वेशीवरच्या पाऊलखुणा : देवपण लाभलेलं धारणगाव

नाशिक परिसरातील अनेक गावांवर सुफी संतांचा मोठा प्रभाव असल्याचे पहायला मिळते. यामुळे त्याला धरून तयार झालेल्या अनेक अख्यायिकांचा स्मृतीगंध या गावांमध्ये आजही दरवळताना दिसतो. असाच प्रभाव सिन्नर तालुक्यातील धारणगावावरही पहायला मिळतो. देवनदीचा अनोखा सहवास, अजूनही उभ्या असणाऱ्या वेसकोट, लहान घरेवजा वाड्यांच्या आठवणींनी उजळून निघालेले धारणगावातील घरांवरील कातळशिल्प अनुभवताना या गावाने काळानुरुप वेगवेगळी रूपे धारण करीत गावाला वेगळेपण मिळवून दिल्याचे पहायला मिळते. या प्रवासाविषयी…

नाशिकला ऐतिहासिक अन् वैभवशाली करण्यात दोन हजार वर्षांपूर्वीच्या अनेक पराक्रमी राजांचा मोठा वाटा आहे. सातवाहन, क्षत्रप अन् त्यानंतर आलेल्या अनेक राजांनी नाशिकवर राज्य केले. कालांतराने या राज्यव्यवस्था स्मृतिआड गेल्या. सत्ता बदलल्या तसे त्याचे रूप स्वरूपही बदलले. द्रढप्रहारची ‘चंद्रादित्यपूर’(चांदवड) ही राजधानी होती. त्याचा राज्यविस्तर चांदवड ते अंजनेरीपर्यंत अन् दक्षिणेकडे सिंदीनेरपर्यंत (सिन्नर) होता. त्याचा मुलगा सेऊणचंद्रनेही राज्यविस्तार केला अन् व त्याची राजधानी राज्यकारभाराच्या सोयीसाठी चंद्रादित्यपुराहून ‘सिंदीनेर’ला आणली. त्यानंतर तीनशे वर्षें यादवांची राजधानी ‘सिन्नर’ होती. या ऐश्वर्याने नाशिकलाही समृद्ध केले. याच काळात नाशिक परिसरावर सुफीसंतांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसतो. मात्र, दुर्दैव असे की, यावर संशोधनात्मक अभ्यास झालेला नाही. या पाऊलखुणा आजही प्रत्येक गावात उमटलेल्या दिसतात. सिन्नर अनोखे आहे. तसेच त्याच्या आजूबाजूची अनेक गावे इतिहासाच्या स्मृतिगंधाने दरवळलेली आहेत. हा दरवळ स्मृतिआड जाऊ पाहत असला तरी, इतिहास पाऊलखुणांच्या रूपाने तो अजूनही जपून ठेवला आहे. कालांतराने धारणगावातील जुनी घरे, वाडे ओस पडली; मात्र, त्यांच्या देहावरील उरलीसुरली कातळशिल्पे गावाचा इतिहास बोलका करतात अन् इतिहासाच्या अनोख्या सफरीवर घेऊन जातात.

सिन्नर या यादवांच्या राजधानीतून शिर्डी रस्त्याने दहा किलोमीटरवर भोकनी फाटा लागतो. या फाट्यावरून डाव्या हाताला फर्दापूरकडे जाणारा ओसाड रस्ता लागतो. या रस्त्याने तीन किलोमीटरवर फर्दापूर हे गाव लागते. फर्दापूर म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर गावात मिळत नाही. शंभर उंबऱ्यांच्या या गावात हनुमानाचे मंदिर सोडले, तर फारसे काही नाही. गावात फार मनुष्यवस्तीही नाही. सगळे मळ्यावर राहत असल्याने व्यवहारापुरतेच गावकरी गावात पोस्टात, पारावर अथवा पतसंस्थेच्या आजूबाजूला विखुरलेले दिसतात. फर्दापूर असे नाव पडण्यामागे देवपूरच्या राणेखानाशी काही संबंध असेल, अशी शक्यता फक्त गावकरी व्यक्त करतात. गावातून थोड मागे येऊन डाव्या हाताच्या रस्त्याने देवनदीवरचा पूल ओलांडाला की, समोर धारणगाव दिसते. दोन हजार लोकसंख्येचे धारणगाव देवनदीच्या कुशीत वसले आहे.

