तालयोगी लयभास्कर पद्मश्री शंकरबापू आपेगावकर देव आणि गंधर्वाचे वाद्य म्हणून ओळखले जाणारे चर्मवाद्य म्हणजे पखवाज होय.अनेक विद्वानांच्या मतांनुसार पखवाज हे भारतीय संगीताचे आद्य तालवाद्य आहे. "पखवाज" हा शब्द प्रयोग मध्ययुगापासून सुरुवात झाला. पखवाज, पखावज, मृदंग या नावानेही हे वाद्य प्रचलित आहे. भाषेच्या दृष्टिकोनातून मृदंग हा शास्त्रीय शब्द आहे. दाया आणि बाया म्हणजेच धुम्मा व चाटी स्वरात पखवाजाचा " धा धा दिं ता धीट धा दीं ता" असा गंभीर नाद उमटू लागला की एखाद्या पुरातन देवालयाच्या गाभाऱ्यात बसल्याचा भास होतो व ओंकाराची अनुभूती येऊन वातावरण मंगलमय व प्रसन्न होते.महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायिक भजन व कीर्तन महोत्सवात पखवाजाचा प्रामुख्याने उपयोग होतो. शास्त्रीय पखवाज आणि भजनातील पखवाज यातील फरक केवळ अभ्यासाचाच ! जुजबी शिक्षणाने भजन-कीर्तन वाजवता येते, मात्र शास्त्रीय पखवाजासाठी लागते ती प्रचंड मेहनत, रियाज आणि दुर्दम्य इच्छाशक्ती. गेल्या दोन शतकांत भारतीय पखवाजवादन क्षेत्रात आपल्या दीर्घ साधना व कौशल्याने जे धुरंदर कलारत्न तयार झाले यामध्ये लाला भवानीसिंह, कुदऊसिंह, बाबू जोथसिंह, नाना पानसे, पं. मख्खनलालजी भैय्या अशा प्रतिभाशाली कलावंताने आपल्या वादनात अभिनव दृष्टी आणि विशिष्ट कलासृष्टी निर्माण केली. यातूनच पुढे भारतात नावारूपास आलेल्या पखवाजवादकामध्ये स्वामी पागलदास, पं. गोपालदासजी, पं. देवकीनंदन महाराज, राजा छत्रपती यांच्यासोबतच ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते असे मराठवाड्यातील सुप्रसिद्ध लयभास्कर पद्मश्री शंकरबापू आपेगावकर ! वै. हभप लयभास्कर पद्मश्री शंकरबापू (शिंदे) आपेगावकर, यांचा जन्म मार्च १९२१ रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई जवळील आपेगाव या छोट्याश्या गावी झाला.घरातच पारंपरिक वारकरी संप्रदायाचा सुमारे १०० ते १२५ वर्षाचा समृद्ध वारसा त्यांचे आजोबा तुळजाराम शिंदे यांच्यापासून त्यांना लाभलेला होता.वडील मारुतीराव शिंदे स्वतः पखवाज वाजवीत तर चुलते जनार्दनराव शिंदे हे आळंदी येथून वारकरी शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन आलेले,त्यामुळे या दोघांकडून पखवाजाचे व वारकरी परंपरेचे प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतले. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी पखवाज वाजनास सुरुवात केली. संत तुकाराम महाराजांच्या "लाऊनि मृदंगश्रुती टाळघोषसेवू ब्रह्मरसआवडीने....!" या शब्दांनी शंकरबापूंना पखवाजाची मोहिनी पडली आणि विठ्ठलनाद, विठ्ठलभेद, विठ्ठलछंद, विठ्ठल विठ्ठल करीत शंकरबापू पखवाजाच्या कलेमध्ये देहभान विसरून रममाण झाले. एकदा त्यांच्या घराण्याचे अध्यात्मिक गुरु हभप गुरुवर्य बंकटस्वामी महाराज नामसप्ताहसाठी आपेगाव येथे आले. त्यावेळी त्यांनी पखवाजासारख्या थोराड वाद्यावर छोट्या शंकरची ताडताड वाजणारी बोटे पाहिली आणि छोट्या शंकरला पखवाज शिकण्यासाठी पंढरीनाथबुवा पडेगावकर यांना आपेगावला राहण्याची आज्ञा दिली. पंढरीनाथबुवांनी शंकरबापू यांना दहा महिने पखवाजाचे शिक्षण दिले. यातूनच पुढे हळूहळू शंकरबापू सांप्रदायिक भजन व कीर्तनातून पखवाज वाजवू लागले. सन १९३५ - ३६ च्या सुमारास मुंबई हे शास्त्रीय संगीताचे प्रमुख केंद्र होते.