अमीर खुसरो यांचे गुरु निजामुद्दीन अवलिया यांचे देहावसान झाले. त्यामुळे अमीर खुसरो यांना खूप दुःख झाले. त्या वेळेपासून ते या संसारिक गोष्टीपासून विरक्त झाले. सन १३२५ मध्ये वयाच्या ७२व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना आपल्या गुरूंच्या चरणापाशी समाधिस्थ करण्यात आले. दरवर्षी या ठिकाणी उरूस आयोजित केले जातात. यावेळी अनेक गुणीजन कलावंत,कव्वाल एकत्र येऊन या महान कलावंतास श्रद्धांजली अर्पण करतात. अमीर खुसरो यांना तीन मुले होती.त्यापैकी फिरोज खान सितारवादक म्हणून प्रसिद्ध झाले. मात्र वर्तमान काळात त्यांचे वंशज तबला वादक म्हणून प्रसिद्ध आहेत.