वेशीवरच्या पाऊलखुणा : तळेगाव विखुरलेल्या इतिहासाचे गोसाव्यांचे तळेगाव! एखाद्या गावाला त्याच्या काही वैशिष्ट्यांमुळे महत्त्व प्राप्त झालेले असते अन् अगदी गावाची ओळखही त्यामुळे रूढ होते. मात्र कालौघात ही वैशिष्ट्ये लुप्त होतात अन् ती ओळखही पुसली जाते. मग राहतात जुन्या वैशिष्ट्यांचे गावभर पसरलेले अवशेष अन् आठवणी. पण या आठवणी सतत आपल्यात इतिहास दडलाय असे सांगत राहतात. असेच काहीसे नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील तळेगाव-दिंडोरीबद्दल घडले आहे. कधीकाळी गोसाव्यांचे तळेगाव म्हणून ओळखले जाणारे तळेगाव आता तळेगाव-दिंडोरी म्हणून ओळखले जाते. येथील गोसाव्यांचे तळेगाव म्हणून असलेली ओळख हरवली आहे. हेमाडपंती मंदिरांचे विखुरलेले अवशेष व पाण्यासाठी अहिल्याबाईंनी बांधलेल्या बारव गावाचे ऐतिहासिक महत्त्व सांगून जातात. पोचाल कसे ? नाशिक-दिंडोरी रस्त्यावर नाशिकपासून तळेगाव हे १८ किलोमीटरवर आहे. वणीकडे जाताना या गावासमोरूनच जावे लागते. तेव्हा गावाच्या हद्दी प्रवेश करताना किल्लावजा मोठा बुरूज आपले स्वागत करतो अन् ‘व्वा काय गढी आहे’ असे म्हणायला लावतो. पण दिंडोरी रस्त्यावर गढी अथवा किल्ल्याचा संदर्भ मिळत नाही. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांची चलबिचल होते. दिंडोरीकडे जाताना उजवीकडे किल्ल्यासारखी दिसणारी गढी अन् डावीकडे मारूतीचे मंदिर व शहीद यशवंत अर्जुन ढाकणे यांच्या स्मारकासमोरील कट्ट्यावर बसलेली ज्येष्ठमंडळी असा नेहमीचा फड रंगलेला असतो. ‘काका, ही गढी आहे का?’ असे त्यांना विचारले तर ज्येष्ठमंडळी गावाच्या अनोख्या इतिहासात घेऊन जातात. कोठेही लिहून न ठेवलेला, पिढ्यानपिढ्या सांगितला जात असलेला तळेगावचा इतिहास उलगडायला लागतो. तळेगावचा इतिहास तळेगावची मूळ ओळख म्हणजे गोसाव्यांचे तळेगाव. नागपंथीय आखाड्याचे महंतांचा दर्जा असलेले पुरी गोसावी यांनी ही गढी बांधल्याचे म्हटले जाते. त्यानंतर त्यांचे वारस त्र्यंबक पुरी गोसावी यांच्याकडे व त्यानंतर काशी पुरी गोसावी यांच्याकडे हा वारसा चालत आला. ही मोठी गढी आता कोसळली आहे. महामार्गालगतचा एक बुरूज इतिहासाची आठवण करून देण्यासाठी तग धरून उभा आहे. महंत पुरी गोसावी नागपंथाच्या आखाड्याचे महंत असल्याने दर सिंहस्थ कुंभमेळ्यात कुंभमेळा भरण्यापूर्वी नागपंथीय साधू तळेगावातील गोसावींकडे या गढीत तीन महिने मुक्कामाला असत. त्यामुळे तेव्हा पेशव्यांनी गोसावींना बारा गावची जहागिरी देऊन या साधूंच्या देखभालीची जबाबदारी सोपविली होती असे म्हटले जाते. ही जहागिरी पेशवाईच्या काळात दिली गेली असावी कारण पेशवाईत अनेक आखाड्यांना अशा स्वरूपाच्या जहागिऱ्या देण्यात आल्या होत्या. दर बारा वर्षांनी गोसावी तळेगावमध्ये सिंहस्थापूर्वी तीन महिने नागा साधूंची रेलचेल असे. यामुळे या गावाला गोसाव्यांचे तळेगाव म्हणून ओळखले जाऊ लागले, अशा आठवणीही गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. त्यामुळे आजूबाजूच्या गावची मंडळी ही गावात या दरम्यान येत असल्याने गावात भक्तीचा महापूर यायचा. मात्र गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून नागा साधू गावात येत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तळेगावचे सौदर्य गावचा बाजार, व्यापारी गल्ली असल्याची साक्ष अजूनही येथील मोठमोठी जुनी घरे देतात. गोसावी वाडा दोन मजली होता असे सांगितले जाते. सध्या कोसळलेल्या अवस्थेतील वाड्याचे वैभव तेव्हा काय असेल,याची कल्पना करता येते. गढीचा दरवाजा अन् अंतर्गत