भारतातून अनेक गायक, वादक मुंबई येथे आपली कला सादर करत आणि त्यांच्या कलेची कदर मुंबईतील अनेक रसिक, सुज्ञवर्ग मुक्तहस्ताने करत.मुंबईत संगीताचे दर्दी आणि कलेच्या नवोदित कलावंतांसाठी निस्वार्थ भावनेने पैसे खर्च करणाऱ्या रसिकांमध्ये सेठ विठ्ठलदास, द्वारकादास, पास्तासेठ अशा व्यक्तींची नावे अग्रक्रमाने घेतली जात. याचकाळात शंकरबापूंची पखवाज वादनातील प्रगती गुरुवर्य हभप बंकट्स्वामी महाराजांच्या कानावर आली. तेव्हा हभप बंकटस्वामी महाराज शंकरबापूंना वयाच्या १४व्या वर्षी मुंबईला घेऊन आले.सेठ विठ्ठलदास यांनी शंकरबापूंना बंकटस्वामी महाराजांच्या कीर्तनामध्ये पखवाजाची अवघड साथ करताना पाहिले, आणि शंकरबापूंना पखवाजाचे शास्त्रीय शिक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्न करु लागले. त्याकाळचे प्रसिद्ध बीनकार उस्ताद इनायत हुसेन खान यांच्यासोबत पखवाजावर मथुरेचे पं. मख्खनलालजी उत्तम पद्धतीने साथ करत. सेठ विठ्ठलदास यांना वाटू लागले की छोट्या शंकरचे पं. मख्खनलालजी यांच्याकडे शास्त्रीय पद्धतीने पखवाजवादनाचे शिक्षण व्हावे. गुरुवर्य हभप बंकट्स्वामी महाराज आणि सेठ विठ्ठलदास यांच्या विनंतीनुसार पं. मख्खनलालजी यांच्याकडे शंकरबापूंच्या रीतसर शिक्षणाचे गंडाबंधन झाले. भला मोठा बनारसी फेटा व अंगठी पं. मख्खनलालजी यांना देण्यात आला. गंडाबंधनाचा हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात सेठ विठ्ठलदास व गुरुवर्य हभप बंकट्स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी हभप बंकटस्वामी महाराज यांनी एवढेच सांगितले की, "या मुलाला चांगले शिकवा."त्यावेळी पं. मख्खनलालजी गहिवरुन म्हणाले, "आप तो महात्मा हो, महात्माजी का वचन हम पुरा जरूर करेंगे!" पं. मख्खनलालजी व त्यांचे गुरू पंडित आदित्यराय हे बाबू कुदऊसिंहजींच्या शिष्य परंपरेतील होते. शंकरबापू यांनी अशा परंपरेत वाढलेल्या गुरुच्या हाताखाली गुरुगृही राहून १९३७ ते १९४५ पर्यंत खडतर साधना केली. शंकरबापूंची हाताची कलाटणी बदलण्यासाठी सहा महिने गेले. दाया व बाया हा एका स्वरात वाजला पाहिजे असे गुरूंचे शिक्षण होते. पहाटे साडेचार पासून ते सकाळी नऊपर्यंत रियाज चाले.पं. मख्खनलालजी सकाळी सहा वाजता समोर बसवून शंकरबापूंना शिकवत. संध्याकाळी पुन्हा दोन तास शिकवलेल्या भागाचा रियाज करणे. यासोबतच गुरूंची सेवा करायची, त्यांना स्नान घालायचं, अंग चोळायचं, त्यांचे कपडे धुवायचे हे सर्व गुरुगृही राहून, गुरूंची मर्जी राखून साध्य करायचे. पण याकाळात आपल्या गुरूंच्या लहरीपणामुळे व गुरु रुष्ट झाल्यामुळे अनेकदा शंकरबापूंच्या शिक्षणात खंड पडला.