लालगुडी जयराम (१७ सप्टेंबर, १९३० - २२ एप्रिल, २०१३) लालगुडी गोपाल अय्यर जयराम हे कर्नाटक शैलीच्या व्हायोलिन वादनास आंतरराष्ट्रीय दर्जाची कीर्ती प्राप्त करून देणारे पहिले प्रसिद्ध व्हायोलिन वादक, गायक आणि संगीतकार होते. भारतीय संगीतातील महान संत व संगीतकार त्यागराज यांच्या वंशामध्ये लालगुडी जयराम यांचा जन्म १७ सप्टेंबर, १९३० रोजी तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली जवळील लालगुडी येथे झाला. त्यांचे वडील गोपाल अय्यर वी.आर. हे कर्नाटक शास्त्रीय संगीतातील एक प्रतिभासंपन्न कलावंत होते.त्यांच्या वडिलांनी त्यांना अत्यंत कौशल्याने कर्नाटकी शास्त्रीय संगीताचे शिक्षण दिले होते. त्यामुळेच वयाच्या १२व्या वर्षीच लालगुडी जयराम यांनी व्हायोलिन वादक म्हणून सांगीतिक जीवनाची सुरुवात केली. आपली समृद्ध कल्पनाशक्ती, ग्रहणशक्ती तसेच कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध संगीततज्ञांच्या विविध व्यक्तिगत शैलीच्या अभ्यासातून, विविध संगीत समारोहातील मिळालेल्या समृद्ध अनुभवासोबतच त्यांची मेहनत, कर्नाटक संगीताबद्दलची त्यांची आवड आणि रुची यामधून आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या सांगितीक विचारांना अभिव्यक्ती देण्याच्या प्रबळ इच्छेमुळेच ते भारतीय कर्नाटक संगीतातील एक दुर्मिळ प्रतिभावंत एकल व्हायोलिन वादक म्हणून प्रसिद्ध झाले. लालगुडी जयराम यांनी कर्नाटकी शैलीची व्हायोलिन वादनाची एक नवीन पद्धती सुरुवात केली.त्यामुळे व्हायोलिन हे भारतीय शास्त्रीय संगीतासाठी अनुकूल वाद्य बनून व्हायोलिन वादनाची नवीन शैली निर्माण झाली. जी पुढे "लालगुडी बानी " या नावाने प्रसिद्ध झाली.पारंपरिक शैलीप्रमाणेच त्यांची शैलीही आकर्षक मौलिक स्वरूपाची होती. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना थिलानस, वरणम् आणि अनेक नृत्यरचणांच्या निर्मितीचे श्रेय दिले जाते.ज्यामध्ये राग, भाव, ताल आणि गीतात्मक सौंदर्य यांचे अद्भूत मिश्रण होते. व्हायोलिन वादनाची शैली व त्यामधील रचनांमध्ये त्यांनी गीतात्मक सामग्रीचे सादरीकरणही केले.कर्नाटकी शैलीच्या व्हायोलिन वादनास आंतरराष्ट्रीय दर्जाची कीर्ती प्राप्त करून देणारे पहिले व्यक्ती म्हणून लालगुडी जयराम यांना ओळखले जाते. सन १९९६ मध्ये व्हायोलीन, बासरी आणि वीणा यांचे एकत्रित मिश्रण करून नवीन स्वरूपात जुगलबंदीच्या मैफलीच्या कार्यक्रमांची सुरुवात सर्वप्रथम त्यांनी केली. भारतासोबत परदेशांमध्येही त्यांनी अनेक संगीत मैफलीचे सादरीकरण केले. सन १९६५ मध्ये एडिनबर्ग महोत्सवामध्ये लालगुडी जयराम यांच्या व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमाने प्रभावित होऊन जगप्रसिद्ध व्हायोलिन वादक यहुदी मेनुहिन यांनी त्यांना सुप्रसिद्ध इटालियन बनावटीची व्हायोलिन भेट दिली होती. सन १९७९ मध्ये आकाशवाणी केंद्र दिल्ली येथे केलेल्या ध्वनिमुद्रणास (रेकॉर्डिंग) आंतरराष्ट्रीय संगीत परिषद, बगदाद आशिया-पॅसिफिक रोस्टर व इराक प्रसारण एजन्सी याद्वारे प्राप्त विविध देशातील ७७ प्रवेशिकामधून जगामध्ये सर्वश्रेष्ठ रेकॉर्डिंग म्हणून घोषित केले होते. लालगुडी जयराम यांनी बेल्जियम, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, मनिला, जपान, इटली आणि पूर्व युरोपीय देशांमध्येही आपल्या अनेक विविधांगी व्हायोलिन वादनाच्या मैफिली सादर केल्या.