थायलंड (प्राथेट थाय). आग्नेय आशियातील एक सार्वभौम देश. प्राचीन काळी भारतीय लोकांनी वसाहती केलेल्या देशांपैकी बृहत् भारतातील महत्त्वाचा देश. ६° ते २०° उ. व ९७° ते १०६° पू. यांदरम्यान असून कमाल दक्षिणोत्तर लांबी १,५०० किमी. व कमाल रूंदी ८३० किमी. आहे. क्षेत्रफळ ५,१४,००० चौ. किमी. असून देशाची एकूण लोकसंख्या ३,९९,५०,३०६ (१९७३). १९३९ पूर्वी याचे ‘सयाम’ असे नाव होते. थाई भाषेत देशाचे नाव मुआंग थाय व अधिकृत नाव प्राथेट थाय (स्वतंत्रांची भूमी) असे असून इंग्रजी भाषेत थायलंड असे नाव १९३९–४५ व त्यानंतर १९४९ पासून आजतागायत प्रचलित आहे. त्यापूर्वी व १९४५–४९ या कालावधीत सयाम हे नाव वापरात होते. थायलंडच्या पूर्वेस व ईशान्येस लाओस, पश्चिमेस व वायव्येस ब्रह्मदेश, आग्नेयीस ख्मेर प्रजासत्ताक आणि दक्षिणेस थायलंडचे आखात (सयामचे आखात) असून दक्षिणेस तेनासरीम पट्टीच्या क्रा संयोगभूमीच्या दक्षिण टोकास मलेशियातील मलाया द्वीपकल्पाची सीमा आहे. बँकॉक (लोकसंख्या ३९,६७,०८१–१९७३) ही थायलंडची राजधानी आहे. भूवर्णन थायलंड पूर्णपणे उष्ण कटिबंधात मोडतो. देशाचा उत्तर भाग व विशेषतः दक्षिणेचा भाग चिंचोळा व लांब आहे. दक्षिणेचा भाग तेनासरीम म्हणून ओळखला जातो व तो क्रा संयोगभूमीचा भाग आहे. देशास दीर्घ किनारा लाभला असून त्याची लांबी २,७०० किमी. आहे. देशाचा सर्वसाधारण आकार व एकूण भौगोलिक रचना यांबाबत ब्रह्मदेश व थायलंड यांत बरेच साम्य आहे; पण थायलंड हा यूरोपीयांची कधीही वसाहत नव्हता. ब्रिटिश आणि फ्रेंच हितसंबंधांबाबत तडजोडीचे धूर्त धोरण ठेवून थाई लोकांनी आपला देश वसाहतीच्या धोक्यापासून स्वतंत्र राखला; पण हे करताना आज थायलंड फिलिपीन्सप्रमाणे पाश्चात्त्य धर्तीचे जीवन स्वीकारून बसला आहे. थायलंडच्या पश्चिम बाजूस डोंगराळ भाग असून त्याची उंची उत्तरेस वाढत जाते. पूर्व बाजूस उत्तरेस रूंद असणारे खोरातचे पठार आहे व मध्यभागी चाऊ फ्राया ह्या देशातील प्रमुख नदीचे सखल मैदान आहे. प्राकृतिक रचनेनुसार देशाचे चार विभाग पडतात : (१) उत्तरेकडील पर्वतप्रदेश (२) मध्य मैदान (३) खोरात (कोराट) पठार (४) तेनासरीम थायलंड (द. चिंचोळी पट्टी – क्राची संयोगभूमी). उत्तरेच्या डोंगराळ भागात घड्यांचे पर्वत असून त्यांची रचना सामान्यतः दक्षिणोत्तर आहे. दोई इंतानॉन हे थायलंडमधील सर्वोच्च शिखर (२,५९५ मी.) या भागातच आहे. या डोंगररांगांमधूनच चाऊ प्रायाच्या सुरूवातीच्या उपनद्या दक्षिणेस वाहतात, त्यांत पश्चिमेकडून पूर्वेस वाहणाऱ्या पिंग, वांग, यॉम व नान या प्रमुख आहेत. मध्य मैदान किंवा मेनामचे खोरे हाच थायलंडचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. मेनाम (चाऊ फ्राया) या नदीच्या खोऱ्याचा हा प्रदेश दक्षिणोत्तर सु. ५०० किमी. व रूंदीने २५० किमी. आहे. उत्तर पर्वतापासून दक्षिणेस सयामच्या आखातापर्यंत सलगपणे हे मैदान पसरले आहे. चाइनात गावाच्या दक्षिणेस चाऊ फ्रायाच्या उपमुख नद्या सुरू होतात. या उपमुख नद्या व पूर्वेकडील पासाक आणि पश्चिमेकडील मेक्लाँग या नद्या कालव्यांनी परस्परांस जोडल्याने ह्या प्रदेशांत जलमार्गाचे विस्तृत जाळे निर्माण झाले आहे. या कालव्यांस खोलांग म्हणतात. चाऊ फ्राया व इतर नद्यांचा मिळून सयामच्या आखातात संयुक्त त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे (थाई भाषेतील मेनाम किंवा माएनाम या शब्दाचा अर्थ नदी असा आहे व त्यानंतर नदीचे विशेषनाम