पण त्यांनी त्याही परिस्थितीत आपले गुरुगृह सोडले नाही. त्यांच्या दारात पडून, रात्रंदिवस लाचार होऊन विद्या लीनतेने घेण्याची त्यांनी जणू व्रतच घेतले होते. मात्र गुरुमाऊली ती गुरुमाऊलीच! दोन महिन्यानंतर पं. मख्खनलालजीने पुन्हा शंकरबापूंना शिकवायला सुरुवात केली. सहा सहा तास मेहनत सुरू असायची त्यावेळी मग आपल्या शिष्याच्या हातात वजन येण्यासाठी त्यांचे गुरू स्वखर्चाने तूप-साखर खाऊ घालायचे, तर कधी रियाजाने छाती भरून आली तर स्वतःच्या हाताने आपल्या शिष्याची छाती शेकायचे. अशाप्रकारे पं. मख्खनलालजी हे शंकरबापूंचे आईबाप, भाऊ बहीण सारं काही होते. पोटच्या पोराहूनही अधिक प्रेम पं. मख्खनलालजी यांनी आपल्या शिष्यावर म्हणजेच शंकरबापूंवर केले हे विशेष! शंकरबापूंचा पखवाजवादनाचा पहिला कार्यक्रम झाला तोही अनेक दिग्गज मंडळींच्या समोर. ठाकुरदास यांच्या दत्तमंदिरात दत्तजयंतीच्या निमित्ताने उस्ताद अल्लादिया खाँ, मोगूबाई कुर्डीकर, बेहेरेबुवा अशी दिग्गज मंडळी एकत्र आलेली होती. पं. मख्खनलालजी यांना आपल्या उत्तम शिष्याबद्दल विश्वास होता. ते म्हणाले, "सुनो इस छोटे बच्चे को, हमने कुछ सिखाया है!" मात्र यावेळी प्रारंभी शंकरबापू घाबरले. पखवाजावर त्यांचा हात चालेना. ही बाब समोर असणाऱ्या उ. अल्लादिया खाँ साहेबांच्या लक्षात आली. ते शंकरबापूंच्या जवळ येऊन पाठीवर हात ठेवत धीर देत म्हणाले, "बच्चे, डरने की क्या बात है? सभी अपने है, कितना अच्छा हाथ है, बजाओ...!" या शब्दांनी बापूंना धीर आला आणि बापूंनी वीस मिनिटे पखवाजवादन करून सर्वांची वाहवा मिळवली. शंकरबापूंना आपल्या गुरूंच्या सहवासात पखवाज वादनाच्या अध्ययनाबरोबरच संगीताच्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांचा, संगीत विश्वाचा जवळून परिचय झाला. पं ओंकारनाथ ठाकूर, पं. रामकृष्णबुवा वझे, डागर बंधू, पाटणकरबुवा, लक्ष्मणप्रसाद चौबे, प्रा. देवधर, सूरश्री केसरबाई केरकर, बंदे अली खाँ, लयभास्कर खाप्रूमाम पर्वतकर, अशा संगीतातील दिग्गज मंडळींचा सहवास शंकरबापूंना आपल्या गुरुमुळेच लाभला. यांच्यासोबत होणाऱ्या मैफलींमध्ये लय पकडणे, साथसंगतीच्या नियमांचा परिचय, यातूनच प्रात्यक्षिकातून शिक्षण बापूंना आपल्या गुरूंकडून मिळाले. सन १९४६ मध्ये शंकरबापू गावी परत यायला निघाले तेव्हा पं. मख्खनलालजी यांनी गुरुवर्य हभप बंकटस्वामी महाराज यांना दिलेले वचन पुरे केले होते. गुरूंची आज्ञा घेऊन शंकरबापू आपेगावला आले. शेतीची मशागत आणि पखवाजाचा रियाज असा बापूंचा दिनक्रम होता. अधून मधून मथुरेला जाऊन सात-आठ दिवस गुरुगृही राहून नवनवीन बाजाचे अध्ययन, यमुनेच्या तीरावर अविरत रियाज, यातूनच शंकरबापूंच्या शास्त्रीय पखवाज वादनावर संस्कार घडत होते. सुमारे १०० वर्षापूर्वी एका छोट्या खेड्यातील मराठी भाषिक मुलगा पखवाजाचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्यासाठी हजारो कोसोदूर उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जातो, वयाची ४० ४५ वर्षापर्यंत