भारत सरकार तर्फे त्यांना भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळातील सदस्य म्हणूनही रूस मध्ये पाठवण्यात आले होते. अमेरिका आणि लंडन येथे आयोजित " फेस्टिवल ऑफ इंडिया" या कार्यक्रमांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लालगुडी जयराम यांची निवड करण्यात आली होती.त्यावेळी त्यांनी एकल व जुगलबंदी अशा अनेक व्हायोलिन वादनाच्या मैफीली सादर केल्या ज्या खूप गाजल्या. सन १९८४मध्ये लालगुडी जयराम यांनी ओमान, संयुक्त अरब अमीरात, बहरीन, कतार या देशांचाही दौरा केला. ओपेरा बैले यांच्या "जय जय देवी" या गीताची व संगीताची त्यांनी रचना केली. ज्याची प्रिमियर १९९४ मध्ये क्वीनलंड (अमेरिका) येथे झाले तर संयुक्त राष्ट्रातील अनेक शहरामध्ये ते प्रदर्शित केले होते. ऑक्टोबर १९९९ मध्ये लालगुडी जयराम यांनी "श्रुथी लय संगम"(इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट) ब्रिटन येथे आपली कला प्रदर्शित केली.तसेच याचठिकाणी लालगुडी जयराम यांनी दिग्दर्शित केलेल्या "पंचेस्वरम " या नृत्यनाटिकेचे सादरीकरणही झाले होते. लालगुडी जयराम यांच्यासोबत साथ-संगत, जुगलबंदी आणि अनेक मैफिलीचे सादरीकरण केलेल्या कार्यक्रमांमध्ये अनेक कलावंतांचा समावेश होतो. यामध्ये अरियाकुडी रामानुजा अयंगर, चेंबई वैदीनाथ भागावतार, सेमांदगुडी श्रीनिवास अय्यर, जी.एन. बालसुब्रमण्यम, मदुराई मनि अय्यर, के.वी. नारायणस्वामी, महाराजापुरम संथानम, डि.के. जयरामन, एम. बालमुरली, टी.वी. संकर नारायण, टी. एन. शेष गोपालन, यासोबतच प्रसिद्ध बासरीवादक संगीतज्ञ एन. रमानी अशा महान विशेष गायक व संगीतकारांचा समावेश होतो. लालगुडी जयराम यांच्या पत्नीचे नाव राजलक्ष्मी होते. त्यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी मुलगा लालगुडी गोपाल अय्यर जयराम राधाकृष्ण हे जी.जे.आर. कृष्णन या नावाने ख्यातनाम असून मुलगी लालगुडी विजयालक्ष्मी आहे. हे दोघेही कर्नाटक संगीतामध्ये आपल्या वडिलांप्रमाणेच उत्कृष्ट व्हायोलिन वादक,गायक व संगीतकार आहेत. तर त्यांची भाची जयंती कुमारेश ही वीणावादक म्हणून प्रसिद्ध आहे. लालगुडी जयराम यांचे निधन २२ एप्रिल,२०१३ रोजी चेन्नई येथे झाले. थिलानस आणि वरणम् थिलानस आणि वरणम् यासाठी प्रसिद्ध असणारे श्री.लालगुडी जयराम यांना आधुनिक युगामध्ये सर्वात यशस्वी कर्नाटकी शास्त्रीय संगीतकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या रचना तामिळ, तेलगू, कन्नड आणि संस्कृत या चार भाषेत केलेल्या आहेत. रागातील सर्व क्षेत्रांमध्ये ते संगीत रचना करत.