चिखलदरा येथील हजारो फूट खोल दऱ्या या पर्यटकांचा काही काळ श्वास रोखण्यास कारणीभूत ठरतात. दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने आंघोळ केली होती, त्यामुळे या कुंडाला भीमकुंड असे नाव पडले आहे असे म्हणतात. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते.

मेळघाट परिसर हा व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे चिखलदऱ्याच्या घाटात वाघोबाचे दर्शन घडू शकते. मोर, रानकोंबड्या, अस्वले, हरीण तर मुक्त संचार करतात. उन्हाळ्यात मात्र येथे पानझडी सुरु होते. कारण हे जंगल परिसर शुष्क पानझडी अरण्याच्या प्रकारात मोडतो. परंतु पावसाळा व हिवाळ्यात सातपुड्याला सह्याद्री पर्वताचे रुप प्राप्त होत असते.

भीमाने येथील राजा कीचकचा वध करुन एका दरीत फेकून दिला होता. ती दरी म्हणजेच कीचकदरी होय. परंतु, कालांतराने कीचकदरीचे रुपांतर चिखलदरीत झाले व चिखलदरीचे चिखलदऱ्यात. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदरा येथे विविध पॉइंट पर्यटकांचे स्वागत करत असतात. दरीच्या पायथ्याशी काही पायऱ्या उतरुन गेले असता देवी पॉइंट आहे. डोंगराच्या एका भुयारात देवी वसलेली आहे. तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे. देवीच्या समोर एक कुंड आहे.

कुंडातून पाणी सरळ दरीत उडी घेते. देवीचे दर्शन झाल्यानंतर फेसाळलेला धबधबा मनमोहून टाकतो. देवी पॉइंटहून जवळच मोझरी पॉइंट असून त्याच्या बाजूला हरिकेत पॉइंटही आहे. वनोघाटात संध्याकाळी कुटुंबियांसोबत फिरायला मज्जा येते. लहान मुलांसाठी गार्डन रेल्वेचीही सोय येथे करण्यात आली आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे कॉफी. येथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते.

चिखलदऱ्याच्या दक्षिणेला तीन किलोमीटरवर बहामनी किल्ला आहे. किल्ला पाहण्यासाठी एक संपूर्ण दिवस लागतो. आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा वगैरे आहेत. इथली दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय इथले शक्कर तलाव, देवी तलाव, मछली तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

पंचबोल पॉइंट (इको पॉइंट) तर पर्यटकांना चक्राऊन टाकणार आहे. चारही डोंगरानी वेढलेली ही खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. विराट देवी हा इथला प्रसिद्ध पॉइंट. चिखलदऱ्यापासून 11 किलोमिटर दूर डोंगरावर विराट देवीचे मंदिर बांधलेले आहे. खरे देवीचे मंदिर पश्चिमेकडील खोल दरीत एका भुयारात आहे. तेथे जाणे अशक्य असल्याने नवे मंदिर बांधण्यात आले आहे.

कसे जावे

महामार्ग - राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर अमरावती हे शहर आहे. तेथून चिखलदरा हे 94 किमी अंतरावर आहे. तेथून चिखलदरा येथे येण्यासाठी थेट एसटी सेवा आहे.

रेल्वे - मुंबई-हावडा या मुख्य रेल्वे मार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. तेथून अमरावतीसाठी एस.टी.किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते. अमरावतीहून चिखलदरा 94 किमी अंतरावर आहे. एसटी व खाजगी वाहन सहज मिळते.

लेखक: महेंद्र देशपांडे, नाशिक

मो.9422772020-21

माहिती स्रोत: महान्यूज