चॅड ऑफ्रिकेच्या मध्यभागातील एक गणराज्य. क्षेत्रफळ सु. १२,८४,००० चौ. किमी.; लोकसंख्या ३७,०६,००० (१९७० अंदाज). हा देश सहारा आणि सॅव्हाना प्रकारच्या प्रदेशांदरम्यान, ८० उ. ते २३० उ. व १४० पू. ते २४० पू. यांमध्ये असून याच्या पूर्वेस सूदान, दक्षिणेस मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, पश्चिमेस कॅमेरून, नायजेरिया व नायजर आणि उत्तरेस लिबिया हे देश आहेत. फॉर्लामी ही राजधानी आहे. पश्चिमेकडील चॅड सरोवर नायजेरिया, नायजर, कॅमेरून व चॅड यांत विभागलेले आहे. भूवर्णन समुद्रापासून किमान १,४५० किमी. दूर असलेल्या या देशात, तिबेस्ती पर्वतप्रदेशातील मौंट एमीकूसी (३,४१५ मी.) सारखी उंच शिखरे व ६०० ते १,२०० मी. उंचीचे उत्तट सोडले, तर प्रमुख भौगोलिक वैशिष्ट्य चॅड सरोवर हे आहे. चॅडचा अंतर्गत जलवाहनाचा द्रोणीप्रदेश, आफ्रिकेतील अशा प्रदेशांपैकी सर्वांत मोठा असून त्यातील शारी नदी, समुद्राला न मिळणाऱ्या आफ्रिकेतील नद्यांपैकी सर्वांत मोठा आहे. तिला मिळणारी लोगोन नदी पुराचे वेळी चॅड सरोवराचे पाणी बेन्वे नदीत वाहून नेते. हवामानाच्या दृष्टीने चॅडचे तीन भाग पडतात : (१) उत्तरेकडील मरूप्रदेश. हा देशाचा जवळजवळ निम्मा भाग व्यापतो आणि तेथील हवामान सहारासदृश अतिउष्ण व शुष्क आहे. येथे सहारावरून येणाऱ्या हरमॅटन वाऱ्यांमुळे वाळूच्या टेकड्या निर्माण झालेल्या असून त्यांमधून चॅड सरोवराचा बाहर एल् गझल फाटा जातो. या भागात क्वचित पडणारा पाऊस एकूण २० सेमीं.पर्यंत असतो. (२) त्याच्या दक्षिणेस साहेल हवामान भागात हवामान उष्ण असून वार्षिक सरासरी पाऊस ७० सेंमी पेक्षा कमी पडतो. हा निमओसाड प्रदेश आहे. (३) दक्षिणेकडील सूदानी हवामानाचा सॅव्हाना प्रदेश. तुलनेने कमी उष्ण व अधिक पावसाचा आहे. येथे सरासरी तापमान ३५० से. असते. मे महिन्यात दुपारी तपमान ५०० से. पेक्षाही वर जाते. हिवाळ्यातील सरासरी तपमान १०० से. असून हरमॅटन वारे शुष्कता वाढवितात. या वेळेला सापेक्ष आर्द्रता २५% पेक्षाही कमी असते व रात्री धुकेही पडते. जुलै ते ऑक्टोबर पावसाळा असून पावसाचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे १०१ सेंमी. पासून २० सेंमी. पर्यंत कमी होत जाते. दक्षिणेकडील काही ठिकाणी ४९० सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. फॉर्लामी येथील वार्षिक सरासरी पर्जन्य २५ सेंमी. असून नद्यांचे पूर ही नेहमीचीच गोष्ट आहे. चॅडमध्ये जंगले नाहीत. जलाभावसहिष्णू नैसर्गिक वनस्पती, काटेरी, झुडपे, जाड गवत व बाभळीच्या जातीची झाडे ही सर्वसाधारण वनस्पती आहे. सहारात मरूज वनस्पती सापडत असून, सहारा व सूदान दरम्यानच्या सु. ३२२ ते ४८३ किमी. रूंद प्रदेशात बाभूळ, मिमोसा, पाम इ. मिश्र वनस्पती सापडते. चॅड सरोवर व शारी नदीच्या परिसरात दलदली असून शेवाळसम वनस्पती आढळते. दक्षिणेकडे सॅव्हाना गवताचा प्रदेश आहे. उत्तरेकडील मरूप्रदेशात उंट हा प्रमुख प्राणी आहे, तर दक्षिणेकडे उष्ण कटिबंधातील इतर प्राण्यांव्यतिरिक्त हत्ती, सिंह, गेंडा, चित्ते, जिराफ, शहामृग, म्हशी इ. महत्त्वाचे आहेत. स्त्रोत: मराठी विश्वकोश