युगांत भारतरत्न पं. भीमसेन जोशी एक रहस्यकथा म्हणून प्रसिद्धी पावलेले महान कलाकार. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे प्रेरणास्त्रोत.स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी म्हणजे प्रयत्न, प्रतिभा, परमेश्वरी वरदान व प्रचंड जिद्द यांचा सुरेल संगम. भारतीय संगीताची ध्वजा उंचावणारे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक. संतवाणी तुन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे किर्तीवंत कलावंत असलेल्या पंडित भीमसेनजींच्या जीवनाची व त्यांच्या संगीताची कहाणी अद्भुतरम्य आहे. बहुआयामी जीवन जगलेल्या व आपल्या गायनाने भारतवर्षाला मोहिनी घातलेल्या या महान कलावंताचे जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ जीवन गाणे झालेले आहे. विंदा करंदीकर म्हणतात.... "अमृताचे डोही बुडविले तुम्ही,बुडताना आम्ही धन्य झालो,मीपण संपले, झालो विश्वाकार,स्वरात ओंकार भेटला गा." या पंडितजींसाठी केलेल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे गेली सहा दशकाहूनही अधिक देशोदेशींच्या मैफलीतून श्रोत्यांना स्वरातून ओमकार स्वरूपाचे दर्शन घडवणारे पंडित भीमसेन जोशी म्हणजे भारतीय संगीताची ध्वजा उंचावणारे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक. ४ फेब्रुवारी १९२२ रोजी रथसप्तमीच्या दिवशी धारवाड जवळच्या रोण या छोट्या गावात पंडितजींचा जन्म झाला. शिक्षणतज्ञ, भाषाकोविद, संस्कृतपंडित, वेदांत पारंगत म्हणून पुढे नावलौकिक मिळवलेले पं. गुरुराज भीमाचार्य जोशी हे त्यांचे वडील त्यावेळी साधे शिक्षक होते. अजोबा भीमाचार्य हे तंबोरा सुरेल वाजवीत आणि पुराण सांगत. आई रमाबाई यांच्याकडून गोड आवाजाची देणगी पंडितजींना मिळाली. असाधारण स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती असलेल्या भिमसेनला सुरांची ओढ होती. सातव्या वर्षी या मुलाला संस्कृत स्तोत्रे, संध्या व अमरकोश मुखोद्गत होते. आईकडून कानडी भजने कानावर पडत असत. ती त्याला पाठ असत. गदगच्या एका संगीत शिक्षकांनी त्याला संगीत शिक्षणाचे प्रारंभिक धडे दिले. वयाच्या नवव्या वर्षी वडिलांनी पेटी घेऊन दिली पण या छोट्या शिष्याची असामान्य ग्रहणशक्ती पाहून शिक्षकांनी त्याला सुयोग्य गुरु शोधा असे मोकळेपणाने सांगितले. सन १९३२ मध्ये गदगला सवाई गंधर्वांची गाण्याची मैफल भीमसेनजींनी ऐकली होती. त्यांचे गाणी त्याला फार आवडले होते. भावी काळात त्यांचा तो लाडका शिष्य झाला. पण १९३३ मध्ये हॉटेलात लागलेल्या एका ध्वनिमुद्रिकेने त्यांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. किराणा घराण्याची प्रमुख उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांच्या झिंझोटी रागातल्या "पिया बिना आवत नाही चैन" या ठुमरीने या छोट्या मुलाला अक्षरशः वेड लावले. १९३३च्या ऑगस्ट महिन्यात अवघ्या अकराव्या वर्षी उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांसारखे गाणे यावे म्हणून गुरुच्या शोधात त्यांनी कोणालाही न सांगता घर सोडले. या मुलाचा विजापूर, पुणे ते ग्वाल्हेर असा प्रवास खडतर होता. रेल्वेत गाणे गाऊन मिळालेल्या पैशात कधी अर्धपोटी, कधी उपाशी अवस्थेत ग्वाल्हेर गाठले. आजचे आघाडीचे सरोदवादक उस्ताद अमजद अली खान साहेबांचे वडील उस्ताद हाफिज अली खा साहेबांनी त्यांची अन्नछत्रात सोय लावून दिली. भीमसेनजी त्यांच्याकडून मारवा राग शिकले. तिथे काही काळ राहिल्यानंतर कोलकत्यात त्यावेळचे न्यू थिएटर्सचे चित्रपट गायक नट पहाडी संन्याल यांच्याकडे घरकाम व संगीत शिक्षण सुरू