वेशीवरच्या पाऊलखुणा : पारेगाव

कृषीतज्ज्ञांचे अज्ञात पारेगाव

कृषी इतकेच ऋषींचे प्राचीनत्व आपल्या देशाला लाभले आहे, असे म्हटले जाते. भारतीय इतिहासाच्या अज्ञात काळाचे शिल्पकार म्हणूनही आपण याच ऋषीमुनींचा उल्लेख करतो. मात्र गंगेचे मूळ आणि ऋषींचे कुळ सापडत नसले तरी ऋषीमुनींची तपोभूमी आणि कर्मभूमी आपल्याला त्यांच्या कार्याची झलक दाखविते. मात्र पारेगावातील कृषितज्ज्ञ व महर्षी म्हणून ओळखले जाणारे ऋषी पराशरांबाबत हे पहायला मिळत नाही. पराशरांच्या कृषी क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीचा उपयोग पारेगावाने करून घेतलेला दिसत नाही, ना त्यांच्या ग्रंथसंपदेचा ठेवा पारेगावाने जपला आहे. त्यामुळे पराशरांच्या नावाने हे गाव ओळखले जात असले तरी कृषितज्ज्ञ म्हणून पराशर अजूनही पारेगावला अज्ञातच असल्याचे दिसते.

नाशिक-सापुतारा रस्त्यावर वणीगावात न जाता वणी पोलिस स्टेशन रोडने पुढे तीन-चार किलोमीटर गेलात की, संगमनेर फाटा लागेल. या रस्त्याने १० किलोमीटरवर चांदवड तालुक्याच्या सीमेवर हजार लोकसंख्येचे पारेगाव वसले आहे. कृषिमहर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पराशर ऋषींनी याच गावात बारा वर्ष तपश्र्चर्या केली व येथेच संजीवनी समाधी घेतल्याची दंतकथा आहे. त्यामुळेच या गावाला पराशर यांच्या नावावरून पारेगाव असे नाव पडले, असे म्हटले जाते. पराशर ऋषींनी बारा वर्षे करंजीच्या वृक्षाखाली कठोर तपश्चर्या करून सप्तशृंगीमाता, गणपती व विष्णू यांना प्रसन्न केल्याचे सांगितले जाते. तपश्चर्येच्या ठिकाणापासून सप्तशृंगीमातेचे मंदिर स्पष्ट दिसते म्हणजेच जगदंबेच्या नजरेसमोरच पराशरांची ही तपश्चर्या सुरू होती. पराशर ऋषींनी ज्या करंजीच्या झाडाखाली तपश्चर्या केली, त्या झाडाच्या खोडावर शिवरात्रीच्या दिवशी रामनाम शब्द उमटत असत, अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळेस हा वृक्ष पूर्णत: कुजल्याने तो तोडून त्याची आठवण म्हणून दुसरे झाड लावण्यात आले.

पराशरांविषयी पुराणांमध्ये एक कथा प्रचलित आहे. प्राचीनकाळी रूधिर व इतर राक्षसांनी मिळून वसिष्ठांच्या शंभर पुत्रांचा नाश केला. वसिष्ठ व अरूंधती चिंताग्रस्त झाले. आपले सर्व कुळ नष्ट झाल्याने त्यांनी देहत्यागाचा निर्णय घेतला, मात्र वसिष्ठांचा पुत्र शक्तिमुनीची पत्नी अदृशंती गर्भवती असल्याची बातमी मिळाली. तिला पराशर हा मुलगा झाला. आपल्या वडिलांना राक्षसाने मारल्याने पराशरांनी शिवाची आराधना केली. शिवाने दिलेल्या शक्तीने पराशराने राक्षसांचा नाश केला. त्यानंतर पराशरांनी पुलस्त्यमुनींना आपले गुरू केले व त्यांची वाटचाल पुराण संहिता सांगणारा ऋषी म्हणून सुरू झाली. त्यांनी पुढे वसिष्ठ व पुलस्त्य यांच्या कृपेने विष्णुपुराण या ग्रंथाची रचना केली. पराशर ऋषींचा मुलगा महर्षी व्यास. या व्यासांनी वेद, पुराणे व महाभारत अशा ग्रंथांची रचना केली.

पराशरांनी फक्त धर्म या विषयावर लिहिले नाही तर कृषी हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय होता. म्हणूनच त्यांना कृषिमहर्षी म्हटले जाते. कृषी संग्रह, कृषी पराशर, पराशर कृषी तंत्र अशा शेतीविषय ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. यात कृषी पराशर हा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. कृषी जीवनातील सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टींचा त्यांनी यात विचार केला आहे. शेतकरी कसा असावा, शेती कशी करावी, कोणते पशू पाळावेत हेदेखील या ग्रंथात सांगितले आहे. कृषी पराशर या ग्रंथात २४३ चरणाद्वारे शेतीची माहिती देतात. तसेच भारतातील शेती या विषयावर त्यांनी सविस्तर विवेचनही यात केले आहे. पावसाचा अंदाज व अगदी नांगराच्या भागांवरही त्यांनी माहिती दिली आहे. पराशरांनी कृषिसाधना पारेगावात केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे पारेगावातील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे.

