चेकोस्लोव्हाकिया झेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोवेन्स्का सोशॅलिस्टिका रिपब्लिका. मध्य यूरोपातील एक प्रजासत्ताक. क्षेत्रफळ १,२७,८७६ चौ. किमी.; पैकी स्लोव्हाकिया ४९,०१४ चौ. किमी. लोकसंख्या १,४४,८१,३०४ (जुलै १९७२), पैकी ४६,०१,८२३ स्लोव्हाकियात. राजधानी प्राग (प्राहा) लोकसंख्या ११,०३,००० (१९७२). ४७० ४४' उ. ते ५१० ३' उ. (सु. २६९ किमी.) आणि १२० ५' पू. ते २२० ३४' पू. (सु. ७६७ किमी.) यांदरम्यान विस्तारलेल्या या देशाच्या दक्षिणेस हंगेरी (चेकोस्लोव्हाकियाशी ६७५ किमी. सरहद्द) व ऑस्ट्रिया (५६६ किमी.); नैर्ऋत्येस, पश्चिमेस व वायव्येस जर्मनी (८०९ किमी.); उत्तरेस पोलंड (१,३८४ किमी.) आणि पूर्वेस रशिया (९७ किमी.) आहे. भूवर्णन पश्चिमेकडचा हर्सिनियन खडकांचा उंच प्रदेश आणि पूर्वेचा तृतीयक कालखंडातील खडकांचा भाग हे यूरोपातील भिन्न भूप्रकार या देशात समोरासमोर येतात; त्याचप्रमाणे उत्तर यूरोपचा मैदानी प्रदेश आणि दक्षिण यूरोपचे डॅन्यूबचे मध्य खोरे याच देशात एकमेकांना जोडली जातात; त्यामुळे चेकोस्लोव्हाकियाला यूरोपचा चौक किंवा चव्हाटा ही भौगोलिक संज्ञा यथार्थतेने मिळालेली आहे. देशाचे तीन स्पष्ट नैसर्गिक विभाग पडतात : पश्चिमेस प्राचीन कठीण खडकांचा बोहीमिया हा एकसंघ पर्वतपुंज; त्याच्या मध्याला पठार व सखल प्रदेश आणि भोवताली पर्वतराजींचे कडे; त्याच्या पूर्वेस मोरेव्हियाचा सपाट प्रदेश आणि त्याच्याही पूर्वेस कार्पेथियन पर्वतभागात स्लोव्हाकिया. बोहीमियाच्या कडेकडेचे बहुतेक पर्वत एकदम उभ्या चढाचे असून शुमाव्हा आणि कर्कॉनॉशेसारख्या भागांत खूप उंच आहेत; दक्षिणेकडे मात्र पठार थोड्या गोल टेकड्यांपुरतेच उंचावलेले व संचारास सोपे आहे. बाकीच्या तीन दिशांना दळणवळणास उत्तुंग पर्वतांचा प्रतिबंध असून विशेषतः नैर्ऋत्य भागात शुमाव्हा व चेस्कीलेस हे बोहीमियन वनप्रदेश दुर्लंघ्य आहेत. वायव्येस क्रुश्ने हॉरी हा धातुक पर्वत लोहेतर खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. ईशान्येत सुडेटन पर्वतांच्या त्रुटित रांगा आहेत. कर्कॉनॉशे हे या भागातील सर्वांत उंच (१,६०२ मी.) शिखर होय. या भागात कित्येक खोलगट प्रदेश असून कोळशाच्या खाणी व विद्युत्निर्मितीस उपयुक्त जलप्रवाह आहेत. बोहीमियाच्या उत्तर भागातील सखल प्रदेशात अनेक डोंगर, उर्मिल भूप्रदेश, टेकड्या, नद्या व सुपीक खोरी आढळतात. धातुक पर्वताला समांतर अशी ज्वालामुखीजन्य डोंगराची चेस्के स्त्रेदोहॉरी ही रांग असून तिच्या दक्षिणेस खोलगट प्रदेशात कोळशाच्या खाणी आणि दुपाउफ्स्की