बालाघाटच्या गर्द डोंगररांगा यांनी समृद्ध 'पठाराचा जिल्हा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्यांचे खळाळते पाणी लाभलेल्या यवतमाळ जिल्हाकडे ! ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे यवतमाळ असे नामकरण करण्यात आले. हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते तर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९६५ मि.मी आहे. जिल्ह्याचा सुमारे २१ % भाग (२८५० चौ.कि.मी.) हा वनक्षेत्रात मोडतो. जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषा बोलल्या जातात. आर्णी आर्णी हे गाव अरूणावतीच्या काठी वसलेले छोटे गाव होते कालांतराने गावाचा कायापालट झाला. नदी काठी सूफी संत बाबा कंबलपोषचा एक दर्गा आहे आणि दर्ग्याला लागून महादेवाचे मंदिर आहे. मंदिरातील आरती दर्ग्यात तर दर्ग्यातील प्रार्थना मंदिरात ऐकू यावी हा रोजचा सहज असा सहिष्णु नित्यक्रम ! गावातही हिंदू मुस्लिम बांधव गुन्या-गोविंदाने नांदतात. सूफी संत बाबा कंबलपोषच्या नावाने दरवर्षी फेब्रुवारीत एका यात्रेचे आयोजन केले जाते. साधारण ही यात्रा ५ फेब्रुवारीला सुरू होऊन १० फेब्रुवारी पर्यंत संपते. ही यात्रा यवतमाळ जिल्ह्यात फार मोठी यात्रा समजली जाते. यायात्रे साठी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अगदी सर्व धर्मीय मोठ्या संख्येने गर्दी करतात. पुसद पूस नदी ही पैनगंगा या नदीची उपनदी आहे. ही नदी वाशीम जिल्ह्यात उगम पावते. पूसवरून पुसद हे गावाचे नाव पडले असावे. ही नदी माहूर जवळ हिवरा संगम येथे पैनगंगेला जाऊन मिळते. लोकमान्य टिळकांनी पुसदला स्वराज्याची पंढरी म्हणून संबोधले होते तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील पहिला जंगल सत्याग्रह पुसद येथेच झाला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे पुसदचेच होते. पुसद येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पुसद शहर हे डोंगराळ भागात वसलेले आहे. चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले पुसदचे निसर्ग सौंदर्य अनुभवावे ते अगदी भर पावसाळ्यात. पुसदच्या निसर्गरम्य परिसरातील भगवान श्रीकृष्ण मंदिर कार्ला, जगदंबा माता मंदिर, नृसिंह मंदिर, पुस नदिकाठी वसलेले खांदी हे महानुभाव पंथियांचे मंदिर, दुधगिरी महाराज मंदिर या सौंदर्यास सहिष्णु बनवितात.पुसद येथे येण्यासाठी किंवा येथून जाण्यासाठी घाट ओलांडावाच लागत असल्याने रिमझीम पावसात हिरव्या गर्द घाटातून आणि वळणा वळणाच्या वाटेतून पुसदची भ्रमंती रमणीय होत जाते ! सहस्त्रकुण्ड धबधबा उमरखेड उमरखेड शहर यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख बाजारपेठ आणि व्यापारी केंद्र आहे. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा या प्राचीन नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा हे यवतमाळ मधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे शहर नागपूर-तुळजापुर राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे. विदर्भाच्या दक्षिण दिशेतील हे शेवटचे महत्त्वाचे ठिकाण आहे. चिंतामणी-कळंब कळंब हे गाव नागपूर-बुटीबोरी-तुळजापूर या प्रमुख राज्य महामार्ग क्र. ३ वर नागपूरपासून १२३ कि.मी. तर वर्ध्याहून ४६ कि.मी. अंतरावर आहे. येथे श्री चिंतामणीचे प्राचीन मंदिर आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या कळंबच्या या मंदिरात जाण्यास पायऱ्या उतरून खाली जावे लागते. चिंतामणीच्या प्रसन्न प्रतिमेने मनाचा थकवा नाहिसा होतो ! हे मंदिर चक्रावती नदीच्या किनाऱ्यावर आहे. दर बारा वर्षांनी येथे गंगा अवतरते त्यावेळी येथे मोठा उत्सव असतो. मल्लिकार्जुन मंदिर दिग्रसमधुन वाहणाऱ्या धावंडा नदिकाठी वसलेले प्रसिद्ध शिवमंदिर मल्लिकार्जुन महादेव संस्थान म्हणून ओळखले जाते. दिग्रस शहरातील हे एक पवित्र धार्मिक स्थळ असुन डिसेंबर महिन्यात ब्रम्हानंद स्वामींच्या जयंतीस उत्सवास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हा उत्सव सात दिवस असतो ज्याची सांगता पालखीने होते. ऐतिहासिक चरीत्र हरिहर आणि बुक्क यांच्या प्रतिकृती या मंदिराच्या द्वारावर कोरलेल्या आहेत. घंटिबाबा देवस्थान दिग्रस तालुक्यातील घंटिबाबा हे एक ग्रामदैवत असुन दरवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर येथे दहा दिवसाची यात्रा भरते. घंटिबाबा मंदिरासमोर दिवाळीच्या काळात जवळपास पंधरा दिवसाची जत्रा भरते. ग्राम आणि परिसरातील ग्रामस्थ या जत्रेच्या आंनदाची अगदी जल्लोषमय अनुभूती घेतात. जैन अतिशय क्षेत्र एक अद्भुत निरामय अनुभूती देणारे जैन अतिशय क्षेत्र श्री १००८ बाबजी महाराज दिगंबर जैन मंदिर भाविकांना मनःशांती देऊन जाते. येथे भाविकांकरीता निवासाची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. वणी तहसील मुख्यालय असलेले वणी हे शहर निर्गुडा नदीच्या तीरावर वसलेले आहे. श्री रंगनाथ स्वामींचे प्रसिद्ध असे मंदिर येथे आहे. हजारो भाविक फाल्गुन ते चैत्र शुद्ध १५ या दरम्यान मंदिरात दर्शनाला येतात. वणी हे शहर जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्रापैकी एक आहे. येथे गुरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. शहराच्या आजूबाजूला दगडी कोळशांच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे हे शहर रस्ते व लोहमार्गानी इतर शहरांशी व्यवस्थितरीत्या जोडले गेले आहे. जिल्ह्यातील धरणसंपदा यवतमाळ जिल्हातील धरणं पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. येळाबारा धरण, बोरगांव धरण, बेंबळा धरण, अरूणावती धरण व पुस धरण ही येथील प्रमुख धरणं आहेत. यापैकी बेंबळा धरण हे सर्वात मोठे धरण आहे. जिल्ह्यातील व्यवसाय जिल्ह्यात हातविणकाम (हँडलूम), विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची पिके-कापूस, ज्वारी, भुईमूग, तूर-डाळ. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, हिरडा व मोह या उपयोगी वस्तू मिळतात. यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर ही महत्त्वाची व्यापार केंद्रे आहेत. संकलन - तृप्ती अशोक काळे स्त्रोत - महान्युज