लाकडांवर कोरीव काम म्हणजे वैभवाचीच साक्ष असल्याच्या आठवणी ग्रामस्थ सांगतात. सध्या या वाड्यात नागेश्वराचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात काही साधूंच्या समाधी आहेत. यातील महंत गोसावी व इतर नागपंथींच्या समाधी असल्याचे म्हटले जाते. या गढीत रानगवत वाढल्याने येथे कोणी येण्याची हिंमतही करीत नाही. गढीच्या मागील बाजूसही एक प्रशस्त दरवाजा असून, तोही दगडांनी बंद करण्यात आला आहे. गोसावी गढीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर एक मोठी हवेली दिसते. तिची पडझड झाल्याने पाहण्यासारखे येथे काहीच नाही. ही हवेली एका सरदाराची असल्याचे म्हटले जाते. मात्र, पेशवेकाळातील हा सरदार कोण याची माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे गावातील पेशवेकाळातील बराच इतिहास पडद्याआड आहे. ही हवेली सुंदर होती अन् हवेलीचा दरवाजा हत्तीसारखा बलाढ्य होता तसेच अंतर्गत लाकडावर सुंदर कोरीवकाम होते, असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. या हवेलीतून रामशेज किल्ल्यावर जाण्यासाठी भुयार असल्याचेही समजते. यावरून या सरदाराचे सैन्यातील वर्चस्व दिसून येते. बुरूजाचे वय तीनशे ते साडेतीनशे वर्षे गोसावी वाड्याच्या डाव्या हाताला महामार्ग व त्यापलिकडे लगतच हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिरही जुन्या पद्धतीचे लाकडात बांधलेले मंदिर आहे. मंदिरामागच्या रस्त्याने गावची वेस लागते. ही वेस दोन पद्धतींनी बांधण्यात आली आहे. म्हणजे एक बुरूज पद्धतीने व दुसरी भिंतीसारखी. असे करण्यामागे भिंतीमागे बुरूज आहेत हे लक्षात येऊ नये व युद्ध काळात शत्रूला गाफील ठेवून तोफांनी हल्ला करणे सहज शक्य व्हावे असे यामागील गणित असावे. या बुरूजाचे वय तीनशे ते साडेतीनशे वर्षे असावे. बुरूजातून आत गेल्यावर उजव्या हाताला एका झाडाखाली मूर्तीचा खच दिसतो. महादेवाची पिंड व तीन तोंडांच्या तुटलेल्या मूर्तीचे शीर पहायला मिळते. ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. यावरून येथे पूर्वी मोठे दगडाचे मंदिर असावे असा अंदाज बांधता येतो. येथील शेतकऱ्यांच्या माहितीनुसार आजूबाजूच्या शेतांमध्येही अनेक लहान-मोठ्या मूर्ती व दगडी खांबांचे अवशेष विस्कळीतपणे पडलेले आहेत. गावाचा शेकडो वर्षांचा इतिहास अजूनही दडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते. पेशवेकालीन बारव गावचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील तहान भागविणाऱ्या पेशवेकालीन बारव. या बारव अहिल्याबाई होळकरांनी बांधल्याचे गावकरी सांगतात. यातील दोन मोठ्या बारव सुंदर अन् प्रशस्त असून, त्या पूर्णपणे दगडात बांधलेल्या आहेत. त्यावर कलाकृतीही कोरलेली आहे. इतर तीन बारव लहान विटांमध्ये असून, त्यातील काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मोठ्या बारवांच्या परिसरात रान गवत वाढल्याने त्या फक्त उन्हाळ्यातच पाहता येतात. या बारव पुन्हा जिंवत होऊ शकतात; मात्र याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे गावाला नेहमीच पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. गावाच्या विखुरलेल्या अवस्थेतील इतिहासाचीही या बारवांप्रमाणेच अवस्था झालेली आहे. तो इतिहास संकलित करण्याची साद घालताना दिसतो. गोसाव्यांचे तळेगाव आता दिंडोरी तळेगाव नावाने इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्या उराशी कवटाळताना दिसते. लेखक : रमेश पडवळ rameshpadwal@gmail.com contact no : 8380098107