झाले. सन्याल यांनी सांगितल्यानुसार भीमसेन काही काळ विश्वदेव चटर्जीकडे राहिले. भीमसेन अब्दुल करीम खाँ यांची गायकी आत्मसात करण्याच्या ध्यासाने १९३४ च्या डिसेंबर महिन्यात जालंधरला दाखल झाले. तिथे ध्रुपदिये मंगतराम यांनी तोडक मोडक हिंदी येणाऱ्या गोड गळ्याच्या या मुलाला आपल्याकडे राहू दिले. हजार जोर काढायचे, दूध, जिलेबी असा खुरा घ्यायचा व गुरुजींकडून गायन शिक्षण घ्यायचे असा क्रम दीड वर्ष चालला. हरीवल्लभ संगीत संमेलनात विनायकबुवा पटवर्धन यांनी भीमसेनला कुंदगोळला सवाई गंधर्व यांच्याकडे गायकी शिकण्याचा सल्ला दिला. तो शिरसावंद्य मानून भीमसेनजी सवाई गंधर्व यांच्याकडे गेले. कुंदगोळला सवाई गंधर्व यांच्याकडे राहून त्यांनी संगीत शिक्षण सुरू केले. दोन मैलावर असलेल्या नदीवरून कावडीने पाणी भरणे, गुरूगृही पडेल ती कामे करणे व गाण्याच्या शिकवणीला बसणे असा दिनक्रम असे. चौदाव्या वर्षी आवाज फुटल्याने थोडी तालीम व अधिक श्रवणभक्ती करावी लागली. गुरु भगिनी गंगुबाई हनगल व गुरुबंधू नाडगीर यांची तालीम व गुरुजींचा रियाज ऐकण्याचा लाभ झाला. तोडी, मुलतानी व पुरीया हे तीनच राग गुरुजींनी सातत्याने तीन वर्षे शिकवले. सवाई गंधर्व एचएमव्ही साठी ध्वनिमुद्रिका तयार करीत होते. आसावरी, पुरियाधनाश्री, तोडी, भैरवी, पुरिया, नट मल्हार या रागांचा गुरुजींचा सराव ऐकताना त्यांचे वेळेचे अचूक भान व त्यांची स्वयंशिस्त याचा आदर्श वस्तुपाठ भीमसेन यांना मिळाला. सन १९४१ मध्ये हुबळीच्या रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये गंडा बंधनाचा सोहळा झाला.१००१ रुपयांची गुरुदक्षिणा दिली व त्यादिवशी गुरु भगिनी गंगुबाई हनगल व कृष्णा रामदुर्ग गायल्या. एकोणीस वर्षाचे भीमसेन त्यामध्ये होते. भीमसेन घराबाहेर पडले ते नवेनवे गाणे शिकण्याच्या ध्यासानेच. मुंबईत ऐकायला मिळालेल्या बनारस - लखनऊच्या उपशास्त्रीय गाण्याच्या ओढीने भीमसेन उत्तर प्रदेशात गेले. रामपूरच्या उस्ताद मुस्ताक हुसेन यांची सहा महिने शागिर्दी केली व रामपूर गायकीचे मर्म आत्मसात केले. सन १९४३ मध्ये भीमसेन गृहस्थाश्रमी झाले. सुनंदा कट्टी या सुंदर मुलीशी त्यांचा विवाह झाला. याच वर्षी मुंबई व निजाम रेडिओशी ते करारबद्ध झाले. सन १९४४ मध्ये मुंबईत झालेल्या विक्रमादित्य संगीत समारोहात ते गंगुबाईसमवेत गेले होते. बडे गुलाम अली खाँ साहेब, कुमार गंधर्व, पु. ल. देशपांडे यांच्याशी भीमसेन यांचा परिचय झाला. बडे गुलाम अली यांच्या ठूमऱ्याची त्यांना गोडी लागली. भीमसेन यांनी स्वतःची ठुमरीची शैली विकसित केली. मात्र अजूनही त्यांचा मोठ्या स्वरमंचावर प्रवेश झाला नव्हता. १९ जानेवारी १९४६ या दिवशी पुण्याच्या हिराबागेत सवाई गंधर्वांचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा भव्य सोहळा होता. वक्त्यामध्ये बालगंधर्व, गोविंदराव टेंबे होते. गुरुजींनी भिमसेनजींना २५ मिनिटे गाण्याची परवानगी दिली. त्यांनी मिया मल्हार रागातील प्रसिद्ध बंदिश "करीम नाम तेरो" विलंबित एकतालात सादर केली. सारेजण या तरुण गायकाच्या मैफिलीत मंत्रमुग्ध झाले. कर्नाटकातून आलेला चोवीस वर्षाचा तरुण श्रोत्यांचे, जाणकारांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. सर्व ठिकाणांहून आमंत्रणाचा ओघ सुरू झाला. वत्सला मुधोळकर या सुंदर, गानविद्यानिपून युवतीच्या प्रेमात पडून भीमसेनजी यांनी विवाहबद्ध होण्याचे ठरवले. २० मे १९५१ रोजी नागपूर येथे त्यांचा विवाह झाला. दोन संसाराची जबाबदारी, गावोगावीच्या मैफिली, उत्तरोत्तर विकसित होणारी गायकी,पाठोपाठ मानसन्मान व लोकप्रियता यांनी आगामी काळ बहरला. १२ सप्टेंबर १९५२ या दिवशी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांचे निधन झाले. पुढील वर्षी पुण्यतिथीला भीमसेनजी यांनी एका संगीत समारोहाचे आयोजन केले. उत्तरोत्तर या समारंभाने एक विशाल रूप धारण केले.