भारतीय संगीतातील अमूल्य रत्न पं.डी.व्ही. पलुस्कर सद्यस्थितीतील संगीत कलाक्षेत्रात डोकावून पाहणाऱ्यांना अनेक अविस्मरणीय अनुभव येतात. जर या कलावंतांचा संबंध आला तर अन्वयार्थ लावणेही कठीण जाते. असे सांगितले जाते की, कलावंतांचे जग हे वेगळे असते. त्यात रमणारांनाच त्याचे अप्रूप! वास्तविक कोणत्याही सृजनशील कलेच्या प्रांगणात रमणारा माणूस संवेदनाक्षम असतो. असाच माणूस कलात्मक वातावरणाशी एकरूप होतो. परंतु कलावंताची सर्जनशील, संवेदनक्षम भावविश्व समजून घेणे हे वेगळे आणि त्याच्याकडे घडणाऱ्या सर्व बाबींकडे या भूमिकेतून पाहणे हेदेखील वेगळेच. शंभर वर्षापूर्वी संगीत जगात डोकावण्याचे धाडस करणारे सापडणे जरा कठीणच असावयाचे. त्यावेळीही स्वर, ताल, लय यांचे भावविश्व होतेच. संगीत जगतामध्ये आपल्या कलेने, कौशल्याने, कल्पकतेने आणि संगीताप्रती असणाऱ्या त्यांच्या अलौकिक श्रद्धेमुळे संगीतामध्ये नवनवीन संकल्पना निर्माण करण्यामध्ये त्यांचे योगदान हे एकमेवाद्वितीय असेच होते. कलावंतांच्या त्या जगाची ओळख "मांही पड्या ते महासुख माणे"अशी होती. आज या परिस्थितीत संपूर्ण परिवर्तन झालेले आहे. नव्या सहस्त्रक आरंभी कलांना आणि कलावंतांना सुगीचे दिवस आलेले दिसतात. मात्र टप्प्याटप्प्याने झालेल्या या बदलासाठी अनेक कलावंतांना प्रवाहाविरुद्ध जावे लागले असून काहीजण पडद्याआडही गेलेले आहेत. कलेतील प्राविण्याच्या आधारे कलावंत बनवू शकणारे अन्य आश्रयाने या संज्ञा प्रचलित असून सुगीच्या दिवसाची वेगळीच गणिते लक्षात घेतल्यानंतर जे घडू शकेल त्याचा स्पर्श भारतरत्नासही झालेला आहे. कलेच्या प्रांगणातील अशी दृश्ये बरेच काही सुचवून जातात अशा अवस्थेत भारतरत्न या यादीत हमखास असू शकणाऱ्या परंतु अकाली पडद्याआड गेलेल्या एका कलावंताचे कला जीवन उलगडून दाखवणे आवश्यक वाटते. बापू, बापूराव, काका, गुरुजी, पंडितजी अशा विविध नावांनी सर्व परिचित असलेले आणि संगीत प्रसारक पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे सुपुत्र म्हणजेच पंडित दत्तात्रय अथवा पंडित डी. व्ही. पलुस्कर ! २६ ऑक्टोबर हा पंडितजींचा स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा भारतीय संगीतक्षेत्राला लाभलेला सहवास जरी अल्प असला तरी या काळातील त्यांचे अव्दितीय संगीतातील योगदान, त्यांचे सांगीतिक कार्य यांचे स्मरण निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे. बापूराव यांचा जन्म २८ मे, १९२१ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील "कुरुंदवाड"संस्थानात झाला. बापूराव हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आणि पारंपरिक गायकीचा अविष्कार करणारे अद्वितीय कलाकार होते. विद्वत गुणीजन याप्रमाणेच सामान्य होण्यामध्येही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. केवळ फक्त गायनकौशल्यच नव्हे तर आचार-विचार वागणूक यामुळे अनेक