जन्म व मृत्यू

जन्म-२५ सप्टेंबर १७९८ मृत्यू— २१ सप्टेंबर १८७४

फ्रेंच भूवैज्ञानिक. त्यांचा जन्म कॅनन (काल्वादॉस) येथे झाला. इकोल द माइन्स (पॅरिस) येथे १८३५ साली त्यांची भूविज्ञानाच्या प्राध्यापकपदी व १८४७ साली खाणींचे महानिरीक्षक म्हणून नेमणूक झाली. १८६१ साली ते कौन्सिल जनरल द माइन्सचे उपाध्यक्ष व लीजन ऑफ ऑनरचे उच्च अधिकारी झाले.

पर्वतरांगांच्या उत्पत्तीसंबंधीचा सिद्धांत

त्यांनी १८२९ साली पर्वतरांगांच्या उत्पत्तीसंबंधीचा आपला सिद्धांत अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस पुढे मांडून त्या विषयाचा पाया घातला. त्यांनी द्यूफ्रेन्वा यांच्या साहाय्याने फ्रान्सचा मोठ्या प्रमाणाचा भूवैज्ञानिक नकाशा तयार केला. सेवानिवृत्तीनंतरही शेवटपर्यंत त्यांनी नकाशे काढण्याच्या कामावर देखरेख केली.

रॉयल सोसायटी सभासद

ते अॅकॅडेमी ऑफ बर्लिन, अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस (फ्रान्स) व रॉयल सोसायटी (लंडन) यांचे सभासद, १८५२ पासून फ्रान्सचे सिनेटर व १८५३ पासून अॅकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कायमचे सचिव होते. ते कॅनन येथे मृत्यू पावले.

लेखक : अ.ना. ठाकूर

स्त्रोत : मराठी विश्वकोश