दरवर्षी आम्ही नोव्हेंबर महिन्यात गड किल्ल्यांना भेटी देतो. गतसाली शाहुवाडी तालुक्यातील कोकणच्या सीमेवर दिमाखात उभा असलेला विशाळगड पाहण्याचे ठरविले. सातजणांच्या आमच्या टीमसह आम्ही विशाळगडच्या दिशेने प्रयाण केले. जंगलातून वेडीवाकडी वळणे घेत जाणारा रस्ता अनुभव समृद्ध करत होता. आजुबाजुंना वसलेल्या छोट्या वाड्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवून आणतात. गाडीरस्त्याने जाताना वन्यजीव दिसण्याची शक्यता अधिक असते. वाटेत पांढऱ्या छातीचा खंड्या, पांढऱ्या भुवईचा धोबी, लांब शेपटीची भिंगरी (वायर टेल स्वालो), वेडा राघू व पाकोळी यासारखे पक्षी हमखास दिसतात. कधीकधी रान गव्यांचे दर्शन घडण्याची शक्यता असते. पान कावळे पण दिसत राहतात. अगदी पावसाळ्यामध्येसुद्धा तसेच इतरवेळीही या गड परिसराला धुक्याची झालर पसरलेली असते. अगदी दुपारीही या भागात धुके पहायला मिळते. गड अत्यंत उंचावर वसलेला असल्याने या गडावरून संगमेश्वर, लांजा व रत्नागिरीचा काही भाग उन्हाळ्यात पाहायला मिळतो व याचा पर्यटकही लाभ उठवतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला स्वराज्याचा अखंड ठेवा आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीला शिवकालीन इतिहासामधे महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामध्ये विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे. स्वराज्यातील या किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासारखे आहे. किल्ल्याविषयी थोडसं विशाळगडाची उभारणी इ.स. 1058 मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. विशाळगडाच्या दऱ्याखोऱ्याचे निबीड अरण्याचे सुरेख वर्णन फेरीस्ता या इतिहासकाराने केलेले आहे. तो म्हणतो या घाटामधील वाटा अतिशय वाकड्या-तिकड्या आहेत. याची तुलना कुरळ्या केसांशी केली तरी यांची बरोबरी होणार नाही. या पर्वतांचे देखावेही अतिशय भयंकर असून याच्या कड्यावर आणि गुहांजवळ आल्यावर प्रत्यक्षात भुते आणि राक्षस देखील दचकतील. या रानात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही. इथे वाढलेले गवत म्हणजे सर्पाच्या सुळ्याप्रमाणे चिवट, तिक्ष्ण ! हवा दुर्गंधमय. इथल्या पाण्यामधे मूर्तिमंत मृत्यूचेच वास्तव्य. वाऱ्याची प्रत्येक झुळूक विषाने माखलेली अशा या वाकड्यातिकड्या वाटांनी चालून मुस्लीम सैन्य अगदी भिऊन आणि थकून गेले ! इतके अद्भूत वर्णन या किल्ल्याच्या इतिहासात आढळते. छ. शिवाजी महाराजांनी इ.स. 1659 मध्ये हा किल्ला जिंकला व याचे नामकरण विशाळगड असे केले. विशाळगड हा मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे महाराजांची आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका ! आणि यासाठी अवघे 300 मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा ! पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छ. संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला होता. सह्याद्रीच्या रांगेशी लहानशा खिंडीने जोडलेला विशाळगड समुद्र सपाटीपासून १०२१ मीटर उंचीचा आहे. या खिंडीपर्यंत गाडीरस्ता असल्यामुळे अर्ध्यातासात विशाळगडावर पोहोचता येते. विस्तृतमाथा असलेला विशाळगड सह्याद्रीच्या पाताळवेरी दर्यांनी वेढलेला असल्यामुळे बेलाग झालेला आहे. काय पहाल गडावर मुंढा दरवाजा, रणमंडळ मलीक रैहानचा दर्गा, अमृतेश्वर मंदिर, दगडी कुंड, पंतप्रतिनिधीचा वाडा अशा अनेक वास्तू गडावर पहायला मिळतात. या शिवाय छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक आणि इतिहासामधे आपल्या पराक्रमाने अजरामर झालेले वीर बाजीप्रभु आणि फुलाजी प्रभु यांच्या समाध्या नमन करण्यायोग्य आहेत. विशाळगड आणि त्याचा परिसर मुक्तपणे पहाण्यासाठी पूर्ण दिवसाचा वेळ हाताशी असायला हवा. येथे जेवणाची तसेच रहाण्याचीही व्यवस्था होऊ शकते. तसेच आंबा या गावाजवळील परिसरात अनेक खाजगी निवासस्थाने उपलब्ध आहेत. कसे जाल... कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथुन गजापूर मार्गे थेट विशाळगड्याच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येते अथवा आंबा येथून विशाळगडावर जाण्यासाठी वेगळा घाट रस्ता आहे. कोल्हापूरमधून या मार्गे कर्नाटक परीवहन मंडळाच्या दिवसातून चार बसेस विशाळगडापर्यंत जातात. दिवसातून काही वेळेस मलकापुरातून गजापूरमार्गे देखील एस.टी. महामंडळाच्या काही बसेस विशाळगडावर जातात. आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावाकडून तीन तासाच्या चढाईने माचाळच्या गुहेकडून आपण विशाळगडावर पोहोचू शकतो.एस.टी.च्या थांब्यापासून अर्ध्या तासात आपण विशाळगडावर पोहोचतो. रेल्वे मार्ग मुंबई – कोल्हापूर, पुणे – कोल्हापूर, कोकण रेल्वेने रत्नागिरी तिथून राज्यमार्गे आंबा गावी जाता येते. महामार्ग मुंबई – कोल्हापूर – मलकापूर – विशाळगड, पुणे – कोल्हापूर - मलकापूर - विशाळगडमुंबई – पुणे – सातारा – कराड – शेडगेवाडी - मलकापूर – विशाळगड. अत्यावश्यक सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र आंबा (संपर्क -०२३२९२६४९१५), सरकारी ग्रामीण इस्पितळ मलकापूर (संपर्क- ०२३२९२२४१००), रुग्णवाहिका वाहक (संपर्क – ८९७५९४७६३३), अत्यावश्यक रुग्णवाहिका टोल फ्री संपर्क – डायल १०८ लेखक - सचिन पाटील स्त्रोत - महान्युज