कृषी पर्यटन

ग्रामीण शैलीतला पाहुणचार, नैसर्गिक साधनांपासून बनविलेल्या वस्तू, झोपडी, फळबागा, हिरवीगार शेतं, बैलगाडीची सफर, ग्रामीण पद्धतीने बनविलेले रुचकर पदार्थ, शेतीचे धडे....या सर्व गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील कृषी पर्यटन केंद्रात..... ग्रामीण भागातील नैर्सगिक सौंदर्य शहरी भागातील मंडळींना भारावाते... सहलींसाठी, भ्रमंतीसाठी ग्रामीण भागावर भर दिला जातो.... हे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शासनाकडून त्यांना मिळणारे प्रोत्साहन महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्र झपाट्याने विकसीत होत आहेत. या व्यवसायात तरुणांचा वाढत असलेला सहभाग लक्षवेधी आहे..... त्या पार्श्वभूमीवर या संकल्पनेबाबत थोडक्यात...

पर्यटन हे क्षेत्र सध्या मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवून देणार क्षेत्र म्हणून पुढे येत आहे. त्या दृष्टीने पर्यटनस्थळे अधिकाधिक विकसित करणे, पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांचा ओढा पर्यटनस्थळांकडे वाढविणे यासाठी शासनाचा पर्यटन विभाग नेहमी प्रयत्नशील असतो. मोठमोठ्या फळबागा, निसर्गाकडून जे - जे मिळालयो त्याचा पुरेपूर वापर करून बनविलेल्या वस्तू, शेतीचे प्रात्याक्षिक, बैलगाडीची सफर, असा ग्रामीण जीवनाचा नैसर्गिक आनंद देणारी, सहल घडविणारी केंद्र महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात साकारली जाताय. ही केंद्रे आता पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यातून पर्यटनासह शेतीला मोठी चालना तर मिळतेच व रोजगारही उपलब्ध होत आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढाकार

कृषी पर्यटनाचे महाराष्ट्रातील भविष्य बघून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात सध्या ३२८ एवढी कृषी पर्यटन केंद्र आहेत. विशेष बाब म्हणजे गेल्या ३ वर्षात या केंद्रांना तब्बल २० लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या असून यातून ४७ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. कमी कालावधीत या क्षेत्राचा वाढता प्रसार बघता या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही १६ मे रोजी हा सोहळा पार पडला. यात सहा केंद्रांचा गौरव झाला. या क्षेत्रात तरुणांचा समावेश वाढत असल्याचे या सोहळ्यातून समोर आले. परदेशात शिक्षण घेऊन आलेल्या अनेक तरुणांनी या केंद्रांना पसंती दिली असून अभ्यासातून उत्तम असे पर्यटन केंद्र उभारणीवर त्यांचा भर आहे. ही कृषी पर्यटन केंद्रे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यात महत्त्वाचा वाटा उचलत आहे.

शासनातर्फे मदत

कृषी पर्यटन हा व्यावसायिक प्रकल्प नसल्याने त्याला वीज, पाणी, शेतीच्या दराने उपलब्ध होते. शालेय शैक्षणिक सहली अशा केंद्रांवर नेण्यात येतात, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत मार्फत प्रचार, प्रसार आणि मार्केटिंग केले जाते. १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून मान्यता मिळाली असून या पार्श्वभूमीवर ॲग्री टुरिझम तर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. ही संकल्पना अधिक व्यापक बनविण्याचा मानस ॲग्री टुरिझमने व्यक्त केला आहे. शेतकरी व तरुणांना या माध्यमातून नव उद्योगाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या असून. निसर्गच या व्यवसायात खऱ्या भांडवलाचे काम करणार असल्याने ही बाब बळीराजासाठी अधिक महत्त्वाची आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण आखण्यात येत असून त्याचा मसूदा तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मान्यता देण्यात येणार असून त्यानंतर तो जाहीर करण्यात येईल.

लेखक: आनंद सुरवाडे

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मुंबई.

माहिती स्रोत: महान्युज