त्यांच्या रचनांमधील माधुर्य, ध्येयपूर्वक सूक्ष्म तालबद्ध पद्धती हे त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये होते. त्यांच्या अनेक रचना भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारांमधील नृत्यांगणामध्ये खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. तसेच कर्नाटक संगीतकारांमध्ये प्रमुख संगीतकार म्हणून लालगुडी जयराम यांना ओळखले जाते. लालबुडी जयराम यांनी केलेल्या विविध रचनांमध्ये काही विशेष अशा रचना. थिल्लानस - १. तेलगू भाषेतील केलेल्या विविध रागामधील रचना - बसंत, हमीर कल्याणी, आनंद भैरवी, रागेश्री. २. संस्कृत भाषेतील केलेल्या विविध रागामधील रचना - द्वीजवंती पहाडी, मोहना कल्याणी. ३. तामिळ भाषेतील विविध रागांमध्ये केलेल्या रचना - दरबारी कानडा, बागेश्री, देस, बेहग,काफी, तिलंग, कानडा, कुंतलावाराली, करनाकुठूहल, यमुना कल्याणी,सिंधू भैरवी, चेंचुरुट्टी, भिंमपलास, रेवती, वासंती, मधुवंती, खमस, मिश्रशिवरंजनी, मांद, हम्सनंदी, बिंदू मालिनी, नलीनकंथी, करनारंजनी, वरनम - यामध्ये निर्माण केलेल्या विविध रागातील रचना - देवी उन पादमे (देव गंधारी), नीवेगानी (मंदारी), चलमु सेयानेला (वालाजी), ऊनई याद्री (कल्याणी), तिरुमल मृगा उन थिरूनामाम (आंधोलीका), परम करुणा(गरुडध्वनी), नायक वल्लभी (मोहना कल्याणी), निवे गतीयानी (नालीना कांथी) पाद वरणम - यामधील विविध रागातील रचना - संथील मेवूम (नीलंबरी), इंनुंम एन मनम (चारुकेशी), देवर मुनिवर तोडूम(शंमुखाप्रिया), अंगयार्कांनी (राग मालिका, नवरस पाद वरणम ) कृथिस - संस्कृत भाषेतील कुमार गुरुगुहम (शांमुखाप्रिया), व श्रीजगदीश्वरी दुर्गा (अहिर भैरव), तामिळ भाषेमधील कांदन सेलांद्रो (नट कुरुंजी), तीन मदुराई वाज (हमसरूपिनी) व नी दयाई सेवावीदील (बेगाडा) तर तेलगु भाषेमधील विनायकुंनदेव (धर्मावती) याबरोबरच श्री. लालगुडी जयराम यांनी राग धनश्री मध्ये स्वाती थिरूनाल थिलना "गीतू धुनिका ताका धिम" स्वरबद्ध करून सध्याच्या स्वरूपात अनेक रचना बनवल्या. ज्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्या. तसेच या रचनाव्यतिरिक्त लालगुडी जयराम यांनी “जतीस्वरम” आणि “स्वराजती” यांची ही रचना केली. भरतनाट्यम नर्तकांमध्ये रसिकप्रिया रागातील जतीस्वरम लोकप्रिय आहे. त्यांनी सिंधू भैरवी, चेनचुरुट्टी, मोहन कल्याणी, बेहग, आणि तिलंग या रागांचा उपयोग करून ग्रहा भेडाम (मूर्छना) यांची ओळख करून देणारी अनोखी स्वररचना केली. अंबुजम कृष्णांच्या कित्येक कृत्यांसह असंख्य गाणी आणि रचना संगीतबद्ध करण्याची त्यांना खूप आवड होती. मानसन्मान व पुरस्कार श्री.लालगुडी जयराम यांच्या संगीतातील अलौकिक कार्यासाठी त्यांना विविध मानसन्मान व पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. १. म्युझिक लवर्स असोसिएशन ऑफ लालगुडी यांच्यातर्फे "नाद विद्या तिलक" या पुरस्काराने सन्मानित - १९६३. २. विद्या संगीत कलारत्न - भारती सोसायटी न्यूयॉर्क - १९७१. ३. संगीत चुडामणी - फेडरेशन ऑफ म्युझिक सभा चेन्नई - १९७१. ४. पद्मश्री - भारत सरकार - १९७२. ५. नाद विद्या रत्नाकर - ईस्ट-वेस्ट एक्सचेंज न्यूयॉर्क - १९७२. ६. स्टेट विद्वान ऑफ तामिळनाडू - तामिळनाडू राज्य - १९७२. ७. संगीत नाटक अकादमी पुरस्कार. - १९७९. ८. मेरीलँड अमेरिका मानद नागरिकत्व - १९९४. ९. पद्मभूषण - भारत सरकार - २००१ १०.श्रीनगरम् या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय फिल्म ॲवॉर्ड - २००६. ११. पहिला चौदईया मेमोरियल लेवल पुरस्कार.- कर्नाटक मुख्यमंत्री १२. संगीत नाटक अकादमी सदस्यत्व - २०१०.