प्रस्तावना निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक कलाविष्कारांकडे पाहून प्रत्येक वेळी नव्याने नतमस्तक व्हावेसे वाटते. त्यापैकीच एक म्हणजे अनेकविध रंगांचे, आकारांचे, आवाजांचे हजारो पक्षी. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान नांदूरमधमेश्वरमध्ये विविध रंगाचे, मंजूळ आवाजाचे दुर्मीळपक्षी अनेक देशांमधून दाखल होतात. आणि कडाक्याच्या थंडीत शेकडो पक्षीप्रेमी त्यांचे कॅमेरे दुर्बीणी घेऊन नांदूरमधमेश्वराच्या दिशेने पक्षीनिरिक्षणासाठी निघतात. निसर्गावर नितांत प्रेम करणारे हे पक्षीप्रेमी आणि त्यांचं पक्षीतीर्थ म्हणता येईल असं नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य. या अभयारण्याचा परिसर फ्लेमिंगो, डक, स्पूनबिल, कॉमन क्रेन यासारख्या विविधरंगी विदेशी पक्ष्यांच्या वास्तव्याने गजबजून जातो. नांदूरमधमेश्वर अभयारण्य दाट धुक्याची शाल लपेटलेल्या जलाशयातील मासे अचूक टिपून मेजवानी करताना या पक्ष्यांना पाहणं, मंजूळ आवाजात एकमेकांना साद घालण्याचा त्यांचा आवाज ऐकणं हा अनुभव अतिशय विलक्षण असतो. हिमालय, काश्मीर सोबतच युरोप खंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, पाकिस्तान या भागांतून हजारो किलोमीटर अंतर कापून हे पाहुणे येथे दाखल होतात. वनखाते व पक्षीनिरिक्षकांनी ग्रासलँड व वेटलॅड मिळून आतापर्यंत 240 ते 250 वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. ब्रिटीशांनी एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच कडवा व गोदावरी नदीच्या संगमावर नांदूरमधमेश्वराला एक उत्कृष्ट धरण बांधले, शंभर वर्षापासून अनेकांची तृष्णा भागवणाऱ्या या जलाशयांना हजारो स्थलांतरीत पक्ष्यांची क्षुधा ही भागवत आहेत. काही पक्षी : पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, इंडियन सिलव्हर बिल, ग्रीन बिटर, लॅपविंग, ओरियन्टल, हनी बझार्ड, इंडियन रोलर, किंग फिशर, पाईड किंगफिशर, मार्शहेरियर, स्पूनबिल, कुट, कॉमनटिल, पिग्मीगुस, ग्रेटर फ्लेमिंगो, कॉमनक्रेन, व्हाईट नेक्ड स्टॉर्क, ओपन बिल स्टॉर्क, स्पॉड बिल डक, ब्राह्मणी डक व्हाईट आय बीज, कोम डक, जिकाना, लेसर, व्हिललिंग डक, मलार्ड पोचार्ड, गढवाल, नॉर्दन शाऊलर, मिनटेल, रेड क्रिस्टेड पोचार्ड, रिव्हर टर्न. नांदूरमधमेश्वरवरील धरण चक्रवाक, तरंग, वैष्णव, हळदीकुंकू, चांदवा, नयनसरी, तलवार, पांढरा शरारी, मोरशरारी मुग्धबालक, चमण्या, नदी सूर्य, पर्लल मुरेन, जांभळी पानकोंबडी, जांभळा बलक, लाल डोक्याची टिटवी खंड्या असे हजारो पक्षी येथे वास्तव्यासाठी येतात. नांदूरमधममेश्वर धरण स्थळावर 20 वर्षानंतर प्रथमच कैकर व रेडमुनिया पक्षी आढळल्याने पर्यटकांचा आनंद वाढला आहे. पक्षी निरीक्षकांना या रंगीबेरंगी, मनमोहक पक्ष्यांचे मनसोक्त निरिक्षण करता यावे व त्यांच्या छबी टिपता याव्या, यासाठी वनविभागाने पाच मनोऱ्यांच्या परिसरात नेचरट्रॅकची निर्मिती केली आहे. या परिसरात पक्ष्यांना बसण्यासाठी कृत्रिम लाकडी वृक्षांची दगडी बेटी उंचवटे निर्माण केले आहे. त्यामुळे पक्षी निरिक्षकांच्या दृष्टीक्षेपात पक्षी येतात व त्यांच्या मोहक हालचाली भान हरपून टाकतात. नांदूरमधमेश्वर हे ठिकाण नाशिक निफाड रस्त्यावर आहे. येथे जाण्यासाठी बसची सुविधा नाही तरी पक्षी प्रेमी थोडा त्रास सहन करूनही हा संस्मरणीय अनुभव घेताना दिसतात. लेखक - सौ. मीनल कुलकर्णी ७, सुविधा संकुल, एएसजी-२१ अश्विननगर, नवीन नाशिक स्त्रोत - महान्युज