अनेक नवोदित, उद्द्योन्मुख व नामवंत कलाकारांचे गायन, वादन, नृत्य यांचे व्यासपीठ असलेला, हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत साजरा होणारा भव्य त्रिरात्र महोत्सव अजूनही दिमाखात सुरू आहे. पंडितजींच्या गायनासाठी शेवटच्या रात्री हजारो श्रोते तिष्ठत वाट पाहत असत. मुख्य आयोजक म्हणून लगबग करणारे पंडित भीमसेन जोशी श्रोत्यांना पाहायला मिळत असत. २९ नोव्हेंबर १९५३ यादिवशी कोलकत्याच्या एनटाली संगीत संमेलनात पंडितजी गायले आणि बंगवासी रसिकांच्या गळ्यातील ताईत झाले. भीमसेनजी यांची गायनाच्या मैफिली निमित्त भारतभर भ्रमंती सुरू झाली. दुचाकी वरून सुरू झालेला हा प्रवास पुढे विमान प्रवासापर्यंत सुरू राहिला. पु. ल. देशपांडे यांनी गमतीने त्यांना "हवाई गंधर्व" ही पदवी दिली. भारताबाहेर तंत संगीत पोचलं होतं. एकतर पं. रविशंकर आणि उस्ताद अली अकबर सारखे जादूगार वादक. दुसरा म्हणजे त्यात भाषेची आडकाठी नव्हती. शिवाय सरोद व सतार ही वाद्य त्यांच्यासाठी अगदी नवीन होती. भारतीय तंतवादनाचा कंठभेद केला पंडित भीमसेन जोशी यांनी. २३ देशातील ६७ शहरांमधून त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. काही देशातील अनेक शहरात अनेक वेळा त्यांचे कार्यक्रम सादर झालेले आहेत. तेवीस देशातील नागरिकांवर भारतीय उच्चांग गायनाच्या स्वरांचे मोहिनी अस्त्र टाकू शकण्याची किमया फक्त पंडित भीमसेन जोशी नामक स्वराधिराजच करू शकतात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात हिमालयाची उंची गाठणाऱ्या व न भूतो न भविष्यती अशी अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या भीमसेनजींनी कारकिर्दीच्या प्रारंभी "भाग्यश्री" यासह अनेक कन्नड नाटकातून भूमिकाही केल्या.मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीतही त्यांचे योगदान होते. पंडितजींनी १९६८ मध्ये गोपाळकृष्ण भोबे यांच्या "धन्य ते गायनी कळा" या नाटकाला संगीत दिले. 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी' हे "गुळाचा गणपती" या चित्रपटातील गीत गायले. याबरोबरच भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे अशा चित्रपटातून गाणी गायली.तसेच बसंत बहार, अनहोनी या हिंदी चित्रपटासाठी भीमसेनजींनी पार्श्वगायन केले.पण ख्याल गायकीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंडित भीमसेन जोशींनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला तो संतवाणीने. महाराष्ट्रातील एकही प्रमुख गाव असे नसेल की जेथे भीमसेनजींच्या संतवाणीचे सुर पोहोचले नाही. संगीतकार राम फाटक यांनी स्वरचित्र मधून "संतवाणी" पंडितजींकडून गाऊन घेतली. १९६८ ते ७२ या काळात त्यांच्या अभंगांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. प्रत्येक मैफलीत त्यांना संतवाणी गाण्याचा आग्रह होत असे. सर्वाधिक खपाच्या ध्वनिमुद्रिकांमध्ये आजही संतवाणी आघाडीवर आहे. जिवंतपणीच दंतकथा बनलेले भीमसेनजी लोकांचे गायक होते. पूरिया, मालकंस, ललत, तोडी, दरबारी कानडा, यमन, शुद्ध कल्याण, मारुबिहाग असे प्रचलित रागच भीमसेनजी शेकडो वेळा गायले पण प्रत्येकवेळी नवे काहीतरी ऐकल्याचा आनंद श्रोते घेत. भरदार धीरगंभीर आवाज, तानांचा गडगडाट, प्रचंड दमसास असलेले भीमसेनजी ठुमरी गायनामध्ये कोमल, मादक स्वरही लाजवाब लावत. रागदारी, ठुमरी, भजन, नाट्यगीत हे सर्व प्रकार लीलया गात असत. श्रोत्याला भारावून टाकण्याची किमया त्यांना साधली होती. नवीन राग निर्मितीच्या मागे ते लागले नाहीत. पंडितजींनी निर्मिलेले "ललत भटियार, हिंदोलीता, कलाश्री लोकप्रिय आहेत.