गुरुगृही पखवाजाचे शिक्षण घेतो, ही जरी अतिशयोक्ती कल्पना वाटली, तरी ती शंकरबापूंनी सत्यात उतरवली हे विशेष! याचदरम्यान संगीतावर प्रेम करणारे रसिक आणि शंकरबापूंच्या पखवाज शिक्षणासाठी झटणारे सेठ विठ्ठलदास निवर्तले. पुढील काळात गुरुवर्य पं. मख्खनलालजी यांच्या स्वर्गवासाची वार्ताही कळाली. शंकरबापूंच्या सांगीतिक जीवनाला आकार देणाऱ्या या दोन्ही गुरुमाऊलींच्या जाण्याने शंकरबापूंना अतीव दुःख व विषाद निर्माण झाला. मात्र "मेरा नाम भूल ना मत"या गुरूंच्या आदेशानुसार बापूंनी दुःख आणि विषादाला दूर सारत आपले आध्यात्मिक गुरू गुरुवर्य हभप बंकटस्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार विठुनामाच्या गजरामध्ये व सांप्रदायामध्ये आपली वाटचाल सुरू ठेवली. सर्वप्रथम सन १९५९ मध्ये राजस्थानचे सुप्रसिद्ध धृपद गायक पं. चतुर्भुज राठोड यांच्या धृपदगायनास शंकरबापूंनी पखवाजाची उत्तम साथसंगत केली. पुढे डागर बंधूंचा कार्यक्रम ऐकण्यासाठी पं. चतुर्भुज राठोड बापूंना मुंबई येथे घेऊन आले.जागतिक कीर्तीचे धृपद गायक उ. जहिरुद्दिन डागर व उ. फैय्याजुद्दिन डागर यांच्या धृपद गायनाचा कार्यक्रम होता. मात्र ऐन वेळेस काही कारणास्तव पखवाजाची साथ करणारे कलावंत न आल्यामुळे या डागर बंधूंच्या कार्यक्रमाकरिता शंकरबापूंनी पखवाजाची साथ दिली (१९६२). शंकरबापूंनी अल्पावधीतच मैफलीची पकड घेतली. दोन तासाची मैफल सुमारे साडेचार तास चालली. तेव्हापासून उ. रहीमुद्दीनखान डागर, उ. अमिनुद्दिन डागर, उ. जहिरुद्दिन डागर व उ. फैय्याजुद्दिन डागर, बिनकार (रुद्रवीणा वादक) उ. जियामोयुनीद्दीन डागर, उ. फैमुद्दीन डागर, फरीदोद्दीन डागर, उ. सैफुद्दीन डागर, म्हणजेच डागर सप्तकातील सर्व बंधूनी शंकरबापूंनाच साथीसाठी घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून डागर सप्तकातील डागर बंधूंचे धृपद गायन आणि शंकरबापूंची पखवाजसाथ हे समीकरण तयार झाले ते कायमचेच. शंकरबापूंच्या पखवाज वादनाने त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. कुदऊसिंह घराण्याचे एकल पखवाजवादन, ध्रुपद साथ-संगत, बिनकार पखवाज साथ-संगत, तबला पखवाज जुगलबंदी, रुद्रवीणा पखवाज जुगलबंदी यासारखे अनेक कार्यक्रम शंकरबापू आपल्या शैलीतून सादर करू लागले. शंकरबापूंनी अनेक संगीत समारोहात आपल्या पखवाज वादनाने आपले अलौकिकत्व सिद्ध केले. यामध्ये स्वामी हरिदास समारोह मुंबई, घराना संमेलन आग्रा, संगीत नाटक अकादमीद्वारे आयोजित धृपद समारोह, कला अकादमी पणजी, डागर सप्तक कोलकत्ता, पटना संगीत नाटक अकादमी, तानसेन समारोह ग्वाल्हेर, भारत भवन भोपाळ, संगीत नाटक अकादमी दिल्ली द्वारा आयोजित अंबाजोगाई धृपद समारोह, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र नागपुर द्वारा आयोजित औरंगाबाद संगीत समारोह, महाराष्ट्र शासनाच्या पैठण येथील संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शताब्दी महोत्सवामध्ये भव्यदिव्य हरिनाम सप्ताह व अन्नदान यासोबतच