व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून, आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून, ध्वनिमुद्रनातून त्यांनी अनेक मित्र, स्नेही केवळ जोडलेच नाही तर त्यांचं निर्व्याज प्रेमसुद्धाही मिळवलं. लहानपणापासून त्यांनी सुरुवातीचे काही वर्षे आपल्या वडिलांकडून म्हणजेच संगीत प्रसारक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले मात्र वयाच्या १० व्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरवल्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीशी बाबुरावांना झुंज द्यावी लागली. पुढे त्यांचे चुलत बंधू पंडित चिंतामणराव पलुस्कर, पंडित नारायणराव व्यास, पंडित विनायकबुवा पटवर्धन व पंडीत मिराशी बुवा यांच्याकडून त्यांनी रीतसर संगीताचे शिक्षण घेतले. याबरोबरच स्वतःमधील अंगभूत गुणांमुळे व कौशल्यामुळे अल्पावधीतच त्यांना प्रतिसाद आणि सन्मान मिळू लागला. स्वर, लय, शब्द, रस, भाव, या सर्व अंगांचा यथोचित आणि उत्तम उपयोग बापूराव आपल्या पेशकारीमध्ये कौशल्याने करत. सर्वसाधारणपणे बापूराव आपल्या मैफीलीमध्ये प्रचलित रागच सादर करत. उत्तम, सुरेल, निकोप, जवारीदार आवाज, शिस्त व वेळेचे नियोजन, अचूक रागांची निवड अशा विविध गुणांमुळे बापूराव आपल्या मैफिलीमध्ये हमखास रंग भरत असत. याबरोबरच बापूराव आपल्या मैफिलीमध्ये आपल्याबरोबर साथसंगत करत असलेल्या कलाकरांनाही त्यांची कला पेश करण्यास भरपूर वाव देत. ही बापूरावांच्या मैफिलीची एक खासियतच होती. सन १९३५ मध्ये वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी बापूरावांनी पंजाबमधील 'जुलुंदुर' येथे आयोजित “हरि वल्लभ संगीत संमेलनामध्ये” तसेच कोलकत्त्यातील "ऑल इंडिया संगीत संमेलनामध्ये" आपला स्वतंत्र शास्त्रीय गायनाचा पहिला कार्यक्रम सादर केला. जरी ते पुण्यात स्थायिक झाले होते तरी आपल्या मैफिलीसाठी ते सतत भारतभर फिरत. भारतातील प्रत्येक मोठ्या संगीत संमेलनामध्ये त्यांनी आपले गायन सादर केले होते. सन १९३८ पासून “ऑल इंडिया रेडीओ”च्या विविध केंद्रावरून त्यांचे कार्यक्रम नियमित प्रसारित झाले. वयाच्या २२ व्या वर्षीच बापूरावांनी दैनंदिनी लिहिण्याचा क्रम आरंभ केला जो शेवटपर्यंत चालूच राहिला. केवळ या दैनंदिनीमुळेच बापूरावांच्या सांगीतिक कार्याचे आणि योगदानाचे लिखित स्वरूपातील संदर्भ आपणास मिळणे शक्य झालेले आहेत. आपल्या विविध आठवणी, लहानपण, संगीतशिक्षण, याचबरोबर नेपाळ, बर्मा, चीन यासारख्या विविध परदेश दौऱ्यातील विविध प्रसंगाचे वर्णन बापूरावांनी आपल्या दैनंदिनीत सविस्तरपणे लिखित स्वरूपात केलेले आहे. याचबरोबर कोणाकडून कोणता राग मिळाला, कोणती बंदिश मिळाली, या सर्वांची नोंद अगदी नोटेशनसह त्यांच्या दैनंदिनीमध्ये आपणास पहावयास मिळते. सन १९४४ मध्ये म्हणजेच वयाच्या २३ व्या वर्षी बापूरावांनी अनेक कॉन्फरन्समध्ये मैफीली सादर केल्या. त्यामध्ये १४ ते १७ जानेवारी अमृतसर, २३ जानेवारी लाहोर, ३१ जानेवारी होशियारपूर, १३ ते १६ फेब्रुवारी दिल्ली, २० फेब्रुवारी