हॉरीच्या सलग टेकड्यांचा एक विस्तीर्ण डोंगरभाग आहे. त्याच्या कडांतून कित्येक ठिकाणी नैसर्गिक औषधी पाण्याचे गरम झरे आहेत. दक्षिण बोहीमियाचे पठार उत्तर भागापेक्षा बरेच उंच असून त्यात नद्यांनी खणून काढलेल्या खोल दऱ्या आढळतात. पूर्वी बर्डी टेकड्यांसारख्या भागात सापडणाऱ्या लोहधातुकाचा साठा आता संपलेला आहे; तथापि कोळसा आणि लोहधातुकावर आधारलेली बोहीमियाची परंपरागत कारखानदारी पल्झेनसारख्या औद्योगिक केंद्रात आयात लोखंडकोळशावर चालू आहे. मोरेव्हिया-सायलीशिया हा मध्यवर्ती नैसर्गिक विभाग भूपृष्ठरचनेतील दोन वेगळ्या जातींच्या खडकांमधील सीमाप्रदेश आहे. मोरेव्हिया हे डॅन्यूबच्या मोराव्हा उपनदीचे ऊर्मिल क्षेत्र हे दक्षिणेचे डॅन्यूब मैदान व उत्तरेचे सायलीशिया मैदान यांना जोडणारे आहे. पश्चिमेकडून बोहीमियाच्या टेकड्या या बाजूस सावकाश उताराने आलेल्या आहेत. पूर्वेस मात्र कार्पेथियमच्या बेस्किदी पर्वतभागाकडे चढ एकदम सुरू होतो. ईशान्येकडे अरुंद होत गेलेल्या या सपाट प्रदेशात मोराव्हाला मिळणाऱ्या नद्या आहेत. बेच्व्हा नदी आणि मोरेव्हीयाचे महाद्वार, ‘मॉराफ्स्का ब्राना’ ही विख्यात खिंड याच भागात आहे. येथून जवळच ओडर (ओड्रा) नदी उत्तरेकडे पोलंडमध्ये प्रवेश करते. डॅन्यूब नदीखोरे व उत्तर यूरोप मैदान यांच्या दरम्यान सोईचा हा एक ऐतिहासिक मार्ग असून आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या याला अनन्यसाधारण महत्व आहे. यावरून रस्ते व लोहमार्ग गेले आहेत आणि डॅन्यूब व ओडर नद्यांना जोडणारा संकल्पित कालवाही याच मार्गाने जाणारा आहे. दक्षिण मोरेव्हियाची भूमी सुपीक आहे. अगदी उत्तरेकडच्या प्रदेशात सायलीशियन कोळसाक्षेत्राचा नैर्ऋत्य भाग येतो; तेथील खाणींतील कोळशावर लोखंड-पोलादाचे मोठे कारखाने चालतात. स्लोव्हाकियातील कार्पेथियन पर्वतप्रदेश म्हणजे ऑस्ट्रियातील आल्प्सच्या विस्ताराचा डॅन्यूबच्या पलीकडे ईशान्येकडे गेलेला भाग होय. दक्षिणेत पश्चिम-पूर्व रांगा असलेले छोटे कार्पेथियन (मार्ले कार्पेटी) उत्तरेकडे उंच होत जातात. त्यांच्या रांगांदरम्यान रुंद खोरी आहेत. अगदी उत्तरेकडे बेस्किदी पर्वताचे तुटक कणे असून तो प्रदेश संचार सुलभ आहे. त्याच्या दक्षिणेस उंच तात्रा पर्वत असून त्यातील गेर्लाकॉफ्का (पूर्वीचे स्टालिनो) हे २,६५५ मी. उंचीचे देशातील सर्वोच्च शिखर आहे. त्यांच्या दक्षिणेस लिप्टॉफ्स्की खोरे व ठेंगू तात्रा आणि अगदी दक्षिणेस स्लोव्हाकियन धातुकपर्वत असून हेही हालचालींना सोपे आहेत. पूर्वी हा भाग खनिजसंपन्न होता; आता उपयुक्त