पुलावरून गावच्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो. पूल ओलांडला की, आपण गावच्या मागील बाजूने गावात प्रवेश करीत असल्याचे लक्षात येते. पूर्वीची जुनी घरे बऱ्यापैकी उत्तरमुखी आहेत. गावची रचनाही अशी आहे. हनुमान गल्ली, हनुमान चौक ते काळेगल्ली (खालची व वरची) हे अनुभवायला मिळते. गावात प्रवेश केल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला धाब्याच्या पडक्या घरांचा खच पहायला मिळतो. धाब्याची घरे जाऊन आता सिंमेटची घरे उभी राहत आहेत. मात्र ती पडकी घरचं अधिक आकर्षक अन् मनमोहून घेतात. गावातून उत्तरेकडे असलेल्या उत्तर वेशीजवळ पोहोचल्यावर उजव्या हाताला वाडावजा शिरोळे वाडा दिसतो. समोर अजूनही माती व लाकडी बांधणीची उत्तर वेस दिसते.

देवराम शिरोळे, हे मागील चार पिढ्यांपासून याच वाड्यात राहत असल्याचे ते सांगतात. मात्र कोणत्या पिढीने हा वाडा बांधला गेला याबाबत त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही. पेशवाईच्या दरम्यान हा वाडा बांधला गेला असेल, असे वाड्याच्या रचनेवरून व नक्षीकामावरून वाटते. आतापर्यंत शिरोळे येथे रहायचे मात्र आता तेही शेतीमुळे मळ्यात रहायला गेले आहेत. यातून वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाड्याने देह ठेवला आहे. मात्र, त्याचे प्रवेशद्वार अजूनही वाड्याची शान दाखविते. वाड्यावरील पेट्रोग्लिफ सुंदर आहेत. खासकरून मोरांची पेट्रोग्लिफ अजूनही जैसे थे आहेत. पेट्रोग्लिफ म्हणजे कातळशिल्प. दगडावर उठावपद्धतीने केलेल्या नक्षीकामाला इंग्रजीत पेट्रोग्लिफ म्हणतात. या शब्दाचं मूळ ग्रीक भाषेत आहे. ग्रीक भाषेत पेट्रो म्हणजे खडक आणि ग्लिफ म्हणजे कोरीवकाम. खडकावर केलेलं कोरीवकाम म्हणून पेट्रोग्लिफ. नाशिकच्या सगळ्याच वाड्यावर व मंदिरांवर पेट्रोग्लिफ पद्धतीचेच नक्षीकाम पहायला मिळते.

मात्र असे काम त्यावेळी फक्त सरदार, सावकार अथवा सत्तेतील मोठ्या माणसाच्या घरावर वाड्यावरच पहायला मिळत असतं. यावरून शिरोळे घराण्याचा काही ना काही इतिहास नक्की असणार अन् त्याचेच अनेक ठसे गावभर उमटलेले दिसतात. असेच अनेक लहान लहान वाडे गावभर आहेत. गावाचे नाव धारणगाव असण्याचे कारण अस्पष्ट असले तरी दत्तात्रेय शिरोळे खुबीने गावची महती अन् सुफीसंतांचा सहवास गावाला लाभल्याचे सांगतात. गावाला पूर्वी कोट होता. आता तो पडला, मात्र प्रवेशद्वार वेस रूपात उभे आहे. असे म्हटले जाते की, गावाने नशिबाने जे मिळेल ते धारण करण्याची वृत्ती ठेवली. त्यातच देवनदीच्या किनारी वसल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहेच. गावात महादेवाचे प्राचीन मंदिर व कानिफनाथाचे मंदिर आहे. नदीलगत नागपंथीयांचा प्रभावाबरोबरच मोठे बाबांच्या पीराचे ठाणेही गावात आहे. गावात अनेक वीरगळ, चीरा व समाधी आहेत. म्हणजेच गाव वीर पुरूषांची भूमी होते. तसेच चारणबाबांची कर्मभूमी म्हणूनही गावाची ओळख आहे, अशा अनेक गोष्टी गावाने धारण केल्याने गावाला धारणगाव नाव पडले असावे, असे शिरोळे सांगतात.