वृंदावन, दिल्ली, जयपूर, वाराणसी, नाथद्वारा, इंदौर, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद, मुंबई अशा अनेक शहरात आयोजित संगीत संमेलनातून व सांप्रदायिक सप्ताहातून शंकरबापूंचा पखवाज संपूर्ण भारतभर निनादला. कर्नाटक पद्धतीचे थोर मृदंगवादक तालविलास पालाघाट मणी व शंकरबापू यांची षण्मुखानंद हॉल येथील जुगलबंदी, बनारस येथील धृपद मेळाव्यात दिग्गज धृपद गायकांची केलेली साथ-संगत, मानस मंदिराच्या बटुकेश्वरशास्त्री सारख्या विद्वानांची कौतुकाची थाप, संगीत नाटक अकादमीच्या कपिला वात्सायन यांनी शंकरबापूंच्या पखवाज वादनाचा केलेला गौरव, सामताप्रसाद, पं. सियाराम तिवारी, पं. रामचतुर मलिक, पं. विदुर मलिक, अशा घराणेदार धृपद धमार गायकांची व हभप सोनोपंत दांडेकर, हभप बंकटस्वामी महाराज, हभप धुंडा महाराज, हभप शंकरस्वामी वासकर अशा वारकरी संप्रदायातील गायकांची उत्तम पखवाज साथसंगत म्हणजे तत्कालीन रसिक श्रोत्यांना पर्वणीच ठरायची. शंकरबापूंनी ४०० ते ५०० अविस्मरणीय मैफिली गाजविल्या. याबरोबरच संगीत क्षेत्रातील कथक नृत्यसम्राट पद्द्मविभूषण पं. बिरजू महाराज, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, पं. हृदयनाथ मंगेशकर, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, उ. झाकीर हुसेन, सरोदवादक पद्द्मविभूषण उ. अमजद अली खान अशा कलावंत मंडळीबरोबरही शंकरबापूंचे सूर जुळलेले होते. पखवाजवादनाव्यतिरिक्त संत वांड.मयाचेसुद्धा बापू उत्तम अभ्यासक होते. विठ्ठलाला आपले दैवत व सर्वकाही मानणारे बापू आपल्या हातून वाजणारा पखवाज म्हणजे विठ्ठलाने घडविलेला चमत्कारच मानत. त्यांच्या सांगीतिक जीवनाची वैशिष्ट्य म्हणजे कधीही कुठल्याही कार्यक्रमाची बिदागी त्यांनी घेतली नाही. संगीत सेवा खऱ्या अर्थाने त्यांच्या हातून अविरतपणे घडलेली आहे. धृपदगायन तसे क्लिष्ट असल्यामुळे धृपदगायक हे इतर गायकांच्या तुलनेत कमी, त्यामुळे पखवाजवादकांनाही तसा वाव कमीच. परंतु तरीही बापूने आपले अस्तित्व जपले आणि संपूर्ण भारतभर पखवाजवादन जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल पद्धतीने संगीत शिक्षणाची सोय आज "महात्मा गांधी मिशन" औरंगाबाद या नामांकित संस्थेत झालेली असून नृत्य, गायन वादन या तिन्ही कलांचे शिक्षण येथे दिले जाते. शंकरबापूंनी आपल्या सांगीतिक जीवनात अनेक पदेही भूषविली. यामध्ये औरंगाबाद येथील ७४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, आळंदी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उपाध्यक्षपद, अंबाजोगाई येथील अखिल भारतीय संमेलनाचे विश्वस्त, श्रीक्षेत्र पैठण येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित संत ज्ञानेश्वर सप्तशताब्दी महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक, सांगली, कोल्हापूर, कळंब, उस्मानाबाद, मुंबई, परभणी येथे संपन्न झालेल्या भव्य ज्ञानेश्वरी सप्ताहाचे प्रमुख संयोजक म्हणून ते अव्याहतपणे कार्यरत होते. याबरोबरच एमआयटी पुणेचे संचालक वि. दा. कराड, महात्मा गांधी मिशन नांदेडचे कमल किशोर कदम, विठ्ठलराव जाधव, माधवराव सुर्यवंशी, संगणकतज्ञ विजयजी भटकर, खोडसे पाटील, शशिकांत पोहे अशा अनेक मंडळांचे शंकरबापू मार्गदर्शक म्हणून ओळखले जात. शंकरबापूंनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाची जोपासना केली.