पुणे जिल्ह्याची देशात ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून वेगळी ओळख आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत ही ओळख आणखी दृढ झाली असून माहिती तंत्रज्ञान आणि ॲटोमोबाईलचे स्टार्टअप हब म्हणूनही जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पुणे हे विकासाचे नवे स्मार्ट मॉडेल म्हणून विकसीत होत आहे.

स्मार्ट सिटी

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटीज मिशनच्या अंतर्गत देशातून पुणे शहराची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा मान पुण्याला मिळाला. या योजनेंतर्गत शहराचा विकास करण्यासाठी “पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड” (पीएससीडीसीएल) या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली. या योजनेंतर्गत सोलर सिटी, घनकचरा व्यवस्थापन, समान पाणीपुरवठा आणि स्मार्ट मिटरींग, झोपडपट्टी पुनर्विकास, स्मार्ट रस्ते, फुटपाथ, लाईट हाऊस, सेंट्रल कमांड कंट्रोल सेंटर, कॉमन मोबिलिटी कार्ड, सार्वजनिक वाहतुकीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची निर्मिती होणार आहे. यासर्व कामांना सुरुवात झाली असून या योजनेमुळे पुणे शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

पुणे मेट्रो

पुणे शहराच्या विकासाचा वेग झपाट्याने वाढविणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सन 2020 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून पुणे मेट्रोच्या दोन मार्गासाठी 11 हजार 420 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी जागतिक बँकेकडून 5 हजार 831 कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार असून राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रत्येकी 1310 कोटी रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. याबरोबर शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गावरही मेट्रो धावणार असून या कामालाही मान्यता मिळाली आहे. या कामासाठी पीएमआरडीच्या अर्थसंकल्पात 451 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक हजार मीटरवर मेट्रोचे स्वतंत्र स्टेशन असणार असून यामुळे पुण्याच्या विकासाला गती मिळणार आहे.

विकास आराखड्याला मंजुरी

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे शहर विकास आरखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे पुणे शहर आणि उपनगरांमध्ये पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. या विकास आराखड्यामुळे शहराची उभी वाढ (व्हर्टिकल ग्रोथ) होण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या नव्या आराखड्यानुसार शहराच्या मध्यवस्तीत साडेतीन ते चार एफएसआय मिळणार असून जुन्या गावठाणात भूखंडाच्या चौपट बांधकाम करणे शक्य होणार आहे. शहरातील मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांच्या ब्लू फ्लड लाईनचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा विकास आराखडा संतुलित आणि सर्वसमावेशक झाला आहे.

पालखी मार्ग आणि पालखी तळ विकास

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज हे राज्यातील वारकरी पंथाचे विशेष श्रद्धास्थान आहेत. या दोन्ही संताच्या पालख्या पुणे जिल्ह्यातून निघतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचा विकास सुरू करण्यात आला आहे. तसेच संत तुकाराम महाराजांच्या देहू ते पंढरपूर पालखी मार्गाचा विकासही सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही पालखी मार्गावरील पालखी तळांच्या विकासासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या पालखी तळाच्या भूसंपादनासाठी 11 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी बहुतांशी कामे मार्गी लागली असून उर्वरीत कामे अंतीम टप्प्यात आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखडा

जिल्ह्यातील देहू-आळंदी, भंडारा डोंगर, सदुंबरे या तीर्थक्षेत्रांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार आतापर्यंत 425.43 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील 32 कोटी रुपये खर्चाची विविध विकास कामेही अंतीम टप्प्यात आली आहेत. या विकास आराखड्यांतर्गत देहूमध्ये मल नि:सारणांतर्गत भुयारी गटार योजना व मलशुध्दीकरण केंद्र साकारण्यात येत आहे. देहू येथील वैकुंठगमन स्थान परिसर, विकासांतर्गत महाव्दार 20 खोल्यांचे भक्त निवास, 26 दुकान गाळे, अन्नछत्र, तुकाराम महाराज जीवन संग्रहालय, सभा मंडप अशा 10 कोटी 95 लाख 58 हजार रुपयांच्या कामांना सुरुवात झाली असून ती अंतिम टप्प्यात आहेत.

पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास (पीएमआरडीए)

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे शहर आणि परिसरातील वाहतुक, नियोजनबद्ध गृहबांधणी, औद्योगिक गुंतवणूक, कौशल्य विकास, नगरनियोजनाचे काम करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमआरीडीएच्या 2017-18 च्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या बैठकीत 799 कोटी 65 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली आहे. याच माध्यमातून पुणे ते लोणावळा दरम्यानच्या उपनगरीय रेल्वेसाठीचे आणखी दोन मार्ग विकसीत करण्यात येणार आहेत.

विकासाचा “जायका”

पुणे शहराच्या पुढच्या 50 वर्षांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीशी (जायका) करार करण्यात आला आहे. या माध्यमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी जपानच्या या कंपनीकडून आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. हा प्रकल्प तब्बल एक हजार कोटी रुपयांचा आहे. या माध्यमातून मुळा आणि मुठा नद्यांचे शुध्दीकरण करण्यात येणार आहे. यासाठी या कंपनीने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य दिले आहे. याच माध्यमातून जिल्ह्यातील पवना आणि इंद्रायणी नद्यांसह उजनी धरणापर्यंत जाणारे पाणी शुद्ध करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ

जिल्ह्याच्या विकासाची उड्डाणे वाढविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात नव्याने छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजूरी दिली आहे. जमीन संपादनानंतर अवघ्या तीन वर्षात विमानतळाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. विमानतळासाठी 2400 हेक्टर क्षेत्राची आवश्यकता आहे. चार किलोमीटर पर्यंतच्या दोन मोठ्या धावपट्ट्या याठिकाणी विकसीत करण्यात येणार आहेत. या विमानतळात स्थानिक शेतकरीच भागीदार असणार आहेत. या प्रकल्पाच्या बाधितांना चांगला परतावा मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह लगतच्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांनाही या विमानतळाचा उपयोग होणार आहे.

रिंग रोड

पुणे शहराच्या विकासात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी उपयुक्त ठरणारा रिंग रोड पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळकडून (एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे. याअंतर्गत 128 किलोमीटर लांबीचा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. पूर्वीच्या प्रस्तावित मार्गात बदल करण्याबरोबरच 90 मीटर रूंदीऐवजी 110 मीटर रुंदीचा हा रस्ता होणार आहे. सोलापूर, नगर, सातारा आणि मुंबई असा चारही महामार्गाना हा रिंगरोड जोडण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहराला वळसा घालणारा हा रिंग रोड इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ॲग्रो व टूरिस्ट बेस असणाऱ्या या रस्त्यामुळे औद्योगिक विकसाला चालना मिळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या रस्त्याची बांधणी करण्यात येणार आहे. हा रस्ता आठ पदरी असून हा पूर्णपणे सिग्नलमुक्त असणार आहे.

लोहगाव विमानतळ विस्तारीकरण

पुण्याचा वाढता विकास बघता आताचे असणारे लोहगाव विमानतळ हे अत्यंत अपूरे पडत आहे. त्यामुळे या विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. राज्य सरकारने केंद्राच्या संरक्षण विभागाशी योग्य समन्वय आणि चर्चा केल्यामुळे यातून तोडगा निघाला आहे. याच माध्यमातून संरक्षण दलाची 15 एकर जमीन विमानतळ विस्तारीकरणासाठी देण्यात आली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाबरोबरच या विमानतळाकडे येणाऱ्या रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरु आहे.

तीर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखडा

जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा संगमावर श्रीलक्ष्मी-नृसिंह तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानच्या विकासासाठी 260 कोटी 86 लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या तीर्थक्षेत्राचा सुरु झालेला विकास सन 2018 पर्यंत तीन टप्प्यात होणार आहे. पुरातत्व, जलसंपदा, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विद्युत मंडळ आणि महसूल विभागांच्या संयुक्त माध्यमातून हा विकास होणार आहे.

लेखक -संग्राम इंगळे,

माहिती सहायक, विभागीय माहिती कार्यालय, पुणे.

माहिती स्रोत : महान्यूज