कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकाणापासून 45 कि.मी. अंतरावर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पावन संगमावर असणारे हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र दत्तसंप्रदायाची राजधानी म्हणून प्रसिध्द आहे. दत्ताचे तिसरे अवतार समजले जाणार्या नृसिंह सरस्वतींचे येथे 12 वर्षे वास्तव्य होते. त्यांनीच या ठिकाणी श्री दत्त पादुकांची स्थापना केलेली आहे. मिरज व जयसिंगपूर लोहमार्गापासून नृसिंहवाडी अनुक्रमे 20 ते 12 कि.मी. अंतरावर येते.

कृष्णेच्या नितांतसुंदर व प्रशस्त घाटावर असलेले सुंदर दत्तपादुका मंदिर विजापूरच्या आदिलशहा या मुसलमान बादशहाने बांधले आहे. गुरुचरित्रात या स्थळाचा अमरापूर म्हणून उल्लेख आहे. येथील वातावरण शांत, गंभीर परंतू रमणीय वाटते. पावसाळ्यात कृष्णेला पूर येतो त्यावेळी हे मंदिर पाण्यात बुडते. श्रींची उत्सवमूर्ती पुजार्यांच्या घरी ठेवली जाते. या ठिकाणी वर्षभर दत्तभक्तांची गर्दी असते. विशेषत: गुरुवार, शनिवार, पौर्णिमा व दत्तजयंतीस मोठी गर्दी असते. नृसिंहवाडीचे पेढे प्रसिध्द असून यात्रेकरु प्रसाद म्हणून ते खरेदी करतात. जवळच शिरोळ येथे दत्तगुरुंचे भोजनपात्र आहे.

लेखन: ज्ञानदीप

माहिती स्रोत: myKolhapur.net