पावसाळा सुरू झाला की प्रत्येकालाच निसर्गसहलीचे वेध लागतात. डोंगरदऱ्यांच्या कपाऱ्यांतून वाट काढत उंचावरून कोसळणारे फेसाळते धबधबे हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. पावसाळा सुरु झाल्याने... वातावरणात कमालीची तफावत जाणवते. या अशा वातावरणात सर्वांचेच सहलीला जाण्याचे नियोजन सुरु झाले आहे. पावसाळी सहलसाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणाच्या शोधात असतो. तर अशा भटकंती प्रेमींसाठी एक दिवसीय सहलीसाठी अत्यंत आल्हाददायक ठिकाण म्हणजे माळशेज घाट.

पुरातन काळापासून प्रसिद्ध

पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील माळशेज घाट हा पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. ढगांना भिडलेल्या उंचच उंच कड्यांवरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि पांढरेशुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्यागार गालिच्यांवर हळूवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणं घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचं असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवं. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचं रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार माळशेज घाटाला ह्या काळात फेसाळत कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांचा साज चढलेला असतो. मुरबाडपासून ५० किमी अंतरावर असलेला माळशेज घाट हा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. माळशेज घाट आणि नाणे घाट असे दोन घाट या भागात असून या घाटांचे वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यालगत धबधबे आणि एका बाजूला खोल दरी अशी या घाटाची रचना आहे. पावसाळ्याचा जोर सुरू झाल्यानंतर या भागातील धबधबे खुले होतात. तेथे पर्यटकांची गर्दी जमते. धबधब्याखाली प्रामुख्याने भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वत:च्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल. माळशेज घाटातल्या रेस्ट हाऊसच्या मागे हरिश्चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससे, घोरपड, मुंगुस अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो.

थिदबीचा धबधबा

पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यातच जावे लागेल.

कल्याण माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावात रस्ता संपतो येथे हॉलिडे रिसॉर्ट झाले आहे. हॉटेलवर गाडी पार्क करून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल. स्थानिक वाटाड्या बरोबर असेल तर धबधब्यापर्यंत आपल्याला जाता येते. धबधब्यावर जाताना पुरेशी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याने अनर्थ टाळता येऊ शकतो.

कसे जाल?

पुण्याहून नाशिक रस्त्याने - चाकण - आळेफाटा - माळशेज घाट = १६० कि.मी

पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. शहापूर वरून किन्हवली सरळगाव मार्गे माळशेज घाटला जाता येते.

पक्षी निरीक्षण

पक्षी प्रेमी आणि अभ्यासकांसाठी आकर्षण म्हणजे येथील पिंपळगाव जोगा धरणामध्ये स्थलांतरित पक्षी येतात.

लेखिका: सिद्धी बोबडे

माहिती स्रोत: महान्युज