डेन्मार्क यूरोपच्या उत्तरेकडील स्कँडिनेव्हिया प्रदेशातील एक सांवैधानिक राजेशाहीचा देश. क्षेत्रफळ ४३,०६९ चौ. किमी. त्यापैकी ७०० चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या ५०,३६,१८४ (१९७४ अंदाज). विस्तार ५४° ३३' उ. ते ५७° ४५' उ. आणि ८° ४' पू. ते १५° १२' पू. यांदरम्यान. पूर्व-पश्चिम विस्तार सु. ४०० किमी. व दक्षिण-उत्तर सु. ३५२ किमी. यात जटलंड द्वीपकल्पाचा सु. ३०,०९५ चौ. किमी. प्रदेश आणि त्याच्या पूर्वेची फ्यून, लॉलान, झीलंड, ॲल्स, ॲर, टॉसिंग, लांगलॅन, साम्स, फाल्स्टर, बॉव, आमॅयर, बॉर्नहॉल्म व पश्चिमेची फान, रम इ. एकूण ४८२ बेटांचा सु. ५,००० चौ. किमी. प्रदेश येतो. बॉर्नहॉल्म बेट बाल्टिक समुद्रात झीलंडच्या पूर्वेस सु. १६० किमी. असून ते स्वीडनपासून फक्त ४० किमी. आहे. जटलंडची दक्षिणेकडील जर्मनीशी असलेली केवळ सु. ६७ किमी.ची सरहद्द सोडली, तर डेन्मार्क हा एक द्वीपसमूहच आहे. डेन्मार्कच्या पश्चिमेस उत्तर समुद्र, उत्तरेस स्कॅगरॅक हा उत्तर समुद्राचा फाटा, पूर्वेस कॅटेगॅट, उरसुंद व बाल्टिक समुद्र हे जलविभाग आणि दक्षिणेस प. जर्मनी व बाल्टिक समुद्र आहेत. द्वीपकल्प व बेटे या भूमिस्वरूपामुळे डेन्मार्कला क्षेत्रफळाच्या मानाने फार मोठा ७,४०० किमी. समुद्रकिनारा लाभला आहे. अटलांटिकमधील ग्रीनलंड – ५९° ४६' उ. ते ८३° ३९' उ. आणि ११° ३९' प. ते ७३° ८' प.; क्षेत्रफळ २१,७५,६०० चौ. किमी. लोकसंख्या ४८,५८१ (१९७२) व फेअरो – ६१° २६' उ. ते ६२° २४' उ. व ६° १५' प. ते ७° ४१' प.; क्षेत्रफळ १.३९९ चौ.किमी. लोकसंख्या ३९,१६२ (१९७२). ही बेटे भौगोलिक दृष्ट्या डेन्मार्कमध्ये नसली, तरी ती राजकीय दृष्ट्या डेन्मार्कचेच अंगभूत विभाग मानले जातात. [⟶ ग्रीनलंड; फेअरो]. मध्य यूरोप व स्कँडिनेव्हिया यांना जोडणारा दुवा व बाल्टिक समुद्राच्या पश्चिमद्वारावरील रक्षक या दृष्टीने डेन्मार्कचे स्थान मोक्याचे आहे. त्यामुळे डेन्मार्कद्वारा माल, लोक आणि कल्पना यांची देवघेव दीर्घकाळ होत आलेली आहे. सुपीक व सपाट जमिनीमुळे डेन लोक यशस्वी शेतकरी झाले आणि बहुतेक सर्व बाजूंनी सागरवेष्टित असल्यामुळे ते धाडसी खलाशी आणि कुशल व्यापारी बनले. उत्तर समुद्र व पश्चिम यूरोपीय समृद्ध औद्योगिक राष्ट्रे यांच्या सान्निध्यामुळे आज डेन्मार्क हा एक उच्च जीवनमानाचा प्रगत देश आहे. त्याची कोपनहेगन ही राजधानी आपले पूर्वापार महत्त्व टिकवून आहे. भूवर्णन डेन्मार्क हा भूस्तरावरील हिमयुगीन घडामोडींनी चतुर्थक काळातील बनलेला देश असून लहान लहान चढउतारांनी सर्व भूपृष्ठ ऊर्मिल भासते. जटलंडमधील ईजर बाव्हनहॉज ही सर्वांत उंच टेकडी समुद्रसपाटीपासून केवळ १७३ मी. उंच आहे. डेन्मार्कची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची फक्त ३० मी.