मेरठ, २१ आणि २२ फेब्रुवारी गाजियाबाद, ८,९,१० मार्च अमृतसर, २६ मार्च लाहोर, २९ मार्च अमृतसर, ३१ मार्च व १ एप्रिल पतियाळा, १५ व १६ एप्रिल अंमळनेर, १८ जून मसूरी, १५ सप्टेंबर सोलन, २ डिसेंबर पटना या बरोबरच वेगवेगळ्या आर्ट्स सर्कलमधील कार्यक्रम आणि खाजगी बैठकांची संख्यादेखील अशीच मोठी आहे. भारतभर होणाऱ्या या मैफिलीमध्ये त्यांच्या समवेत अनेक दिग्गज कलावंतही होते. ज्यामध्ये फैय्याज खान, हाफिजअली, अल्लाउद्दीन खान, दिलीपचंद्र, कंठे महाराज, केसरबाई केरकर, शांता आपटे, रविशंकर, ओंकारनाथ ठाकूर, नारायणराव व्यास, बिस्मिल्ला खान, दमयंती जोशी यासारख्या कलावंतांचाही समावेश होता. २८ नोव्हेंबर, १९४४ रोजी विष्णू दिगंबर म्युझिक युनिव्हर्सिटीचे उद्घाटन झाले. त्यावेळी ओंकारनाथ ठाकूर यांचे व्याख्यान त्यानंतर बापूराव आणि शेवटी शांता आपटे यांचे गायन झाले. ३० जून १९४५ मध्ये 'कराड म्युझिक सर्कल' तर्फे टिळक हायस्कूलमध्ये बापूरावांची मैफिल झाली. या मैफलीचे उत्पन्न भडकमकर हॉस्पिटलला देण्यात आले. सन १९४६ मध्ये जानेवारीच्या सुरुवातीस कलकत्ता येथे "ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स" घेण्यात आली होती. यामध्ये बापूराव यांच्यासोबतच ओंकारनाथ पटवर्धन, कंठे महाराज, केसरबाई केरकर, बडे गुलाम अली खाँ, बंदुखा, गोहर बाई, हाफिज अली, कुमार गंधर्व, कार्तिकराम यांनीही हजेरी लावली होती. ६ एप्रिल १९४५ रोजी बनारस येथे पंडित मदन मोहन मालवीय यांची भेट. ७ एप्रिल १९४७ रोजी विनयचन्द्र यांच्याबरोबर महात्मा गांधीजी यांचीही भेट घेऊन 'रघुपती राघव राजाराम', आणि एक भजन बापूरावांनी गायले. सन १९५३ मध्ये बापूरावांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. यामध्ये पाटणा युनिव्हर्सिटीचे 'प्राचार्यपद', भरतपुर आणि पतियाळाच्या राजेसाहेबांकडून 'दरबार गायक' पदी नियुक्ती, ऑल इंडिया रेडिओकडून वेगवेगळ्या पदावरील नेमणुका, १९ जुलै १९५४ रोजी भारत सरकार कडून रशियास जाणाऱ्या 'कल्चरल डेलिगेशन' मध्ये त्यांचा अंतर्भाव 'प्रमुख गायक' म्हणून करण्यात आला होता. सन १९४५ ते १९५३ यादरम्यान एच. एम. व्ही. कंपनीने बापूरावांच्या १४ विविध ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. तर २४ जुलै १९५२ रोजी 'बैजू बावरा' आणि १७ जानेवारी १९५५ रोजी ‘शाप मोचन' या बेंगाली सिनेमासाठी बापूराव यांनी पार्श्वगायनही केले. बापूराव त्याकाळात अनेक दक्षिण भारतीय संगीतकारांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या बहारदार गायकीने मंत्रमुग्ध होऊन दक्षिण भारतीय लोकांनीही त्यांची प्रशंसा केली. दक्षिणेतील संगीत महोत्सवांमध्ये भाग घेण्याचा अनोखा गौरव त्यांना मिळाला. जानेवारी, १९५४ मध्ये मुंबई येथे “कर्नाटकी संगीत महोत्सवाच्या" वेळी बापुरावांनी आपल्या स्वतःच्या अलौकिक पद्धतीने राग 'सिमेंद्रमध्यमात' त्यागाराज यांच्या 'क्रिती' सादर केल्या आणि जाणकार प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाटासह प्रशंसाही प्राप्त केली. 'भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळाचे' सदस्य म्हणून बापुरावांनी अनेकदा चीनचे दौरे केले. बापुरावांनी शिष्टमंडळाच्या इतर सदस्यांसह चीनमधील बऱ्याच महत्त्वाच्या शहरांना व गावांना भेटी दिल्या आणि त्यांना आढळले की, चीनी लोक आपल्या पारंपरिक कलांमध्ये केवळ रस दाखवत नाहीत तर त्यांच्या सूक्ष्मता आणि परिष्कृतपणाचे कौतुकही करतात. त्यांनी स्वतः सर्व सादरीकरणासाठी शास्त्रीय आणि भक्तीगीते निवडली. त्यापैकी 'बहार' आणि 'मियां की मल्हार' मधील प्रस्तुती प्रेक्षकांसाठी खूपच प्रसिद्ध व लोकप्रिय होत्या, आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच वेळा त्या सादरीकरणासाठी बापूरावांना निमंत्रित केले जात. बापूरावांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये ३२ विद्यार्थिनी ९ विद्यार्थी अशी खूप मोठी शिष्यपरंपरा निर्माण केली. पैकी त्यांचे शिष्य कमल केतकर यांना सन १९५० मध्ये तर दोन वर्षांनी म्हणजेच सन १९५३ मध्ये कालिंदी केसकर यांना तानसेन विष्णू दिगंबर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बापूरावांना त्यांच्या केवळ ३४ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या अद्वितीय सांगीतिक योगदानाबद्दल सन १९४४ मध्ये डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांच्या हस्ते "संगीतशेखर" तर सन १९४६ मध्ये बनारस येथे त्यांना "संगीत सुमेरु" हा किताब प्रदान करण्यात आला होता.साधे राहणीमान आणि स्वच्छ सवयींचा व विचारांचा माणूस, नियमित सराव, चारित्र्याची अखंडता आणि जीवनाबद्दल व्यावहारिक दृष्टीकोन असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. बापूराव हे भगवान रामाचे भक्त, तसेच महात्मा गांधी आणि त्यांचे वडील विष्णू दिगंबर यांचे त्यांनी नेहमीच कौतुक केले. त्यांची छायाचित्रे त्यांनी नेहमीच आपल्याबरोबर घेतली. त्याच्यासाठी संगीत हे केवळ मनोरंजन नव्हते, तर ते गहन धार्मिक श्रद्धा आणि भक्तीची अभिव्यक्ती होती आणि म्हणूनच स्वर्गीय आनंद आणि मनाच्या शांततेसाठी संगीतामध्ये ते आपले देहभान हरवून जात. बापुरावांनी कमी वयातच हिंदुस्थानी संगीतातील महान शास्त्रीय कलाकारांमध्ये मानाचे अढळ स्थान प्राप्त केले होते. असे हे सर्वांचे बापूराव, संगीतातील महान कलावंत वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजेच २६ ऑक्टोबर १९५५ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर मुंबई येथे काळाच्या पडद्याआड गेले. बापूरावांचे संगीत कायमचे शांत झाले, परंतु त्यांनी आपल्या विविध मैफिलींच्या माध्यमातून श्रोत्यांच्या मनावर आपली व आपल्या गायकीची अमर छाप सोडली. त्यांच्या ध्वनीमुद्रिका, रेडिओ आणि ग्रामोफोनच्या माध्यामातून भारतीय संगीतातील एक अमुल्य रत्न म्हणून आजही त्यांच्या महानतेची आठवण सर्व संगीत रसिकांना करून देत आहे आणि पुढेही सदैव देत राहील.