जन्म

१५ जून १७६५

मृत्यू

१० मार्च १८३७

ब्रिटिश प्राच्यविद्यापंडित

ब्रिटिश प्राच्यविद्यापंडित. जन्म लंडन येथे. १७८२ ते १८१४ ह्या काळात भारतात वास्तव्य व संस्कृत भाषा–साहित्याचा अभ्यास. कलकत्त्याच्या सुपीरिअर कोर्ट ऑफ अपीलचे सदस्य. तसेच तेथील फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक. कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य (१८०७–१४). पहिल्या दोन पदांवर काम करीत असतानाच ‘ऑन द वेदाज ऑर सेक्रेड रायटिंग्ज ऑफ द हिंदूज’ (१८०५) हा निबंध लिहून पहिल्यांदाच यूरोपीय विद्वानांचे लक्ष वेदांकडे वेधले. त्यानंतर भारतीय दर्शने, गणित, जैनांचे व हिंदूंचे धार्मिक आचारविधी, जैनांचा विश्वस्वरूपविचार, वैष्णव एकेश्वरवाद, बंगाली सुलतानांची नाणी इ. विषयांवर त्यांनी लेखन केले. निरुक्त व ज्योतिष ह्या वेदांगांचे ऐतिहासिक महत्त्व प्रथम त्यांनीच विवेचिले. संस्कृत-प्राकृत हस्तलिखित पोथ्यांचा त्यांनी मोठा संग्रह केला होता. तो त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीस देऊन टाकला. ‘बेंगॉल रॉयल एशियाटिक सोसायटी’चे अध्यक्ष व ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ चे संचालक म्हणून महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली. त्यांचे काही ग्रंथ असे : डायजेस्ट ऑफ हिंदू लॉ (४ खंड, १७९८– ह्याचा आरंभ सर विल्यम जोन्स ह्यांनी केला होता), संस्कृत ग्रामर (१८०५). संस्कृतचा एक शब्दकोशही त्यांनी तयार केला होता (१८०८). लंडन येथेच ते निवर्तले.

लेखक : लक्ष्मणशास्त्री जोशी

स्त्रोत : मराठी विश्वकोश