महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. अकोला नरनाळा किल्ला सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये प्रचंड विस्ताराचा नरनाळा किल्ला आहे. संपूर्ण किल्ला परिसर नैसर्गिक कड्यांचा भाग वगळता मजबूत दगडबांधणीने बंदिस्त आहे. या किल्ल्याला असंख्य बुरूज असून 22 दरवाजे आहेत. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी 4 मुख्य दरवाजे असून त्याची नावे दिल्ली दरवाजा, अकोट दरवाजा, शिरपूर दरवाजा व शहानूर दरवाजा अशी आहे. नरनाळा किल्ला परिसरात 13.35 चौ.कि.मी. अभयारण्य आहे. कसे पोहोचाल?रेल्वेने अकोला येथे जाता येते. अकोल्यापासून एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत. अकोटपासून किल्ला उत्तरेकडे 35 कि.मी. लांब असून किल्ल्याकडे जाणारा रस्ता पोपटखेड मार्गे शहानूर या गावावरून जातो. बुलढाणा लोणार सरोवर 30 ते 50 हजार वर्षापूर्वी झालेल्या अश्निपातामुळे सुमारे पाऊणे दोन किलोमीटर व्यासाचे आणि 10 ते 11 कि. मी. परिघाचे एक प्रचंड विवर तयार झाले ते म्हणजे लोणार सरोवर. खाऱ्या पाण्याच्या या विस्तीर्ण व नैसर्गिक सरोवराने बुलडाणा जिल्ह्यास आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली आहे. लोणारचा उल्काघाती खळगा हा जगातील ज्ञात विवरामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असून बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले जगातील एकमेव विवर आहे. कसे पोहोचाल?जालना रेल्वे स्टेशनपासून 60 किलोमीटरवर हे सरोवर आहे. तसेच राज्याच्या विविध भागांतून एस.टी. महामंडळाची थेट बससेवा येथे पोहोचण्यासाठी उपलब्ध आहे. शेगाव श्रीसंत गजानन महाराज यांचे मंदीर असलेल्या या गावाला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते. संत गजानन महाराज प्रगटदिन आणि रामनवमीला येथे मोठी यात्रा भरते. श्रीसंत गजानन महाराज संस्थानद्वारा उभारण्यात आलेल्या 300 एकर क्षेत्रातील आनंदसागर प्रकल्प (आध्यात्मिक केंद्र व मनोहरी उद्यान) भाविकांचे आणि पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. कसे पोहोचाल?शेगांव मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. राज्याच्या विविध भागांतून एस.टी. महामंडळाची थेट बससेवा येथे पोहोचण्यासाठी उपलब्ध आहे. गडचिरोली सोमनूर गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे अंतिम टोक असणाऱ्या इंद्रावती आणि गोदावरी नदीच्या संगमावरचे हे ठिकाण म्हणजे सोमनूर. ते निसर्गाच्या भव्यतेचे दर्शन घडवते. ज्वालामुखीजन्य खडकाचे विविधरंगी नमुने आणि खनिजांनी भरलेल्या दगडात चमकणारे रंग येथे पाहावयास मिळतात. नदीच्या प्रवाहाने कोरलेले कातळ आणि केवळ नदीच्या प्रवाहाचा आवाज यांच्या जोडीला नदीच्या किनाऱ्यालगत डोलणारी मिरच्यांची शेती आपला आनंद द्विगुणित करते.कसे पोहोचाल?सोमनूरला चंद्रपूर किंवा गडचिरोली मार्गे येता येते. सिरोंचापासून 60 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून एस.टी. बसेस उपलब्ध आहेत. आनंदवन जागतिक स्तरावर ज्याची दखल घेतली गेली आहे असे वरोरा येथील आनंदवन. थोर समाजसेवक डॉ.बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवनाची स्थापन केली. येथे कुष्ठरोगमुक्त झालेल्या रुग्णांकडून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती आणि विक्री केली जाते. कुष्ठरोगी तसेच अंध, अपंग व मूकबधीर यांच्यासाठी येथे वेगळे विश्व निर्माण करण्यात आले आहे.कसे पोहोचाल?नागपूरपासून हे ठिकाण 125 कि.मी.अंतरावर आणि चंद्रपूरपासून 55 कि.मी.वर आहे. एस.टी.बस आणि रेल्वेने जाता येते. स्त्रोत - महान्युज