च्या आसपास आहे. जटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील निसुम फ्योर्डपासून पूर्वेस व्हीबॉरवरून दक्षिण सीमेवरील प्लेंझबर्ग या जर्मन शहरापर्यंतची रेषा सु. ६ लक्ष वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शेवटच्या हिमानीक्रियेची सीमा होय. बॉर्नहॉल्म बेटाचा अपवाद वगळल्यास भूशास्त्रदृष्ट्या डेन्मार्क दक्षिणेकडील जर्मन-स्कॉटिश पर्वतश्रेणी व उत्तरेकडील स्कँडिनेव्हिया-रशिया पर्वतश्रेणी यांच्या मधल्या खळग्यात आहे. उत्तर बॉर्नहॉल्ममध्ये स्वीडनमधल्या खडकांसारखे ग्रॅनाइटी खडक आहेत व दक्षिणेकडे त्यांवर वालुकाश्म व शेल यांचे आवरण आहे. तेथे केओलीन मातीही मिळते; परंतु डेन्मार्कच्या इतर भागांत चुनखडीचा खडक व हिमयुगीन पीट, लिग्नाइट इ. आहेत. डेन्मार्कचे भूपृष्ठ व जमीन यांची घडण हिमयुगांत व नंतर झालेली असल्याने भूपृष्ठ सामान्यतः हिमप्रवाहाने आणलेल्या गाळाने, चिबड पाणथळ जमिनीने आणि टेकाडांनी बनलेले आहे. जटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर चिबडरान व वालुकामय टेकाडे आहेत, तर पूर्वेकडे व उत्तरेकडे सुपीक, दुमट मैदाने आणि टेकड्या आहेत. झीलंड बेटावर आग्नेयीकडे चुनखडक व टीव्हन्सक्लिंट, बुल्बजर्ग व मॉन्सक्लिंट येथे खडूचे उभे कडे आहेत. डेन्मार्कचा काही भाग विशेषतः रिब व ट्यूबॉरन हा जटलंडचा भाग व लॉलान बेटाचा दक्षिण भाग समुद्रसपाटीच्याही खाली असल्याने किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी बंधारे घालावे लागले आहेत. डेन्मार्कमध्ये किरकोळ नदीनाले, सरोवरे विपुल आहेत. पूर्वमध्य जटलंडमध्ये उगम पावून रानर्स शहराजवळ कॅटेगॅट समुद्राला मिळणारी १५० किमी.ची गूदनॉ डेन्मार्कमधील सर्वांत मोठी नदी होय. भूवेष्टित जलाशय पुष्कळ असले तरी क्षुल्लक आहेत. उत्तर झीलंडमधील ॲरेसो व जटलंडमधील मॉससो हे सर्वांत मोठे अंतर्गत जलाशय आहेत. डेन्मार्कचा किनारा अतिशय दंतूर असल्याने व त्यांत अनेक उपसागर, खारकच्छ, फ्योर्ड वगैरे असल्याने जलवाहतुकीस सोयीचा झाला आहे. उत्तर समुद्रापासून कॅटेगॅटपर्यंत जाणारा लिम फ्योर्ड सर्वांत महत्त्वाचा आहे. कोपनहेगन, एस्बीअर्ग, ऑलबॉर्ग, ऑर्हूस ही डेन्मार्कची प्रमुख बंदरे आहेत. पूर्वेकडील बेटे एकमेकांपासून व जटलंडपासून समुद्राच्या पट्ट्यांनी वेगळी झालेली आहेत. त्यांना दी ग्रेट बेल्ट