वनांनी आच्छादित आहे. अनेक जातींच्या खडकांचा परिणाम त्यांच्यावरील जमिनींवर झालेला असून हवामानपरत्वेही मातीच्या रचनेत फरक आढळतो. स्थूलमानाने वायव्य बोहीमियातील पोलाबी व दक्षिण मोरेव्हिया ही दोन केंद्रे वेगवेगळ्या प्रकारांच्या मातींच्या पट्ट्यांनी वेढलेली असून मध्यभागी माती कसदार, मिश्र काळी व वायुवाहित आहे. त्याभोवती मध्य बोहीमियाच्या व दक्षिण मोरेव्हियाच्या वनप्रदेशांची सुपीक तपकिरी रंगाची मृदा आहे. त्याच्याभोवती बोहीमिया, सायलीशिया व उत्तर मोरेव्हियात, कुजलेला पालापाचोळा व खनिजमिश्रित आणि डोंगराळ प्रदेशात उथळ, खडक-दगडांनी भरलेली मृदा आहे. कोठे-कोठे वायुवाहित मृदा आढळते. गाळजमिनी जास्त समृद्ध आहेत. स्लोव्हाकियाच्या नदीखोऱ्यांतून गाळमाती व खोलगट प्रदेशात कुजलेल्या गवताची माती असून दलदलींचा चिखल व कित्येक ठिकाणी खारमातीचे पट्टे आढळतात. सामान्यतः उत्तर मोरेव्हियाची जमीन चुनखडीमिश्रित व दक्षिणेत वायुवाहित मृदांनी संपन्न आहे. बोहीमियाच्या उत्तरेत खालच्या मृदांवर वायुवाहित मृदांचे थर असून दक्षिणेस दाट चिकणमाती आढळते. स्लोव्हाकियाच्या काही डोंगराळ भागात ज्वालामुखीजन्य सुपीक भूमी आणि दक्षिण भागात दलदलींचा निचरा करून बनवलेली गाळजमीन आढळते. कोळसा, अँटिमनी, पारा, युरेनियम, ग्रॅफाइट, चिनी माती, काचेसाठी रेती, चुनखडक, चांदी आणि पायराइटचे कमीअधिक साठे देशात असून काही खनिजे पुरेशा प्रमाणात मिळतात. बोहीमिया व सायलीशियात लिग्नाइट, बोहीमियात अँथ्रासाइट व देशभर बिट्युमिनस कोळसा सापडतो. स्लोव्हाकियाच्या धातुक पर्वतात बरेचसे लोहधातुक, काही तांबे, शिसे, मीठ व जिप्सम उपलब्ध होते. वायव्य बोहीमियात मर्यादित प्रमाणात शिसे, तांबे, टंगस्टन आणि पिच ब्लेंड सापडते. खनिज तेलाचेही उत्पादन अगदी थोडे आहे. कित्येक शतके चांदीच्या खाणींबद्दल विख्यात असलेल्या याखिमॉफजवळ आता युरेनियम निघते. देश भूवेष्टित असल्यामुळे समुद्रापर्यंत पोहोचणाऱ्या तीन नद्यांना विशेष महत्त्व आहे. जर्मनीमार्गे उत्तर समुद्राला मिळणाऱ्या लाबे (एल्ब) नदीच्या ऑर्झे (एगर), बेरोंका व व्हल्टाव्हा या महत्त्वाच्या उपनद्या बोहीमियात वाहतात. मोरेव्हियाच्या उत्तर भागात उगम पावणारी ओड्रा (ओडर) पोलंडमधून जाऊन बाल्टिक समुद्राला मिळते. काळ्या समुद्राला मिळणाऱ्या डॅन्यूबची महत्त्वाची उपनदी मोराव्हा देशाच्या मध्यातून वाहते. तिला मोरेव्हियातून डिये, इग्लाव्हा व स्विताव्हा मिळतात व स्लोव्हाकियातून डॅन्यूबला व्हा, न्यित्रा व हरॉन मिळतात. दक्षिण बोहीमियात ट्रेबॉन व बुद्येयॉव्हित्से