महाराष्ट्र देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य असून हा प्रदेश 17 टक्के वनांनी नटलेला आहे. आपल्या राज्यात तब्बल 57 अभयारण्ये आणि ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव-नागझिरा, बोर असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. येथे सदाहरित, निम सदाहरीत, उष्ण कटिबंधीय पानगळीची, शुष्क पानगळीची, खारफुटीची अशी अनेक प्रकारची वने आहेत. विदर्भात प्रचंड डरकाळी फोडणारे देखणे रुबाबदार वाघ, मराठवाड्यात लांब ढांगा टाकत उड्या मारणारे चिंकारा, काळवीट, धिप्पाड माळढोक पक्षी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर विविध प्रकारचे सरीसृप, औषधी वनस्पती, अनोखे सागरी जीव सापडतात. ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणापासून 8 किमि अंतरावर 205 चौ.किमीच्या या अभयारण्यात दोन तलाव आहेत. याच्या जवळून ज्ञानगंगा नदी वाहते. हे अभयारण्य बघण्याचा हंगाम फेब्रुवारी ते मे आहे. इथे 150 प्रजातीचे पक्षी आहेत. जायचे कसे? हवाई मार्ग - ओरंगाबाद विमानतळ किवा चीखलठाणा विमानतळ, रेल्वे - खामगाव रेल्वे स्टेशन 20 किमी, रस्ता - बुलढाणा बस स्थानक 8 किमी खामगाव 20 किमी. नान्नज माळढोक अभयारण्य भारतीय उपखंडातील अतिदुर्मीळ माळढोक (ग्रेट इंडियन बस्टार्ड) या पक्ष्यासाठी हे खास अभयारण्य आहे. हे पक्षी गुजरात, महाराष्ट्रातील नान्नज आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात आढळतात. 1979 माळढोक संरक्षणासाठी हे अभयारण्य घोषित करण्यात आले. उत्तर सोलापूर, माढा, मोहोले, कर्माळा हे सोलापूर जिल्ह्याचे तालुके आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंडा, नेवासा या तालुक्यातील तब्बल 8496.44 चौ.किमी क्षेत्रफळाचे हे अभयारण्य आहे. या अभयारण्याचे मुख्यालय सोलापूर जिल्ह्यातील नान्नज आणी अहमदनगर जिल्ह्यातील रेहेकुरी येथे आहे. जायचे कसे? हवाई मार्ग - जवळचे विमानतळ पुणे, रेल्वे मार्ग - सोलापूर 25 किमी., रस्ता- सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गापासून 10 किमी. जायकवाडी पक्षी अभयारण्य औरंगाबाद आणी अहमदनगर जिल्ह्यात हे अभयारण्य वसले आहे. याला पक्षी मित्रांचा स्वर्ग म्हटले तरी वावगे ठरणार नाही. इथे 200 प्रजातीचे पक्षी असून यात 70 स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. 37 प्रजातीचे वृक्ष, वनस्पती आहेत. काळवीट लांडगे, कोल्हे, रानससा असे प्राणी आहेत. जायचे कसे? हवाई मार्ग - औरंगाबाद 50 किमी, रस्ता - औरंगाबाद 50 किमी, अहमदनगर 75 किमी. भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात 130.78 चौ.किमी क्षेत्रफळाचे हे अभयारण्य 1985 मध्ये जाहीर करण्यात आले. पश्चिम घाटाच्या माथ्यावर दुर्मिळ प्राणी पक्षी सांभाळून असणारे हे अभयारण्य पर्यटकांचे आवडते आहे. राज्य प्राणी शेकरूचे हे माहेरघर मानले जाते. पश्चिम घाटाच्या उत्तर भागातील अस्पर्श जंगल मन मोहून घेते. कृष्णेच्या भीमा आणि घोड या उपनद्यांचा उगम येथून होतो. जायचे कसे ? हवाई मार्ग - पुणे 102 किमी. रेल्वे- पुणे 130 किमी. रस्ता - मंचर 62 किमी. (पुणे-नाशिक महामार्ग). हंगाम नोहेंबर ते मार्च उत्तम आहे. लेखक - मिलिंद उमरे स्त्रोत - महान्युज