वेशीवरच्या पाऊलखुणा : गिरीकंदरी गिरणारे दोन हजार वर्षांपूर्वीची युद्धभूमी, सिंहस्थ कुंभमेळ्याची उत्सवभूमी ते पेशवाईच्या पाऊलखुणांनी सजलेले गाव अशी ओळख असलेले गिरणारे आजही आपले वेगळेपण टिकवून आहे. गंगापूर धरणाचा सहवास लाभलेल गाव, आदिवासी भागातील मोठी बाजारपेठ, शहरातील सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेले गिरणारे इतिहासाला मात्र विसरलेले नाही. जुनी घरे, मंदिरे, पेशवाईतील बारव व त्यातील चित्र परंपरा अजूनही जपण्यासाठी अनेकांमध्ये धडपड दिसते. फक्त गरज आहे ती गिरीकंदरीचे गिरणारे अशी ओळख ठसठशीत करण्याची... गिरणारे गाव गंगापूर धरणाकडून दोन किलोमीटरवर दुगाव फाटा लागतो. तेथून डाव्या हाताला दोन-तीन किलोमीटरवर गिरणारे गाव लागते. गावात प्रवेश करताच समोर उभी असलेली खंडोबा टेकडी येणाऱ्या-जाणाऱ्यांचे स्वागत करते. गिरणारे गावाच्या दक्षिणेला छोट्याछोट्या टेकड्या दिसतात. ज्याला गिरी टेकड्या म्हटले गेल्याने गावाला गिरणारे असे नाव पडल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. शंभर-दीडशे पायऱ्या चढून गेल्यावर टेकडीवर पेशवेकालीन खंडोबा मंदिर आहे. म्हणून या टेकडीला खंडोबा टेकडी म्हणतात. येथील खंडोबाची मूर्ती, पांढरा लाकडी घोडा, विरगळ व दगडी दीपस्तंभ पाहण्यासारखी आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस एक भुयार आहे. युद्धादरम्यान लपण्याची ही जागा अथवा येथून दुसरीकडे जाता येत असावे असे सांगितले जाते. दरवर्षी गिरणारे गावात खंडोबाची मोठी यात्रा भरते. हा उत्सव पाहण्यासारखा असतो. या टेकडीवरून गिरणारे डोळ्यात साठवून घेता येतो. टेकडीच्या डाव्या हाताला व समोर निसर्गरम्य परिसर व कात टाकणारे गिरणारे पहायला मिळते. टेकडीच्या मागेही छोटेखानी एक दगडी मंदिर आहे. डावीकडे गंगापूर धरण आहे. पूर्वी गंगापूर धरण नव्हते. मातीचे गंगापूर धरण १९५४ मध्ये झाले. त्यापूर्वी प्राचीन काळापासून धरण परिसर हा सिंहस्थ कुंभमेळ्याची उत्सवभूमी होती. पेशवाईत त्र्यंबकेश्वर व नाशिक अशी सिंहस्थाची विभागणी झाली. त्यापूर्वी बेझे येथील चक्रतीर्थावर सिंहस्थ भरत असे. यावेळी दर बारा वर्षांनी गिरणारे व गंगापूर धरण परिसरात साधू व त्यांचे आखाडे, खालसे विसावत. याच भूमीत आखाड्यांमध्ये युद्ध झाल्याने हजारो साधू मारले गेले होते. त्यामुळे गिरणारेला कुंभमेळ्याची मोठी परंपराही लाभली आहे. आजही गिरणारे गावात बालाजी मठ म्हणजेच खाकी आखाडा मठ आहे. खंडोबा टेकडीवरून गिरणारेचा परिसर पाहिला की, दोन हजार वर्षांपूर्वी ही भूमी युद्ध भूमी म्हणून ओळखली गेली होती, या इतिहासाने अंगावर रोमांच उभा राहातो. सातवाहनकाळात गौतमी पुत्र सातकर्णीचे वडील शिवस्वातीकडे महाराष्ट्र ताबा होता. तेव्हा त्यांचे वास्तव्य नाशिक परिसरात होते. क्षत्रपांनी महाराष्ट्र ताब्यात घेण्यासाठी शिवस्वातींवर आक्रमण केले व हा परिसर ताब्यात घेतला. यावेळी गिरणारे, गोवर्धन-गंगापूर परिसरात मोठे युद्ध झाले होते. त्यानंतर क्षत्रपांनी या भागात राज्य केले. सतरा वर्षांनी गौतमीपुत्र सातकर्णी यांने क्षत्रपराजा नाहपानावर आक्रमण करीत नाशिक परिसर पुन्हा ताब्यात घेतला. यावेळीही नाशिक-गिरणारे परिसरात मोठे युद्ध झाले. यात सातकर्णीने क्षत्रपांचा नायनाट केला. याच युद्धाचे यशत्सोव म्हणजे गुढीपाडवा म्हणून साजरा केला गेला. दोन हजार वर्षांपूर्वी झालेले युद्ध अजूनही अनुभवायचे असेल तर खंडोबाच्या टेकडीवर जाऊन हे गिरणारेचे रणांगण पाहिले की तो इतिहास डोळ्यासमोर उभा राहातो. एवढेच नाही तर रामसेज युद्धाच्या घडामोडींशीही गिरणारेचा जवळचा संबंध आला आहे. संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी गणेशवाडी, गिरणारेतून मुगलांवर लहान मोठे हल्ले करून रामसेजची झुंज फत्ते केली होती. तर शहाबुद्दीनखानाने