भूमध्य समुद्र एक अंतर्देशीय समुद्र. यूरोप, आफ्रिका व आशिया या खंडांनी वेष्टिलेला हा समुद्र ३०° उ. ते ४६° उ. अक्षांश व ५° ५०' प. रेखांश ते ३६° पू. रेखांश यांदरम्यान असून, इतर सागरी भागांशी फारच कमी प्रमाणात जोडला गेल्याने एक प्रमुख अंतर्देशीय समुद्र समजला जातो. मार्मारा समुद्र व काळा समुद्र यांचाही भूमध्य समुद्रामध्ये समावेश केला जात असून, याचे क्षेत्रफळ २९,६६,००० चौ. किमी. आहे. याची पूर्व-पश्चिम लांबी सु. ४,००० किमी., तर दक्षिणोत्तर रूंदी सु. १,६०० किमी आहे. हा समुद्र जिब्राल्टर सामुद्रधुनीने अटलांचिक महासगराशी, दार्दानेल्स आणि बॉस्पोरस सामुद्रधुनीने अनुक्रमे मार्माराशी व काळ्या समुद्राशी,तर मानवनिर्मित सुएझ कालव्याने तांबड्या समुद्राशी व पर्यायाने हिंदी महासागराशी जोडलेला आहे. या तिन्ही सागरी मार्गांना दळणवळण, व्यापार व लष्करी दृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ब्रिटिश, फ्रेंच, ऱशियन, इटालियन इत्यादींमध्ये या मार्गावर सत्ता प्रस्थापिण्यासाठी नेहमी स्पर्धा चाललेली असते. पूर्वेकडे अरल समुद्रापर्यंत व उत्तरेकडे डॅन्यूब नदीखोऱ्यापर्यंत पूर्वी मोठा समुद्र होता असे मानतात. खंडविप्लव, वलीकाम विभंजन, ज्वालामुखी, उत्थान इ. क्रियांमुळे त्या समुद्राचा विस्तार कमी होऊन अरल, कॅस्पियन, काळा, मार्मारा, भूमध्य या समुद्रांची निर्मिती झाली असे म्हणतात. या समुद्राचा किनारी भाग पुष्कळशा प्रामाणात सलग असा आढळत नसल्याने कमी-अधिक रूदींचे पुष्कळ सागरी भाग निर्माण झालेले असून त्यांना वेगवेगळी नावे आहेत; उदा., लिग्यूरियन समुद्र, टिरीनियन समुद्र, एड्रिअँटिक समुद्र, आयोनियन समुद्र, इजीअन समुद्र, क्रीट समुद्र, तसेच यामध्ये अनेक आखाते व उपसागर असून, त्यांपैकी आलीकांते आखात, लीऑ आखात, ट्युनिसचे आखात, सिद्राचे आखात इ.आखाते उपरोक्त समुद्रांपेक्षाही मोठी आहेत. सिसली ते बॉन भूशिर (ट्युनिशिया) यांदरम्यानच्या ‘अँडव्हेंचर बँक’ आणि इटली व सिसिलीचा ‘कॅलेब्रियन सेक्शन’ यांमुळे भूमध्य समुद्राचे पश्चिम व पूर्व अशा दोन भागांत विभाजन झालेले आहे. पश्चिम भागाचे आल्व्होरान बेसिन, अल्जीरियन बेसिन, टिरीनियन बेसिन हे तीन उपविभाग, तर पूर्व भागाचे आयोनियन बेसिन व लोव्हांतीने बेसिन हे दोन उपविभाग केले जातात. पश्चिम भागाची सरासरी खोली १,४३० मी. असून सर्वाधिक खोली या भागातच केप मॅटापॅन येथे सु. ४,३९० मी. आढळते, तर एड्रिअँटिक समुद्र हा उथळ भागम्हणून ओळखला जात असून येथे नकाशा आहे. त्याची सरासरी खोली २४२ मी. आहे. पूर्वेकडील सागरी भागापेक्षा पश्चिमेकडील भागातील पाणी थंड व गोडे असते. या भागात पृष्ठभागावरील पाण्याचे तपमान फेब्रुवारीत ११° से. व ऑगस्टमध्ये २३° से. असते, तर पूर्व भागात फेब्रुवारीत १६° से. व ऑगस्टमध्ये २६° से. असते. लीआँचे आखात हा या सागराचा भाग म्हणजे अतिथंड व दाट धुक्याचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे; तर लिबियाच्या किनारी भागात सिद्राच्या आखातात सर्वाधिक तपमान आढळते. स्त्रोत: मराठी विश्वकोश