त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पारंपरिक वारकरी, गुरुवर्य, तपस्वी, साधू, संतांचा, सहवास बापूंना आयुष्यभर लाभला. यामध्ये हभप धुंडा महाराज देगलूरकर, हभप सोनूपंत मामा महाराज, हभप शंकर महाराज कंधारकर, हभप गुरूवर्य बाबा महाराज सातारकर, देगलूर घराणे, युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराज, अंमळनेरकर महाराज, हभप ठाकूरबुवा दैठणकर, हभप पारनेरकर महाराज, हभप भास्कर महाराज, देहूकर घराणे, हभप प्रकाश महाराज बोधले, हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे, हभप किसन महाराज साखरे, अशा अनेक संत महंतांसोबत शंकरबापूंचे निकटचे संबंध होते. साहित्य, समाज, संगीत या क्षेत्रात सोबतच राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक आमदार, खासदार अशा सर्व दिग्गज राजकीय मंडळींनी शंकरबापूंना आदराचे व मार्गदर्शकाचे स्थान प्रदान केलेले होते. शंकरबापू यांनी चित्रपटसृष्टीतही वाडीयांच्या “विक्रमादित्य” या एकमेव चित्रपटात पखवाज वाजवला. सन २००० मध्ये सरकारतर्फे त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्री फिल्मही चित्रित करण्यात आली होती. वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथील ह.भ.प. तुकाराम महाराज खडके लिखित “स्वानंद सुखनिवासी श्रीसद्गुरू जोग महाराज चरितामृतसागर” या प्रकाशित झालेल्या ओवीबद्ध ग्रंथात पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या अलौकिक जीवनकार्याचे ओवीबद्ध चरित्र आपणास पहावयास मिळते.शंकरबापू यांच्याविषयी ते म्हणतात. “वारकरी संप्रदायाचा ध्वज |जेणे फडकविला मृदंग वाजवूनि सहज |बापूंचा वाजविण्याचा जो बाज |महाराष्ट्रात विरळा ||१०६||” सन २००३ ते २००८ पर्यंत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत अंबाजोगाई येथे गुरु-शिष्य परंपरेतून धृपद व शास्त्रीय पखवाज परंपरा जतन व संवर्धन करण्यासाठी केवळ बापूंच्या आग्रहास्तव संगीत गुरुकुल कार्यरत होते. अखंड हरी चिंतन, नादब्रह्माची साधना आणि विठ्ठलाची निस्सीम भक्ती हे बापूंचे वैशिष्ट्यपूर्ण गुण होते. ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ, त्यातील शिकवण व नादब्रम्ह याच्याबाहेर त्यांनी कधी विचार केला नाही. लहानापासून थोरापर्यंत, समाजकारण्यापासून ते राजकारण्यापर्यंत, कुटुंबापासून ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण त्यांच्या सहवासात पावन होऊन जात असत. गुरुकुल पद्धतीने पखवाजाचे शिक्षण संगीत अकादमीमध्ये बापू व त्यानंतर त्यांचे सुपुत्र व शिष्य उद्धवराव हे देत आहेत. वय वर्ष आठ ते वय वर्षे साठपर्यंत