कोल्हापूर म्हणजे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली नगरी. करवीर निवासनी श्री महालक्ष्मीचे स्थान, दक्षिण काशी म्हणून प्रसिद्धीस आलेले हे तीर्थक्षेत्र. कोल्हापूर पासून अवघ्या दहा मिनिटांवर आणि कोल्हापूर-बेळगाव महामार्गापासून 3 कि.मी. अंतरावर कणेरी गावाजवळ एक प्राचीन तीर्थस्थान असलेला कणेरी मठ आहे. हा श्री काडसिद्धेश्वर मठ म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

श्री काडसिद्धेवर मठाचे विद्यमान मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर यांच्या प्ररेणेतून आणि मागर्दर्शनातून ह्या मठाचा परीसर रमणीय आणि प्रेक्षणीय असा आहे. हे प्रथम भेट दिल्यानंतर आपल्याला पहायला मिळतो. शंभू महादेवाचे हे पवित्र स्थान. इथे दररोज महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक तसेच पर्यटक इथे येत असतात. इथे आपल्या समृद्ध संस्कृतीचे आणि ज्ञानसंपदेचे रचनाकार ऋषीमुनी यांचे स्मरण आगळ्या वेगळ्या पद्धतीने होतं. त्यांच्या कार्याचं परीचय करुन देणारे मनमोहक सुंदर शिल्पाने सजलेले असे सिद्धगिरी संग्रहालय होय.

भारतीय संस्कृतीची ओळख भारतीयांना आणि इतर जगालाही व्हावी हा या संग्रहालयाचा उद्देश आहे. यामध्ये दोन भाग आहेत. एक गुंफांमध्ये दाखविले गेलेली हजारो वर्षापूर्वी जगाला खूप मोठे योगदान देऊन भारताचे नाव लौकिक जगभरात केले आणि दुसरे म्हणजे तंत्रज्ञ आणि विज्ञानी आणि शास्त्रज्ञ ऋषीमुनी जे आहेत त्यांची ओळख भारतीयांना आणि नव्यापिढीला व बाहेरच्या जगाला व्हावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले आहेत. यामध्ये कपिल ऋषीपासून शंकराचार्यापर्यंत ज्या मंडळींनी काम केले आहे. या सर्वांची जीवनचरित्रे दाखविण्यात आली आहेत. इथे अणुशास्त्रज्ञासंदर्भात हजारो वर्षांपूर्वी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ भगीरथासारखी मंडळी होऊन गेलेली आहेत. कणाद सारखे अणुशास्त्रज्ञ आणि इतिहास रचनाकार जगात अद्वितीय इतिहास लिहिणारे वाल्मिकी आणि व्यासासारखे महर्षी येथे होऊन गेले. त्याचबरोबर पंचतत्रकार विष्णु शर्मा सारखी मंडळी ज्यांचे ग्रंथ जगातील सहाशे भाषांमध्ये भाषांतरीत झालेली आहेत.

गुहेत प्रवेश करताच आपल्याला सांख्य शास्त्राचे प्रवर्तक सुज्ञ वैदिक ऋषी यांचे दर्शन होते. प्रकृतीही सत्य आणि पुरुषही सत्य हे त्यांनी सांख्य शास्त्रात विशद केलं आहे. ध्यान आणि तपमार्गाचा उपदेश केला. ज्ञानाला रुप दिले. असे हे कपिल मुनी योग मानस शास्त्राचे जनक मानले जातात ते पतंजली, महाभारत हे काव्य ज्यांनी लिहिले ते महर्षी व्यास, जगातील पहिला अणुशास्त्रज्ञ म्हणून कणादाचा उल्लेख केला जातो. अणु पासून पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभुतांनी बनली आहे हा वैज्ञानीक सिद्धांत त्यांनी मांडला. नारद मुनी ज्यांनी संगीत शास्त्रात नव नवीन रागांची निर्मिती केली. भक्तीशास्त्राला सुत्रबद्ध केलं आणि संगितमय केलं. चिरकारीक ऋषी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तिचा खोलवर विचार ते करत. भगीरथ म्हणजे प्राचीन भारतातील श्रेष्ठ अभियंता आपल्या प्रयत्नांतून त्यांनी हिमालयातून गंगेची दीशा बदलून आर्यावर्तात ती आणली. म्हणून तिला भागीरथी म्हणतात. वाल्मिकी ऋषी यांना आदी कवी म्हटले जायचे त्यांनी कौंचवध हे काव्य लिहिले. रामायण तर भारत वर्षात घरोघरी वाचलं जातं. पाणीनी ऋषींनी अष्ठाध्यायी ग्रंथ लिहिला. 14 सुत्रांवर आधारीत हा ग्रंथ आहे. याच ग्रंथामुळे संस्कृत भाषा सुत्रबद्ध झाली. पाणीनीच्या व्याकरण शास्त्राला पतंजलींनी गौरविले आहे.

अध्ययन आणि अध्यापन कशा पद्धतीने करावे हा आदर्श ठरणारे, पाणीनी आणि वाचास्प्ती मिश्रांसारख्या लोकांचे जीवनचरित्र येथे दाखविण्यात आले आहे. त्याचबरोबर खगोलशास्त्रज्ञ वराह मिहीर, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध घेणारे आर्यभट्ट, गणितशास्त्रामध्ये शुन्याचा विकास आणि दशमान पद्धती विकसीत केलेले भास्कराचार्यांची जीवनचरित्रेही इथे पहावयास मिळतात. मटलरजीमध्ये काम करणारे नागार्जुन, आरोग्यशास्त्रात काम करणारे सुश्रुत, वाग:भट, जीवक असतील. हजारो वर्षांपूर्वी पासून या देशात सर्जरी केली जात होती. प्लास्टीक सर्जरी केली जात होती. पोस्ट मार्टम सिस्टीम अस्तित्वात आणणारे सुश्रुतांचे जीवनचरित्रही इथे पाहण्यात मिळते. कश्यप नावाचे महर्षि शिशूचिकित्सा (पिडीयाट्रीक) आणि स्त्रीरोग- प्रसृतीशास्त्र (गायनॉकोलॉजी)मध्ये काम करणाऱ्या लोकांचीही जीवन चरित्रे इथे देखाव्याद्वारे दाखविण्यात आले आहेत. एक राष्ट्र निर्माण करणारे आचार्य चाणक्यासारख्यांचे जीवन चरित्र आणि ऋषी पराशरांसारखे आणि शुरपालासारखे ऋषी आणि बागायतीमध्ये काम करणारे, अशा जवळजळवळ 30 लोकांचे जीवन चरित्र दाखविण्यात आली आहेत. जी बघून आपल्याला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.

लेखक: विलास सागवेकर

माहिती स्रोत: महान्युज