वेशीवरच्या पाऊलखुणा : देव्हारा हरविलेले देवघर! पिढ्यान् पिढ्या परंपरा पुढे घेऊन जाणारे घराघरांतील देवघर नावाचे मंदिर अन् देवाची पूजा अर्चा हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाव असतो. मात्र, एखाद्या गावातील मंदिर नावाचा देव्हाराच हरविला तर? देवाला घर असो वा नसो, पण माणसाला देव्हारा हवा असतो. हरविलेल्या देवघरामुळे माणूस विचलित होऊन जातो, अस्वस्थ होतो. पण, हार मानत नाही. देवघर नावाच्या गावातील देवाचे घरच हरविले अन् धडपडणाऱ्या माणसांनी ते नेटाने उभे करण्याची धडपड सुरू केली. पण, हा प्रवास अस्वस्थ करतो अन् असे घडायला हवे होते का? असा विचार करायला लावतो. प्रत्येकाच्या घरातील एक कोपरा देवघरामुळे श्रद्धेचे, मन मोकळे करण्याचे अन् उत्सव साजरा करण्याचे एक हक्काचे ठिकाण झालेले असते. त्यामुळेच देवघर जितके जुने तितके त्याचे महत्त्वही अधिक. असेच काहीशे गावागावांमधील प्राचीन मंदिरांचेही आहे. गावागावातील प्राचीन मंदिरे हा त्या गावचा देव्हारात असतो. ही मंदिरे कधी तयार झाली. का तयार झाली, असे अनेक प्रश्न मनात काहूर घालतात, ते दिंडोरी तालुक्यातील देवघर नावाचे गाव पाहिल्यावर. नाशिक-पेठ रस्त्यावर ३५ किलोमीटरवर डाव्या हाताचे अंबेगण सोडले की, पुढे दोन किलोमीटर गेल्यावर उजव्या हाताला गोळशी फाटा लागतो. या फाट्याने आत गेल्यावर पहिले गाव गोळशी, त्यानंतर उजवीकडे महाजे अन् थोडे पुढे गेल्यावर डावीकडे दरीतील आंबेझरी देवीचे गाव लागते. आंबेझरी येथील देवीचे मंदिरही पाहण्यासारखे आहे. तसेच चिल्हारपाडा, ननाशी, चिकाडी, शेकझरी ही लहान लहान गावेही नयनरम्य आहेत. आंबेझरीपासून पुढे चार किलोमीटरवर गेल्यावर देवघर-ननाशी फाटा लागतो. ननाशी अध्यामिक गाव म्हणून प्रसिद्ध असून, येथे परंपरागत उत्साहाबरोबरच पीर साहेबांचा उत्सव अन् पाडव्याला एक दिवसांचा बोहाडा साजरा केला जातो, अशी माहिती संजय व त्र्यंबक करवंदे यांनी दिली. देवघर-ननाशी फाट्यावरून उजव्या हाताने निसर्गरम्य घाटवाटेने दोन किलोमीटर आत गेल्यावर खोल उताराच्या टोकाला खळखळता ओढा आपले स्वागत करतो. अन् समोर लहानशा टेकडावर वसलेले शंभरएक उंबऱ्यांचे देवघर नावाचे गाव लागते. कौलारू घरे अन् विटामातीची नव्याने झालेली घरांचा साज या टुमदार गावाकडे आकर्षीत करतो. गावात शिरताना छोटेशा मंदिराकडून डाव्या हाताने थेट देवघरच्या महादेव मंदिराकडे जाता येते. मंदिराकडील चिखलातील वाटही आपल्याला त्या मंदिराकडे घेऊन जात असल्याचा भास व्हायला लागतो. पण पाऊले अडखळतात ते वाटेकडेच्या दगडांच्या शिळांचा खच पाहिल्यावर. दगडी शिळांचा आकार पाहिल्यावर हे मंदिर आकाराने काळाराम मंदिराऐवढे असेल, असे वाटायला लागते. एक.. दोन.. तीन.. चार.. असे अनेक शिळांचे ढिग नजरेला छिन्नविछिन्न करायला लागताे. त्या शिळांवर कोरलेली नक्षीकाम पाहिल्यावर हे मंदिर भूमिज शैलीतील असेल, असे वाटते. शिळांचा ढिग चाचपडल्यावर पुढे काही अंतरावर पूर्वी येथे शिवपंचायतन मंदिर असावे, अशी भव्य व उद्धवस्त मंदिराची जागा पहायला मिळते. अंजनेरीतील मंदिराप्रमाणे रचना असलेले दोन लहानशी मंदिरे मुख्य मंदिराच्या उजव्या हाताला एक अन् मंदिरासमोर एक पहायला मिळतात. ती अजूनही मुख्य मंदिराचे वैभव दाखविण्यासाठी इतिहासाच्या पाऊलखुणा घेऊन धीर धरून उभी आहेत. मुख्यमंदिर पूर्वाभिमुख आहे. मात्र हे मंदिर २०१३ मध्ये नव्याने बांधायचे म्हणून प्राचीन मंदिर पूर्णपणे उतरविण्यात आले. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर विक्रम राजाच्या काळातील असावे. मच्छिद्रनाथ, गोरखनाथ व नवनाथांचा या मंदिराशी संबंध आल्याच्या अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. मंदिराचा गाभाऱ्यात जाण्यासाठी पाच पायऱ्या उतरून जावे लागते. गाभाऱ्यात पिंड व शिवप्रतिमा तशीच आहे. यावरील गाभारा मात्र जागेवर नाही. गाभारा व त्यासमोर सगळे मंदिर गेले कुठे, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. तेथील अनेक दुर्मिळ प्राचीन मूर्ती आता कुठे आहेत. त्या कोणी नेल्या अन् कशासाठी नेल्या याचेही उत्तर मिळत नाही. मुख्य मंदिरासमोर मंडपाची मोकळी जागा आहे अन् त्यासमोर कुंड आहे. या कुंडात आंबेझरी व त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तातून पाणी येते, असे ग्रामस्थ सयाजी बेंडकुळे सांगतात. कुंडातील पाणी कधीही आटत नसल्याचेही ते सांगतात. कुंडाचे बांधकामही वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरासमोर भाविकांना पूजाअर्चेसाठी पत्र्याचे मंडप बांधण्यात आला आहे. त्यासमोर वीरभद्र व बळीभद्रच्या पाच फुटी भग्न मूर्ती पडलेल्या आहेत. मूर्तीच्या शैलीवरून हे मंदिर सिन्नरच्या गोंदेश्वरशीही साम्य दाखविते. या मूर्तीशेजारी पाच-सहा जिर्ण मूर्ती अन् अनोख्या वीरगळ पहायला मिळतात. या शेजारीच नारायणबाबा यांची समाधी आहे. तर समोरच्या बाजूला लहानशे शिवपंचायतनातील एक प्राचीन मंदिर आहे. यात शिवलिंग आहे. मुख्य मंदिर नेमके कसे होते हे कळायला मार्गही शिल्लक नाही, अशी देवघरच्या या देव्हाऱ्याची अवस्था येथील ग्रामस्थांनाही पाहवत नाही. मंदिर खूप सुंदर होते, असंख्य दुर्मिळ मूर्ती येथे होत्या, नक्षीकामाने मंदिरातील खांब सजलेले होते. मंदिराचे प्रवेशद्वार अन् मंडपावरील नक्षी मोहात पाडणारी होती, एवढ्याच आठवणी ग्रामस्थांच्या अश्रुंमध्ये दडल्याचे पहायला मिळते. हे मंदिर उतरवायलाच नको होते, कारण तसे मंदिर आता साकारूच शकणार नाही, अशी खंतही ग्रामस्थ व्यक्त करतात. आजूबाजूंच्या अनेका गावांसाठी देव्हारा असलेले देवघरचे मंदिर अन् गावची कथा येथेच संपत नाही. २०१३ मध्ये देवघरचे महादेव मंदिर उतरविल्यानंतर मंदिराचे काम निधी अभावी रखडले. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर आता कुठे मंदिराचे काम सुरू झाले आहे. राजस्थानी कारागिर तांबड्या दगडांवर नक्षीकाम कोरताना मग्न झालेले दिसतात. हे मंदिर उभे राहयला अजून किती वर्षे लागतील कोणास ठाऊक, असा प्रश्न ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसतो. देवघरच्या देव्हारा हरविला की, चोरी गेला हा शोध घेण्याची गरज आहे. मात्र ही अवस्था नाशिक जिल्ह्यातील अनेक प्राचीन मंदिरांची होऊ लागली आहे. गावातील देवघर जुने झाले म्हणून बदलावे असे नवीन फॅड गावागावांमध्ये पहायला मिळू लागले आहे. गावागावांतील प्राचीन मंदिरांचा वारसा उद्धवस्थ करून जीर्णोधाराच्या नावाखाली मारबलची मंदिरे उभारली जात आहेत. मात्र त्या मंदिरांतील दुर्मिळ मूर्तीसाठी जुनी मंदिरे बळी पडत असल्याचेही पहायला मिळते. त्यातच पुरातत्त्व विभागाने या मंदिरांकडे दुर्लक्ष केल्याने अनेक जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा धोका आहे. प्राचीन मंदिरे ही आपल्या गावाला मिळालेले वैभव आहे हे समजून हा वारसा जपायला हवा. तरच नाशिकच्या खऱ्या हेरिटेजचे संवर्धन होईल, अन्यथा देवघरसारखी स्थिती सर्वत्र पहायला मिळेल. देवघर हा एक धडा समजून त्यापासून शिकायला हवे, अशी कणखर भूमिकाही देवघरचे ग्रामस्थ व्यक्त करतात. कारण नवे मंदिर उभे राहिल, पण चुटपूट राहिल ती पिढ्यान् पिढ्या चालत आलेला देव्हारा अन् त्यावरील अनोख्या दुर्मिळ मूर्ती हरविल्याची. लेखक : रमेश पडवळ