कोटाच्या उत्तर वेस दरवाजा अजूनही साक्षीदार म्हणून उभा असलेला दिसतो. गावात खंडोबा मंदिर आहे. दरवर्षी गावात खंडोबाचा उत्सव भरतो. उत्सवात बोहाड्यातील सोंगे नाचविण्याची परंपरा होती; मात्र मागील ५० वर्षांपासून ती बंद पडली आहे. बोहाड्यांच्या या स्मृती अजूनही सोमनाथ शिरोळे यांनी देवीच्या मुखवट्याच्या स्वरूपात देव्हाऱ्यात जतन करून जपल्या आहेत. सोंगे नाचविण्याचा मानपानात देवीचा सोंग घेण्याचा मान त्यांच्या कुटुंबीयांकडे होता. त्यामुळे हा मुखवटा आता आमच्या घराचे दैवत झाले असल्याने याची आम्ही नियमितपणे पूजाअर्चा करतो, असे सोमनाथ शिरोळे सांगतात. कोटाच्या उजव्या हाताला एक मोठा दगडी पाट दिसतो. या पाटावर आता खोलीवजा जागेत देवीचे मंदिर आहे. देवीचा चिरा पूर्वीपासून असल्याने आता देवीची प्रतिमा येथे बसविण्यात आली आहे. मात्र, पूर्वी येथे मोठे दगडाचे प्राचीन मंदिर असणार याच्या खाणाखुणा स्पष्ट दिसतात. वेशीबाहेर उजव्या हाताला महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.

यावरही पेट्रोग्लिफ पहायला मिळतात. तर वेशीच्या डाव्या हाताला नुकत्याच जीर्णोद्धार केले मोठे हनुमान मंदिर आहे. रंगरंगोटी केल्याने ते अधिक आकर्षक वाटते. हनुमान मंदिरापासून देवनदीपात्राकडे निघाल्यास उजव्या हाताला वीरगळींचा समूह दिसतो. वीरगळीवर अनेक प्रकारची चिन्हे अन् व्यक्तींच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. डावीकडे मोठे बाबा या पीराचे स्थान आहे. पीरबाबांचा गावावर मोठा प्रभाव होता अन् त्यांच्यावर श्रद्धा असणारा मोठा भक्तपरिवार गावात आहे. याबाबत अनेक अख्यायिका गावात सांगितल्या जातात. मात्र यात वेगळी अख्यायिका आहे ती रामसिंग चारणबाबा यांची. दरवर्षी चारणबाबांच्या यात्रेला खान्देशातून मोठा भक्तपरिवार येथे येतो. रामसिंग चारणबाबा हे मूळचे जळगावातील नालबंदीचे. गुरांना चरण्यासाठी ते सिन्नर परिसरात यायचे. ते चांगले व्यक्ती असल्याने सर्व त्यांना मानत. त्यांचा सल्ला अनेक जण घेत. त्यामुळे त्यांच्या अनेक बौद्धीक चमत्काराने ते सर्वदूर प्रसिद्ध झाले होते, अशी आख्यायिका सुखदेव शेळके सांगतात. मात्र, त्यांचा काळ अज्ञात आहे. दरम्यान, त्यांचा धारणगावात मृत्यू झाला. तेव्हा ग्रामस्थांनी त्यांची चिरा उभारली. सध्या त्या चिरेभोवती छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे.

धारणगावाने काळानुरूप प्रथा, परंपरा, संस्कृती अन् सुफीसंतांच्या प्रभाव धारण केला. धारणगाव आता वारकरी संप्रदायाचा ध्वज पुढे घेऊन जात आहे. मागे राहिल्या आहेत त्या दरवळणाऱ्या आठवणी अन् अजूनकाही वर्षांनी देह ठेऊ पाहणारे धारणगावचे प्रवेशद्वार. याच वेशीतून पूर्वी खातरजमा केल्याशिवाय गावात कोणाला प्रवेश दिला जायचा नाही. मात्र, आता दगडाच्या सुंदर इमारती हद्दपार होत आहेत अन् या प्रवेशद्वारातून सिमेंटची घरे प्रवेश करू लागली आहेत. देवनदीच्या साक्षीने देवपण धारण केलेल्या धारणगावाला अजून काय काय धारण करावे लागणार आहे, हा प्रश्न मात्र पाठ सोडत नाही. आपण प्रगतीच्या नावाखाली कुठे चाललो आहोत, असा प्रश्न धारणगाव भटकताना नक्कीच पडतो.

लेखक : रमेश पडवळ