म्हणजे मोठा पट्टा, दी लिट्ल बेल्ट म्हणजे लहान पट्टा व लांगलॅनचा पट्टा म्हणतात. स्वीडनचे दक्षिण टोक व झीलंड बेट यांदरम्यान उरसुंद उपसागर आहे. हवामान डेन्मार्क समशीतोष्ण हवामानाच्या पट्ट्यात आहे. येथे पूर्व यूरोप, आर्क्टिक व अटलांटिक यांवरून अगदी विभिन्न वायुलोट येत असल्यामुळे हवा नेहमी बदलती असते. पश्चिम किनाऱ्याजवळून जाणाऱ्या उत्तर अटलांटिक प्रवाह या गल्फ प्रवाहाच्या अंतिम भागामुळे विशेषतः हिवाळ्यात फार फायदा होतो. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत सरासरी तपमान –०·१° से. म्हणजे त्या अक्षांशातील सरासरी तपमानापेक्षा सु. १२° से. जास्त असते, तर जुलै महिन्यातील सरासरी तपमान १६° से. जाते. या देशात सामान्यतः पश्चिमी वारे वाहत असल्याने व संपूर्ण देश जलवेष्टित असल्याने दिवस-रात्रीच्या तपमानांत फारसा फरक जाणवत नाही. पाऊस जवळजवळ वर्षभर ४० ते ८० सेंमी. पडतो. पावसाचे प्रमाण वसंतात कमी व अन्य ऋतूंत विशेषतः उन्हाळ्याच्या उत्तरार्धात जास्त असते. बर्फाचा काळ किनाऱ्यावर ७० दिवस व अंतर्भागात १२० दिवस असतो. वनस्पती व प्राणी या देशात चौदाशे जातींची फुलझाडे, सु. चारशे प्रकारचे शेवाळे, तीस प्रकारचे नेचे व कवक आहेत. देशाचा सु. १०% प्रदेश वनाच्छादित आहे. वृक्षात फर, बीच, स्प्रूस, लार्च, पाइन, ओक जास्त असून ॲश, रेड आल्डर, पॉपलर, एल्म, मॅपल हेही वृक्ष बरेच दिसतात. जटलंडच्या निकृष्ट भागात लहान झुडुपे आहेत. वन्य व हिस्र पशू डेन्मार्कमध्ये फारसे नाहीत. ससा, काही जातींचे मृग, बिज्जू, बॅजर, खार, मार्टिन, खोकड हे प्राणी बरेच आहेत. येथील पांढरा मिंक प्रसिद्ध आहे. सु. ३३३ प्रकारचे पक्षी डेन्मार्कमध्ये दिसतात. त्यांपैकी १६३ डेन्मार्कमधील असून बाकीचे हिवाळ्यात अन्य देशांहून स्थलांतर करून येणारे आहेत. मासे भरपूर आहेत. तथापि प्रदूषणामुळे गोड्या पाण्यातील मासे वगैरे कमी झालेले आहेत. इतिहास डेन्मार्कचा अतिप्राचीन इतिहास फारसा माहीत नाही. सु. ११ हजार वर्षांपूर्वी येथे मच्छीमारी व शिकार करून राहणारा मानव समाज होता असे दिसते. इ. स. पू. दोन-तीन शतके सिंब्री व ट्युटॉनी टोळ्या डेन्मार्कमध्ये राहत होत्या. त्यांनी अनेक यूरोपीय देशांना सतावून सोडले होते. इ. स. पू. १०२ च्या सुमारास रोमन सैन्याने त्यांचा निकाल लावला, तरीडेन्मार्कमधील निरनिराळ्या टोळ्यांचे इतर देशांवर आक्रमण चालूच राहिले. जटलंडमधील जूट व ॲगल्स टोळ्या इंग्लंडवर चालून गेल्या व इंग्लंडच्या काही भागांत त्यांनी वसाहतीही स्थापन केल्या. स्त्रोत: मराठी विश्वकोश