सध्याचा शीव-कुर्ला रेल्वे मार्ग, शीव रेल्वे स्टेशनपासून पुण्याकडे जाणारा मुख्य रस्ता व तो रस्ता ज्या ठिकाणी सायन रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याला मिळतो त्या ठिकाणाहून चुनाभट्टीला जाणारा रस्ता यामधील भागात टेकडीवर हा किल्ला आहे.

रिवा किल्ला 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांनी बांधला. पुढे 1665 साली मुंबईच्या बेटांबरोबर रीवाचा किल्लाही ब्रिटिशांच्या ताब्यात आला. 1739 साली मराठ्यांनी साष्टी जिंकल्यानंतर मराठ्यांची सरहद्द ब्रिटिश मुंबईला भिडली. त्यावेळी सरहद्दीच्या संरक्षणाची जबाबदारी माहीम, धारावी, रीवा, शीव उर्फ सायन व शिवडी या किल्ल्यांवर पडली. अर्थात नंतरच्या काळात ब्रिटिश मुंबईवर कोणतेही आक्रमण झाले नाही. उलट ब्रिटिशांच्या साम्राज्यात भर पडत गेली. मात्र ब्रिटिशांच्या सावधपणामुळे निदान दीड दशक तरी हा किल्ला त्याच्या पूर्ण क्षमतेने कार्यरत राहिला. 19व्या शतकात सर्व भारतावर ब्रिटिशांनी सत्ता प्रस्थापित झाली. नंतर विज्ञानातील व तंत्रज्ञानातील प्रचंड प्रगतीमुळे युद्धतंत्राचे स्वरुप पूर्णत: बदलून गेले; किल्ल्यांचे संरक्षण-स्थापत्य म्हणून असलेले महत्त्व नष्ट झाले. परिणामत: काळाच्या ओघात पडझड व किल्ल्याच्या मूळ स्वरुपात बदल होण्यास सुरुवात झाली.

सध्यातरी या टेकडीच्या माथ्यावर असलेला टेहेळणी बुरुड हाच सहजपणे जाणवणारा किल्ल्याचा एकमेव वास्तुघटक आहे. या बुरुजाकडे दोन मार्गांनी जाता येते. एक मार्ग रेल्वे स्थानकातून मुख्य रस्त्याकडे जाण्याच्या मार्गातच डावीकडे आयुर्वेद प्रसारक मंडळाच्या हॉस्पिटलकडे जाण्याच्या मार्गावरच आहे. या मार्गाने थोडे पुढे चढ चढून गेल्यावर डावीकडे झाडीत जाणारी पाऊलवाट धरावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात येथे झाडे अमाप वाढतात. त्यामुळे त्या काळात ही वाट मोठ्या कौशल्यानेच शोधावी लागते. ही पाऊलवाटही साधी सरळ सपाट नाही. कमी उंचीचा (सुमारे 3 ते 4 फूट उंचीचा) कडा मधेच तुटून किंवा तोडून बनवलेल्या मार्गासारखी ही वाट आहे. तिथून पुढे गेल्यानंतर आणखी एक असाच चारी बाजू कड्यासारखा असलेला टेकडीचा आणखी उंच भाग लागतो. या भागाच्या एका कडेतूनच वर जाणाऱ्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या नैसर्गिक भाग खोदूनच बनवल्यासारख्या असून व्यवच्छेदकपणे प्रत्येक पायरी निराळी ओळखता येत नाही.

या वाटेने वर गेल्यानंतर टेकडीचा माथा लागतो. या माथ्याच्या दक्षिणेच्या बाजूला एक बुरुजासारखा वास्तुघटक लागतो. आसपासच्या स्थितीची व बुरुजाची पाहणी केली तर हा बुरुज कोणत्याही तटाला जोडून नव्हता हे अगदी सहजपणे लक्षात येते. म्हणूनच या बुरुजाला टेहेळणीचा बुरुज असे संबोधले जाते.

या टेहेळणीच्या बुरुजाकडे जाण्याचा दुसरा मार्ग पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सायनजवळ चुनाभट्टीकडे जाण्याकडे जो रस्ता लागतो त्या रस्त्यावरुन आहे. या चुनाभट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उत्तरेला एक जुने तळे आहे व या तळ्यासमोरच पण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बुरुजाकडे जाणाऱ्या मार्गाला सुरवात होते. हा मार्ग वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वारस्यपूर्ण आणि त्याचवेळी काहीसा बुचकळ्यात टाकणाराही आहे. कारण या मार्गावरुन जाताना टेकडीच्या पायथ्याच्याच पातळीवर एक दरवाजा लागतो. हा दरवाजा अगदी पोर्तुगीज पद्धतीशी मिळताजुळता, म्हणजेच व्याघ्रमुखी आहे. हा दरवाजा ज्या भिंतीत आहे ती भिंत विटांची असली तरी तटबंदीसारखी वाटते. हीच भिंत टेकडीजवळ जाऊन टेकडीला वळसा घालत असल्यासारखी वाटते. अगदी आजही रस्ता आणि हा टेकडीचा भाग (सर्व टेकडीचा भाग) यांना विभक्त करणारी जी सीमाभिंत आहे ती सर्वसाधारणपणे 4 ते 7 फूट उंचीची आहे व आतील जमिनीची पातळी या सीमाभिंतीच्या उंचीच्या पातळीवर आहे. हा दरवाजा ओलांडून आत गेल्यावर काही पायऱ्या चढून वर गेल्यानंतर दुतर्फा आधुनिक काळातील घरे लागतात. थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला वर जाणाऱ्या घडीव पायऱ्यांचा मार्ग लागतो. या पायऱ्यांना दोन्ही बाजूंनी कठडे आहेत. हे कठडे मुंबईतील इतर अन्य ब्रिटिश किल्ल्यातील पायऱ्यांच्या कठड्यांसारखे आहेत. या पायऱ्या चढून वर गेल्यावर एक सपाट भाग लागतो व त्यापलीकडे टेकडीचा उंच भाग लागतो. या सपाट भागातून आधी वर्णन केलेल्या पायवाटेकडे जाता येते.

सद्य:स्थितीत हा किल्ला ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीच्या माथ्यावर असलेला टेहेळणी बुरुजच काय तो शिल्लक आहे. किल्ल्याच्या बाकीच्या घटकांचा फक्त अंदाजच बांधावा लागतो. टेकडीच्या पायाजवळच्या भागात वस्ती व आयुर्वेदिक महाविद्यालयाची इमारत आहे पण टेकडीच्या मध्यापासून माथ्यापर्यंत झाडे झुडुपे वाढलेली आहेत. खुद्द टेहेळणी बुरुजाजवळच एक मोठे झाड वाढलेले आहे. त्यामुळे या बुरुजाची नीटपणे पाहणीही करता येत नाही.

मात्र एकदा का माथ्यावर गेले की पश्चिमेकडील भागाचे विहंगम दृश्य दिसते. अगदी माहिमपर्यंतचा परिसर या ठिकाणाहून दिसतो. हे दृश्य पाहिल्यानंतर एकेकाळी टेहेळणीच्या व संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याची निर्मिती अत्यंत उपयुक्त ठरली असणार याबाबत शंका उरत नाही.

लेखन - संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

स्त्रोत : महान्युज