हल्ल्यासाठी रामसेजच्या उंचीचा लाकडी बुरूज (धमधमा) तयार केला. तोफा डागण्यासाठी बांधलेल्या मचानीसाठी गिरणारे गावातून लाकूड व सुतार, लोहार ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ती बांधून घेतली होती. ऐतिहासिक काळात गिरणारे गावात बनलेल्या तलवारींनी भल्या भल्यांना पाणी पाजलेले आहे. अशा अनेक वैशिष्ट्यांनी गिरणारे बहुरंगी बनलेले दिसते. गिरणारेचे आणखी एक वेगळेपण म्हणजे गाव बाराबलुतेदारी पद्धतीचे असले तरी गावात बाराभाई गल्लीत बारा बलुतेदारांची कुटुंब एकाच गल्लीत राहतात. गेली शेकडो वर्षांपासून गावात बाराबलुतेदार एकसंघ भावनेतून एकत्र राहतात. हे फारसे कुठे पहायला मिळत नाही. पेशवाईतील तीन मजली बारव गावात पेशवाईतील एक सुंदर तीन मजली बारव आहे. या बारवचे बांधकाम लाल रंगाच्या विटांनी झालेले आहे. अजूनही ही बारव गावाला पाणी देते. या बारवेत असंख्य पेशवेकालीन चित्र होती. मात्र गाळाने भरल्याने ही चित्र नष्ट झाली. मात्र बारवेच्या प्रवेशद्वारावर दोन चित्र अजूनही सुस्थितीत असून, त्यांच्या संर्वधनासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ही चित्र आवर्जून पहायला हवीत अशीच आहेत. दरम्यानच्या काळात बारव गाळामुळे बुजली होती. गावातील व त्यांच्या गामस्थ व सहका-यांनी श्रमदानातून ही बारव पुन्हा उपयोगात कशी येईल यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यात दुर्गसंवर्धनाची श्रमदानातून चळवळ उभी करण्यात गिरणारेच्या शिवकार्य गडकोट मोहीम संस्थेला मोठे यश आले आहे. गिरणारे गावातील भग्नावस्थेत असलेल्या पेशवेकालीन तीन विहिरींना गतवैभव देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष दुर्गप्रेमी राम खुर्दळ यांनी श्रमदानाची चळवळ उभी करीत गावचा ऐतिहासिक वारसा जपला आहे. त्यांच्या या कार्यात मविप्र सिडको कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यासाठी श्रमदान केले होते. गिरणारे परिसराचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर राम खुर्दळ यांचे माहिती केंद्र गिरणारे गावात येणाऱ्यांना मार्गदर्शनाचे काम करते. सतीचा पार व लहान मोठ्या समाधी यासह गावात अनेक मंदिरे आहेत. यात राममंदिर, कृष्णमंदिर, शनिमंदिर अशी अनेक मंदिरे पहायला मिळतात. यातील अनेक मंदिरे जुन्या बांधणीची आहेत. गावाने कुस्तीगिरांचे गाव ही पंरपरा आजही जपली आहे. बैलगाडीच्या शर्यतीसाठीही गाव प्रसिद्ध आहे. गावात बोहाडे बंद झाले; मात्र नागपंचमीला कलगीतुऱ्याचा कार्यक्रम जल्लोषात साजरा केला जातो. गिरणारेला आजूबाजूच्या ३५-४० आदिवासी गावांची बाजारपेठ म्हटले जाते. गावात शिकलेली गणेशवाडीची सुवर्णकन्या अंजना ठमके या धावपटूमुळेही वेगळी ओळख लाभली आहे. जवळच असलेले नागलवाडी हे गावही पाहण्यासारखे आहे. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर येते गावाने साधलेला विकास पाहण्यासारखा आहे. ग्रामसमृद्धी आणि विकासासाठी आदर्श गाव म्हणून नागलवाडीचे राज्य पातळीवर नाव घेतले जाते. गिरणारे गावाला लाभलेला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज आहे. परिसरातील उत्खननात अनेक मूर्ती मिळत असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. दोन हजार वर्षांपूर्वीचे सातवाहन-क्षत्रप युद्ध, सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा, अथवा पेशवेकालीन बारव हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी माहितीचे संकलन होणे आवश्यक आहे. बाराही महिने पाणी देणारे जलस्त्रोत गावात असतील व त्यांचे संरक्षण व संवर्धन केले गेले तर टंचाईच्या झळा गावाला लागणार नाहीत, हीच इतिहासाची देण गावचे नशीब पालटू शकते. यावर विचारमंथन होण्याची गरज आहे. लेखक : रमेश पडवळ rameshpadwal@gmail.com contact no : 8380098107