उन्हाळ्या संपल्यावर सगळेजण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. वरुणराजाही बरसला. सर्वांनाच पावसाच्या येण्याने आनंद झाला आणि मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले. वातावरणातील गारव्यामुळे सर्वजण सुखावले आहेत. अशा या चिंब पावसात भिजायला अनेकांना आवडते. अशात मुंबईकरांना वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे.

कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. त्यातीलच लवकरात लवकर सहलीला जाण्यासारखं ठिकाण म्हणजे लोणावळा, खंडाळा या दोन्ही ठिकाणामध्ये ५ कि.मी.इतकेच अंतर आहे. उंच डोंगरमाथ्यावर वसलेली लोणावळा आणि खंडाळा ही स्थाने अत्यंत आल्हाददायक आहेत. थंड हवामान आणि पावसाळ्यामध्ये पांघरणाऱ्या हिरव्यागार गालीच्यांसाठी ती सुप्रसिद्ध आहेत.

लोणावळा पुण्यापासून ६४ कि.मी तर मुंबईपासून ९६ कि.मी. अंतरावर आहे.लोणावळा चिक्की आणि ‘फज’ या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातील एक राजमाची पॉइंट, लोणावळ्यापासून साधारण साडेसहा कि.मी. अंतरावर असलेलं एक सुंदर ठिकाण म्हणजे राजमाची पॉइंट जेथून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध राजमाची किल्ला आणि आसमंतातील दऱ्याखोऱ्यांचा नयनरम्य देखावा पाहता येतो.

टायगर्स पॉइंट

वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप या स्थानाला टायगर्स पॉइंट या नावानेही ओळखले जाते. या शिखर माथ्यावरून तुम्ही ६५० मी.ची खोल दरी आणि कडा पाहू शकता की जो एक विशाल देखावा असतो. आय. एन. एस. शिवाजीपर्यंत बसेस उपलब्ध आहेत. तेथून साधारणपणे दीड किमी चे अंतर मात्र पायीच कापावे लागते. टायगर्स लीपच्या जवळच पावसाळ्यात वाहू लागणारा एक छोटासा धबधबा आहे. भुशी धरणापेक्षाही पाण्यात भिजण्याचा आनंद येथे अधिक लुटता येतो कारण येथे पाण्याचा प्रवाह अधिक जोरदार आहे. लोणावळ्यापासून १२ कि.मी.अंतरावर असणाऱ्या ‘ड्यूक्स नोज’ या स्थानालाही तुम्ही भेट देऊ शकता. नाकाच्या आकाराचे हे शिखर ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या नावाने ओळखले जाते. हायकींग आणि ट्रेकिंग करणाऱ्या पर्यटकांमध्ये ‘ड्यूक्स नोज’ लोकप्रिय आहे.

रायवूड पार्क

सहलीसाठी लोणावळ्यातील रायवूड पार्क हे एक सुंदर ठिकाण आहे. भरपूर वृक्षराजी असलेले हे एक मोठे उद्यान आहे. उद्यानामध्ये शंकराचे एक मंदिर आहे. वळवण धरण ज्याच्या पायथ्याशी मोठे उद्यान आहे हे सुद्धा पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.

विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, हिरवेगार डोंगरमाथे जणूकाही या डोंगरांनी हिरवे गालिचेच पांघरले आहेत. पावसाळ्यात धो-धो कोसळणारे धबधबे, दऱ्या हे सारं काही मनाला सुखद वाटते म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.

पावसाळ्यात हौशी पर्यटक लोणावळा-खंडाळा भागात पावसात भिजत, चालत फिरतात. कार्ल्याची व भाजे येथील लेणी, एकवीरा देवीचे स्थान, राजमाची व लोहगड किल्ले ही ठिकाणेही येथून जवळ आहेत. तसेच भुशी धरण, वळवण धरण ही धरणेसुद्धा येथून जवळ आहेत

चला तर मग मित्र-मैत्रिणीसोबत किंवा आपल्या परिवारासोबत या पावसाचा आनंद लुटण्यास आणि वन डे पिकनिकसाठी जाण्यास तयार व्हा...

जाण्याचा मार्ग

मुंबईपासूनचे अंतर १५४ कि.मी. आहे.

रेल्वे

मुंबईपासून लोणावळा २.३० तासांवर आहे.

रस्ता

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाने मुंबईहून लोणावळ्याला दोन ते तीन तासात पोहचू शकता. पुणे ते दादर जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या आणि एशियाड बसेस लोणावळ्याला थांबतात.

लेखक- सिद्धी बोबडे

माहिती स्रोत:महान्युज