परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहराजवळ वसलेल्या नेमगिरी नावाचं जैन धर्मीय तीर्थक्षेत्र पर्यटकांमध्येही फार लोकप्रिय आहे. राज्यातीलच नाहीतर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून पर्यटक तर येतातच शिवाय परदेशातल्या पर्यटकांची देखील नेहमीच रेलचेल असते. पंचक्रोशीतल्या शाळांच्या सहली तर इथं नित्यनेमानं येतच असतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या पर्यटनस्थळाला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी. नेमगिरीचे वैशिष्ट्य या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णत: जमिनीमध्ये दबलेले होते. सुमारे ९००० किलो वजनाची श्री १००८ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे जी जमिनीपासून ४ इंच वर केवळ एका सुपारीएवढ्या दगडावर विराजमान आहे, हे देखील इथलं आश्चर्यच आहे. इतिहास सैदुल कादरी हा अफगाणिस्तानातून दिल्लीला आला. तो दिल्लीहून अजमेरला ख्वाजा साहबच्या दरबारात पोहचला. दरबारात त्याला असा आदेश देण्यात आला की, जैनपूर (जिंतूर) ला जाऊन तिथं असणाऱ्या मजबूत किल्ल्यामधल्या जैन धर्मियांची संस्कृती नष्ट करुन त्यांच्या मंदिराची नासधूस करून आपला झेंडा फडकावयाचा. आदेशानुसार कादरी अजमेरहून खुलताबाद, दौलताबादमार्गे जैनपूरला आला. तेव्हा जैनपूरमध्ये यमराज आणि नेमीराज नावाचे भाऊ राज्य करत असत. कादरीने गुलबर्ग्याच्या राजा आलमगीरच्या फौजेच्या सहाय्याने हा प्रदेश कब्ज्यात घेतला आणि मंदिर आणि मुर्त्यांचे तोडफोड केली. ही घटना हिजरी सन ६३१ ची आहे. नंतर १६ व्या शतकामध्ये नांदगांव येथून श्री. वीर संघवी त्यांची पत्नी “घालावी”, मुले नेमा संघवी, सांतु संघवी, अंतु संघवी आणि ३ सुनांसह जिंतूर येथे आले. त्यावेळी नेमगिरी पूर्णपणे झाडा-झुडपांनी वेढलेली होती पण मंदिराचे शिखर दिसत होते. तेव्हा त्यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार करायचा संकल्प केला. त्यांनी १६१० साली नेमगिरी आणि चंद्रगिरी या दोन्ही मंदिरांचा जीर्णोध्दार केला. याची आठवण म्हणूनच गुफा क्रमांक ४ मध्ये असलेल्या मूलनायक श्री नेमीनाथजी यांच्या प्रतिमेच्या खाली या कुटूंबियांचे शिल्प रेखाटलेले आहे. मंदिराचे वैशिष्ट्य गेली २० वर्षे विश्वस्त मंडळामध्ये उपाध्यक्ष असलेले श्री. बबनराव तात्याराव बेंडसुरे यांनी मंदिरातील ७ गुफांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, हे मंदिर पुर्वी पूर्णपणे डोंगराखाली दबलेले होते. या मंदिरातील ७ गुफांविषयी माहिती देताना ते म्हणाले की, गुफा नं.१- पहिल्या गुफामध्ये महावीर स्वामींची साडे तीन फुट उंचीची अत्यंत प्राचीन मुर्ती आहे. या गुफेमध्ये आचार्य भद्रबाहू, आचार्य शांतिसागरजी यांचे पद कमळ हे या गुफेचे वैशिष्ट्य आहे. गुफा नं .२- दुसऱ्या गुफामध्ये श्री १००८ आदिनाथ स्वामींची महान प्रतिमा आहे. ध्यान करण्यात मग्न असणारी ही प्रतिमा पाहताक्षणी मनाला मोहिणी घालते. गुफा नं.३- तिसऱ्या गुफामध्ये दर्शन होते ते सकलविघ्नोपशाकमक, परमशांतिदायक, देवाधिदेव श्री. १००८ शांतिनाथ स्वामी यांच्या पद्मासनामध्ये विराजमान मुर्तीचे. सहा फुट उंच या मुर्तीचे दर्शन घेताच भक्तांना दु:खाचा पूर्णपणे विसर पडतो आणि तो ध्यानात मग्न होतो. गुफा नं.४- चौथ्या गुफामध्ये मूलनायक श्री १००८ नेमीनाथ स्वामींची भव्य मूर्ती विराजमान आहे. पाहताक्षणी मन मोहून टकाणारी काळ्या पाषाणातली मूर्ती विराजमान आहे.गुफा नं.५- पाचव्या गुफामध्ये सर्वांचंच आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी श्री १००८ अंतरिक्ष पार्श्वनाथ स्वामींची पद्मासनातली मूर्ती आहे. सुमारे ९००० किलो वजनाची श्री. १००८ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे जी जमिनीपासून ४ इंच वर केवळ एका सुपारीएवढ्या दगडावर विराजमान आहे, हे देखील इथलं आश्चर्य आहे. या मूर्तिच्या मागे सर्प आहे,त्या सर्पात ओम तयार होते. या मुर्तीचं दर्शन घेताच भक्तांचे दु:ख कमी होतात. गुफा नं.६- सहाव्या गुफामध्ये साडेचार फुट उंचीची आणि एखाद्या स्तंभासारखी दिसणारी नंदिश्वराची मूर्ती आहे. गुफा नं.७- सातव्या गुफामध्ये भगवान बाहुबलींची विशाल मूर्ती आहे. तपश्चर्येत मग्न अशी ही मूर्ती आहे. मानेपर्यंत आलेली वेल, खांद्यावर नागांचे वास्तव्य आणि मांडीमध्ये भुंग्याने केलेले छीद्र यावरून या मूर्तीची तपश्चर्येतील मग्नता दिसून येते. नेमगिरीपासून थोड्या अंतरावर चंद्रगिरी नावाचे धार्मिक स्थळ आहे. या चंद्रगिरीचे दर्शन केल्याशिवाय नेमगिरीची यात्रा पूर्ण होत नसल्याची अख्यायिका आहे. चंद्रगिरीकडे जाताना रस्त्यातच युगल चारणऋध्दीधारी मुनिंची पादुका आहेत. नेमगिरी तीर्थक्षेत्रांचे अन्य उपक्रम गोशाळा आचार्य विद्यासागरजी यांचे शिष्य जैनमुनीश्री समाधीसागरजी यांनी गोशाळा असावी अशी सूचना केली आणि सन २००० पासून इथं गोशाळा चालविण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी १५० गायी आहेत. सोयी-सुविधा इथं राहण्यासाठी भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रसादालयाची आणि भोजनाची देखील उत्तम व्यवस्था आहे. पोहचण्यासाठी जवळचे रेल्वेस्टेशन- परभणी अंतर- ४५ कि.मी.जवळचे बस स्थानक - जिंतूर अंतर - ४ किमीजवळचे विमानतळ - औरंगाबाद अंतर - १६५ कि.मी. संपर्क- श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी संस्थान,जिंतूर- ४३१ ५०९, जि. परभणीफोन- ०२४५७- २१९२०८Email- nemgiri@gmail.comwebsite- www.nemgiri.org लेखक - जयश्री श्रीवास्तव स्त्रोत - महान्युज