प्रदेशांत अनेक तळी व डबकी आहेत. स्लोव्हाकियाच्या उंच तात्रा पर्वतभागात हिमगव्हरे व त्यांत पाणी साचून निर्माण झालेली कित्येक लहान निसर्गरम्य सरोवरे आहेत. प्रदेशाच्या उंचसखल स्वरूपानुसार हवामानात फरक आढळतो. चेक विभागाच्या खोलगट प्रदेशात महाद्वीपीय हवामान तर सभोवारच्या उंच प्रदेशात ते अधिक सौम्य आढळते, त्याचप्रमाणे स्लोव्हाकियाच्या हिमाच्छादित पर्वतभागाहून अगदी भिन्न हवामान डॅन्यूबकाठच्या मैदानात आढळते. थंड व उष्ण हवामानातील फरक पूर्वेकडे किंचित वाढत जातो. अधिक पाऊस उन्हाळ्यात पडतो. पश्चिमेकडे बोहीमियात प्राग येथे पाऊस कमी (४८३ मिमी.), किमान तापमान –३० से. व कमाल १९·५० से. असते. बोहीमियात व मोरेव्हियात वरचेवर धुके पडते. कार्पेथियन पर्वतभागात दर १०–१५ वर्षांनी जोरदार विध्वंसक वादळे होतात. देशाचे स्थान नैसर्गिक खंडविभागाच्या पश्चिम-पूर्व व उत्तर-दक्षिण सीमांच्या छेदप्रदेशावर असल्यामुळे चारही विभागांतील वनस्पती चेकोस्लोव्हाकियात आढळतात, त्याचप्रमाणे भूमीचा उंचसखलपणा, मृदांच्या तऱ्हा आणि हवामानांचे फरक वनस्पतींच्या विविधतेत व्यक्त होतात. देशाची तृतीयांशावर भूमी वनाच्छादित असून बोहीमिया–मोरेव्हिया–सायलीशियातील वने अनेक वर्षे काळजीपूर्वक जोपासलेली आणि युद्धविध्वंसातूनही टिकवून ठेवलेली आहेत. स्प्रूस, फर, स्कॉट पाइन अशा सूचिपर्ण वृक्षांचे प्रमाण दोनतृतीयांशाहून अधिक आहे. बोहीमियाच्या सीमेवरील पर्वतांतून बेच्व्हा व लाबे नदीच्या उत्तरेस ओक वृक्षांची उत्तम झाडी आहे. शुमाव्हा पर्वतराजीत मूळ नैसर्गिक स्थितीतील वनप्रदेश आहे. स्लोव्हाकियात पानझडी वृक्षांचे प्रमाण सु. निम्मे व तृतीयांश वनभाग बीच वृक्षांचा असून उंच पर्वतप्रदेशात अल्पाइन व सपाटीवर गवताळ मैदानावरच्या जातीचा वनस्पतिसमूह आढळतो. पूर्व स्लोव्हाकियातील प्रेशॉफ-कॉशित्से हा डोंगरकणा पश्चिम व पूर्व यूरोपदरम्यानची वनस्पतिसीमा असल्याचे आढळून आले आहे. थोड्या प्रमाणात अस्वल, लांडगा, लिंक्स व रानमांजर; अधिक प्रमाणात ऑटर, बॅजर, पोलकॅट, मार्टेन व मिंक वनांमधून लाल हरिण, तरो व रानडुक्कर; काही पर्वतप्रदेशात मुद्दाम आणून सोडलेले शॅमॉय हरिण असे प्राणी येथे आहेत. सोनेरी व शुभ्रपुच्छ गरुड, ऑस्प्री, ग्रिकॉन, ईजिप्शियन गिधाड आणि गरुडघुबड तसेच अनेक प्रकारांचे जलपक्षी व दलदलीतील पक्षी, काळे व पांढरे करकोचे येथे आहेत. माशांपैकी डॅन्यूबमधला प्रचंड कॅटफिश ‘वेल्स’ विशेष उल्लेखनीय असून डबक्यातील कासवे, अनेक जातींचे सर्प, सरडे, पाली व बेडूक हे प्राणीही आहेत. स्त्रोत: मराठी विश्वकोश