सामान्य श्रोत्यापासून राष्ट्रप्रमुख, नेते, अभिनेते, खेळाडू पर्यंत सर्वांना पंडितजीबद्दल कुतूहल असे. पंडितजींचा अमृतमहोत्सव १९९६ मध्ये पुण्यात साजरा झाला. या कार्यक्रमाला अटलबिहारी वाजपेयी उपस्थित होते. २१ मार्च १९९९ रोजी त्यांनी पुण्यात रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत "रंगवाणी" सादर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. "मिले सुर मेरा तुम्हारा या गीताने पंडितजींना घराघरात पोचविले. डॉ. बालमुरलीकृष्णन यांच्याबरोबरच्या त्यांच्या जुगलबंदीही गाजल्या. भीमसेन हसेन यांची संगीत चित्रकलेची जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संसदेत झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात वंदेमातरम सादर करण्याचा अनोखा मानही पंडितजींना मिळाला. पंडितजींनी ९ डिसेंबर २००७ रोजी सवाई गंधर्व या महोत्सवामध्ये शेवटचे गायन केले.त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या महोत्सवात जाऊ शकले नाहीत. मात्र ते रसिकांच्या भेटीला आवर्जून येत राहिले. पंडितजींना भारत सरकारने ४ नोव्हेंबर २००८ रोजी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला. जेम्स बेवरिज या कॅनडातल्या उद्योगपतीने व गुलजार यांनी भीमसेनजी यांच्यावर केलेला लघुपटही प्रसिद्ध आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या शिष्य परिवारामध्ये माधव गुडी, श्रीकांत देशपांडे, नारायण देशपांडे, उपेंद्र भट अशा अनेक शिष्यांचा समावेश होतो. पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल व योगदानाबद्दल त्यांना अनेक मान-सन्मान प्रदान करण्यात आलेले आहेत. यामध्ये... १९५४ - पुण्यातील ब्रम्हावृंदाकडून "पंडित" पदवी. १९६१ - उस्ताद बड़े गुलाम अली पुरस्कार. १९६४ - गायनाचार्य, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मिरज. १९७२ - पद्मश्री पुरस्कार. १९७२ - संगीतरत्न. १९७२ - श्री शंकराचार्यांकडून "स्वरभास्कर" ही उपाधी प्रदान. १९७६ - संगीत नाटक अकादमी पुरस्कार. १९८५ - पद्मभूषण. १९८५ - उत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. १९८६ - गुलबर्गा विद्यापीठाची डी.लीट पदवी. १९९१ - मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार. १९९१ - पुणे विद्यापीठाची डी.लीट पदवी. १९९३ - विश्वभारतीचा देशिकोत्तम पुरस्कार. १९९४ - टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची डी.लीट पदवी. १९९९ - पद्मविभूषण. २००० - आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार. २००१ - कन्नडा विद्यापीठाचा नदोजा पुरस्कार. २००२ - महाराष्ट्र भूषण. २००३ - केरळ सरकारचा "स्वाती संगीता" पुरस्कार. २००५ - कर्नाटक सरकारचा कर्नाटक रत्न पुरस्कार. २००८ - भारतरत्न २००८ - स्वामी हरीदास पुरस्कार. २००९ - दिल्ली सरकारचा जीवनगौरव पुरस्कार. २०१० - बंगळुरूचा राम सेवा मंडळीचा एस. व्ही. नारायणस्वामीराव राष्ट्रीय पुरस्कार. असा हा स्वरभास्कर, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील उच्चकोटीचे गायक कलावंत, २४ जानेवारी २०११ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. मात्र त्यांच्या सदाबहार मैफिलींच्या, अभंगवाणी, संतवाणी, यांच्या माध्यमातून ते रसिकांच्या नित्य स्मरणात राहतील.