पराशरांच्या स्मृतिस्थळाचे जतन पराशर आश्रम म्हणून पारेगावात करण्यात आले आहे. या आश्रमाच्या लगत पराशरी नदी वाहते. तिचे उगमस्थान आश्रमातील कुंडातून असल्याचे म्हटले जाते. पुरातन काळातील या स्थानाची महती चिरकाल टिकावी यासाठी देवळाली येथील श्रॉफ परिवाराने येथे मंदिर बांधून विविध मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूस महर्षी पराशर ऋषींचे मंदिर आहे. त्याशेजारी त्यांनी केलेल्या तपश्चर्येचे स्थान असून, त्यासमोर पाण्याचे कुंड आहे. जुन्या काळी जवळील धोडंबा किल्ल्यावरून जमिनीतून या कुंडात पाणी येत होते, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. तेथून पाणी येणे बंद झाल्याने ५० वर्षांपूर्वी मंदिराची वहिवाट सांभाळणाऱ्या पुरी महाराजांनी शेजारील भागात विहीर खणल्याचे म्हटले जाते.

आश्रमात संगमरवरी नवग्रह देवतांचे मंदिर असून, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनि, राहु, केतू आदी नवग्रहांच्या मनोहारी मूर्ती आहेत. प्रांगणात रामभक्त हनुमानाचेही मंदिर आहे. त्याशेजारील दर्शनी भागात एक स्वतंत्र मंदिर तर, त्यात प्रथमत: दत्ताचे मंदिर असून, तळभगात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्याशेजारी दुर्गादेवीचे मंदिर असून, भाविकांना मोहित करणारी देवीची मूर्ती आहे. या तीनही एकत्रित भव्य मंदिरासमोर महर्षी पराशर ऋषींनी संजीवन समाधी घेतली ते स्थान आहे. येथे पराशर ऋषींची संगमरवरी मूर्ती आहे. जवळच यज्ञयागासाठी यज्ञशाळा असून, शिवरात्रीच्या दिवशी येथे यज्ञ केला जातो. प्रांगणाच्या मागील भागात दूरवरून आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी भोजन व निवासाची व्यवस्था आहे.

मध्यप्रदेश व राज्यभरातून भाविक आश्रमाला भेट देण्यासाठी येतात. दत्तजयंती व शिवरात्रीला गावात मोठी यात्रा भरते. पराशर ऋषींच्या तपश्चर्येने व जिवंतपणी घेतलेल्या समाधीमुळे या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र पराशरांच्या कार्याचा लेखाजोखा अथवा त्यांच्या तपश्चर्येचे फळ अजूनही गावाला मिळालेले नाही. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असला तरी कृषितज्ज्ञांचे गाव म्हणून या गावाकडे अजूनही पाहिले जात नसल्याची खंत गावकरी व्यक्त करतात. पराशरांच्या नावाने कृषी विद्यापीठ अथवा कृषी संशोधन संस्था गावात झाल्यास पराशरांची कृषी ग्रंथसंपदाही जपता येईल, असेही त्यांना वाटते.

कृषीमुळेच जग तगले आहे, असे पराशर सांगतात. कलियुगात कृषीला किती महत्त्व आहे हे ‘कलियुगातील राजा व प्रजा कशी असेल?’ या मैत्रेयने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पराशरांनी विष्णू पुराणात म्हटले आहे की, ‘कलियुगामध्ये राजा कर वसुलीमध्ये प्रजेला लुटेल. प्रजेला अडचणीत आणेल. राजा प्रजेची मदत करणार नाही. चोरटे, लुटारूंचे राज्य असेल. ज्याच्याकडे हत्ती, घोडे व रथ राहतील (म्हणजे श्रीमंत व्यक्ती) त्यालाच लोक राजा म्हणतील. दुष्काळग्रस्त लोक राजाला शरण जातील. गहू व ज्वारी ज्या देशात पिकेल त्या राजाला सर्व शरण जातील.’ पराशरांनी हजारो वर्षांपूर्वी पुराणात व्यक्त केलेली ही भीती आजच्या परिस्थितीत साम्य दाखविताना दिसते. पराशरांसारखा कृषीमहर्षी आपल्याला लाभला पण त्याचा कृषीविषयक संशोधनाचा लाभ पारेगावने घेतल्यास ही भूमी खऱ्या अर्थाने कृषिसंशोधकाची भूमी म्हणून ओळखली जाईल.

लेखक : रमेश पडवळ