येते. उदा., माएनाम पिंग, माएनाम चाऊ फ्राया इ.; पण चाऊ फ्राया ही नदी इतकी मोठी व महत्त्वाची आहे, की तिचा उल्लेख बऱ्याच वेळा मेनाम–माएनाम–असाच करतात. जसा चीनमध्ये तांदूळ व जेवणे या दोहोंस एकच शब्द आहे.) हा सर्व प्रदेश दक्षिणेस अत्यंत सपाट व सखल आहे. अयुथ्थ्या हे किनाऱ्यापासून १०० किमी. अंतरावरचे शहर केवळ ४ मी. उंचीवर आहे. त्यामुळे दरवर्षी या भागात पुराचे खूपच पाणी साचते. खोरातचे पठार देशाचा एकतृतीयांश भाग व्यापते आणि त्यावर तेवढीच लोकसंख्या आहे. पठाराची पश्चिम व दक्षिण कडा दाट जंगलमय आहे. पठाराचा उतार मंद व पूर्वेस उतरता असून पठारावरून वाहणाऱ्या माएनाम ची व माएनाम मून या नद्या पूर्वेस वाहतात व पुढे एक होऊन सीमेवर मेकाँग नदी खोरात पठाराच्या पूर्व सीमेवरून वाहते व बऱ्याच अंतरापर्यंत ती थायलंड व लाओस यांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ची आणि मून नद्यांची खोरी उथळ आहेत व मेकाँगला पूर येताच बरेच पाणी मागे फिरून खोरी जलमय होतात; पण रेती खडकापासून बनलेली मातीच नापीक असल्याने पिके फारशी चांगली येत नाहीत. दक्षिणेकडचा तेनासरीमचा भाग अत्यंत अरूंद असून तो प्राचुआप किरीखान येथे केवळ २५ किमी. रूंद आहे. त्याच्या दक्षिणेस रूंदी वाढते व या भागास द्वीपकल्पीय थायलंड असे नाव आहे. ही पट्टी पुरातन पर्वतांनी बनली असून अधूनमधून छोटी खोरी आहेत. हवामान थायलंड मान्सून हवामान प्रदेशात समाविष्ट होतो. त्यामुळे दक्षिणेचे द्वीपकल्प सोडल्यास इतर भागांत मार्च ते मे उन्हाळा, जून–ऑक्टोबर पावसाळा व नोव्हेंबर–मार्च हिवाळा असे तीन ऋतू आढळतात. दक्षिणेस मात्र फेब्रुवारी–सप्टेंबर उन्हाळा व ऑक्टोबर–जानेवारी पावसाळा असे दोन ऋतू आढळतात. सामान्य तपमान २४°–३०° से. च्या दरम्यान व तपमान कक्षा अत्यल्प आढळते. वार्षिक पर्जन्य ८० सेंमी. पासून ४०० सेंमी. पडतो. मध्य मैदानी प्रदेश पर्जन्यछायेच्या प्रदेशात असून पूर्वेच्या खोरातच्या पठारावर अल्प पाऊस पडतो; पण उत्तरेस डोंगराळ भागात तसेच दक्षिणेच्या द्वीपकल्पाच्या भागात जोरदार पाऊस पडतो. वनस्पती व प्राणी थायलंडचा ६०% भाग जंगलव्याप्त आहे. मान्सून प्रकारचे जंगल असून जास्त पावसाच्या भागात सदाहरित जंगल, तर १०० सेंमी. पेक्षा कमी पावसाच्या भागात विरळ पानझडी जंगल आहे. प्रमुख महत्त्वाच्या झाडांत साग, यँग, शोरिया, रोझवुड, आयर्नवुड, एबनी, रतन व बांबू ही झाडे आहेत. त्यांत साग अत्यंत महत्त्वाचे असून ते पश्चिमेच्या व उत्तरेच्या डोंगराळ भागात आहे. शिवाय केळी, आंबे, अननस, लिंबू जातीची फळे, मँगोस्टीन इ. फळझाडेही विपुल आहेत. १९७३ मधील वन उत्पादन पुढीलप्रमाणे झाले : (आकडे लक्ष घमी.) सागवान १·३३; यँग ७·२०; इतर लाकूड ११·४०; जळाऊ लाकूड १४·००; रबर उत्पादन ३·८४ लक्ष मे. टन. इतर मोसमी देशांप्रमाणे वन्य प्राण्यांची विविधता या देशात आहे. हत्तींसाठी हा देश पूर्वीपासून प्रसिद्ध असून पांढरा हत्ती हा पूज्य मानला जातो. पूर्वी थाई राजा दरवर्षी पांढरा हत्ती चिनी सम्राटास भेट देत असे. ब्रह्मदेशाप्रमाणेच हत्तीचा लाकूडतोडीत उपयोग करून घेतला जातो. शिवाय वाघ, चित्ते, अस्वले, हरिण, रानडुक्कर, वानर, मगरी व सुसरी हे प्राणी जास्त आहेत. सयामी मांजरे पाळीव प्राण्यांत विख्यात आहेत. सागरी व गोड्या पाण्यांतील मासेमारीमुळे महत्त्वाचा प्रथिन पुरवठा होतो. १९७३ मध्ये १८ लक्ष मे. टन सागरी मत्स्योत्पादन झाले. स्त्रोत: मराठी विश्वकोश