त्यांचे शिष्य पखवाजाचे शिक्षण घेत आहेत. त्यांचे सुपुत्र उद्धवजी आपेगावकर पखवाजाच्या दोन्ही परंपरा समर्थपणे पुढे चालवीत आहेत. आळंदी, पंढरीची वारी असो, नामसप्ताह असो अगदी श्रद्धेने ते या सेवेत आहेत. शास्त्रीय वादनात महाराष्ट्र, भारत आणि जगभर गेल्या ६० वर्षापासून शंकरबापूंचा पखवाजाचा प्रचार-प्रसार अविरत आजही सक्षमपणे उद्धवरावांच्या माध्यमातून चालू आहे. वयाची सुमारे ८४ वर्षे पखवाजवादनात अव्याहतपणे व्यतीत केल्यानंतर अनेक मानसन्मान यांनी शंकरबापू यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये काही उल्लेखनीय मानसन्मान ३१ मार्च १९८६ मध्ये भारत सरकारने त्यांना "पद्मश्री"या राष्ट्रीय पुरस्काराने तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांच्या हस्ते सन्मानित केले. बनारस येथील "स्वातितिरुनाद" हा मानाचा पुरस्कार. इंदूर येथून "पखवाज रत्न"ही पदवी मिळाली. अल्लादियाखाँ अकादमी भोपाळतर्फे "तालविलास" ही पदवी. २००१ मध्ये साहित्य संस्कृती मंडळातर्फे "गौरववृत्ती पुरस्कार" प्रदान. "ग्रेट मास्टर्स" या दूरदर्शन केंद्रावरील विशेष कार्यक्रमात मुलाखत प्रसारित. ताल विलास - संगीतपीठ, सुरसिंगार संसद मुंबई. ताल रत्न - स्वर साधना समिती मुंबई. पखावज रत्न - धृपद समारोह इंदोर. तुका परिचिती - जगद्गुरू तुकोबाराय प्रतिष्ठान औरंगाबाद. पखावज पंडित - शिकोहाबाद मध्य प्रदेश. पद्मश्री सारख्या मोठ्या सन्मानाला हुरळून न जाता कलेची सेवा त्यांनी सोडली नाही. नाद आणि लयीशी त्यांचं नातं अतूट आहे. कलेकडे बापूंनी अर्थार्जनाचे साधन म्हणून कधीच पाहिले नाही. प्रसिद्धी किंवा पैसा यापैकी कोणत्याही लोभाने त्यांनी आपल्या वादनकलेला बाधा आणणारी तडजोड केली नाही. ऐहिक सुखाच्या पाठीमागे न लागता नादब्रह्माची सेवा त्यांनी अव्याहतपणे आयुष्यभर केली. जीवनात आलेल्या अनेक कठीण प्रसंगी, नैराश्याच्या क्षणी हा तालायात्री न डगमगता लौकिकदृष्ट्या लोकापवादही सहन करत हा तालयोगी छंदे छंदे लयीशी ज्ञानार्जन, रसिकांचे मनोरंजन व ज्ञानदान या आचारमयीत सतत लीन होता. आपले अध्यात्मिक गुरु हभप बंकटस्वामी महाराज यांच्याकडून मिळालेल्या अध्यात्मिक शक्तीच्या बळावर त्यांनी अनेक संकटांना धैर्याने तोंड दिले. कुठल्याही राजकीय मुकुटात अडकून न पडता दिंडीतील हरिनामाचा गजर, नाद वलयात विलीन झालेले, ताल व स्वरात स्वतःला झोकून देणारे तालयोगी ९जानेवारी २००४ रोजी आपल्या मूळ गावी आपेगाव येथे वयाच्या ८४ व्या वर्षी वैकुंठवासी झाले.आज जरी शंकरबापू वैकुंठवासी गेले असले तरी त्यांची पखवाजवादनातील घराणेदार कला तसेच सांप्रदायिक भजन कीर्तनातील ताल, नाद, लय त्यांनी घडवलेल्या अनेक शिष्यांच्या माध्यमातून आजही जिवंत आहे.सार्थक जीवनाचे भाग्यशाली क्षण शंकरबापूंच्या सार्थकी जीवनाला संगीताच्या चैतन्यमय प्रकाशाने अलोकित झालेले आहेत. अशा या अद्वितीय लयभास्कर पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या अद्वितीय कार्यास शतशः प्रणाम!