मुंबईतील शीव (सायन) येथे पुण्याला जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेस अगदी लागूनच असलेल्या टेकडीवर हा किल्ला आहे.

मुंबई आणि साष्टी बेटाची सरहद्द म्हणजेच शीवचा भाग. मुंबई बेटे ताब्यात आल्यानंतर पोर्तुगीजांनी येथे किल्ला बांधला. पुढे मुंबई बेटाच्या हस्तांतरणाच्या वेळी हा किल्लाही ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. मुंबई बेटे ब्रिटीशांच्या ताब्यात आली तरी साष्टी बेटाचा ताबा मात्र पोर्तुगीजांकडेच होता. त्यामुळे 1740 साली मराठ्यांनी उत्तर कोकणातून पोर्तुगीजांचे उच्चाटन करेपर्यंत शीव ही ब्रिटीश आणि पोर्तुगीज प्रदेशाचीही सरहद्द होती. पोर्तुगाल आणि ब्रिटन यांचे राजघराण्यातील लग्नसंबंध झाले तरी भिन्न धर्मपंथांमुळे व व्यापारी स्पर्धेमुळे भारतातील पोर्तुगीज आणि इंग्रजांमध्ये तेढ होती. म्हणूनच सरहद्दीवरील अत्यंत मोक्याचा किल्ला होता.

1739 साली मराठ्यांनी वसई, साष्टी इत्यादी पोर्तुगीज प्रदेश जिंकून घेतल्यानंतर मराठा साम्राज्याची सरहद्द अगदी मुंबई बेटांजवळ येऊन ठेपली. त्यामुळे त्याकाळात जे दक्षतेचे उपाय योजण्यात आले त्यात या किल्ल्याच्या बळकटीचा आणि तो सुसज्ज करण्याच्या कार्यवाहीचा समावेश असणार. पण त्यानंतर अवघ्या 34 वर्षात मराठेशाहीचा ऱ्हास होऊन साष्टी बेट ब्रिटीशांच्या ताब्यात आले. त्यानंतर इ.स. 1818 मध्ये पेशवाई बुडाली व ब्रिटीशांचा भारतातील एक प्रबळ सत्ता म्हणून उदय झाला. त्यानंतर एकंदरीत वास्तुप्रकाराचे महत्त्व ओसरले आणि हे किल्ले दुर्लक्षित होऊन त्याची पडझड होण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला.

हा किल्ला एकेकाळी मुंबई द्वीपसमूहाच्या सीमेवर होता. शीवच्या बेटानंतर खाडी होती व त्यापलीकडे साष्टी बेट होते. इ.स. १७३४ पर्यंत साष्टी बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात व नंतर इ.स.१७७४ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होते. निराळ्या शब्दात इ.स. १७७४ पर्यंत मराठेशाही - ब्रिटिश - सरहद्दीवरील ठाणे म्हणून या किल्ल्याने मोलाची भूमिका बजावली आहे.

किल्याचा वास्तुशास्त्रीयदृष्ट्या विवेचन करावयाचे झाल्यास या किल्ल्याची बाह्यतम तटबंदी सर्व बाजूंनी शिल्लक नाही. किल्ल्याच्या दक्षिण व आग्नेय भगातील तटबंदी पडून गेली असली तरी पश्चिमेकडील व उत्तरेकडील बाह्यतम तटबंदी बऱ्यापैकी टिकूनआहे. आज किल्ल्यावर जाण्याचा मार्ग टेकडीच्या दक्षिणेकडून असून आधुनिक काळात बांधलेल्या पायऱ्या असे या मार्गाचे स्वरुप आहे.

आज किल्ल्यावर जाण्याचा मार्ग टेकडीच्या दक्षिणेकडून असून आधुनिक काळात बांधलेल्या पायऱ्या असे या मार्गाचे स्वरुप आहे. पावसाळ्यात टेकडीवर साठलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी तीव्र उतार असलेला निचरा मार्ग मोझॅक टाईल्सच्या तुकड्यांनी बांधण्यात आला असून कृत्रिम धबधबा असे त्याचे वर्णन केल्यास चुकीचे ठरणार नाही. टेकडीच्या माथ्याच्या खालच्या भागात एक सिमेंटची कमान बांधलेली आहे. किल्ल्यावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग किल्ल्याच्या जवळच या निचरा मार्गाच्या पूर्वेला पुढे किल्ल्याला जोडतो.

लेखन - संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

स्त्रोत : महान्युज