समुद्राची सफर कुणालाही आवडणारी अशीच...अनेकजण लहान बोटीमध्ये बसले असतील...तासाभराची सफर केली असेल. मात्र मोठ्या जहाजात बसण्याची हौस अपुरी असते. प्रत्येकाला जहाजाविषयी खूप आकर्षण असते. ते पाण्यावर कसं चालतं...एवढं वजन कसं पेलवतं...त्यात अवाढव्य साहित्य, सामान कसं वाहून नेलं जात असेल....असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते...समुद्र सफरीचा आभास व याचं निरसन झालं...; मंत्रालयातील त्रिमूर्ती भवनच्या प्रांगणात अँग्लो वेस्टर्न मेरीटाईम अकादमीच्या वतीन आयोजित प्रदर्शनातून...

देशात केंद्र सरकारचे नाविक दल आणि मर्चंट नेव्ही असे भाग आहेत. शिवाय खासगी मर्चंट नेव्हीही आहे. अनेकांना मर्चंट नेव्हीविषयी आकर्षण असते. आपल्यापैकी अनेकांचे नातवाईक यात नोकरीलाही असतील. मर्चंट नेव्ही ही मालक-प्रशासन-कामगार प्रतिनिधींची एक संस्था आहे, ‘नॅशनल मेरीटाईम डे सेलिब्रेशन कमिटी’. ही कमिटी सर्वसामान्यांना मर्चंट नेव्हीविषयी माहिती व्हावी याविषयी कार्यरत आहे. या नेव्हीचे काम कसे चालतं...? माल कसा ने-आण केला जातो...? जहाजाविषयीची माहिती व्हावी म्हणून प्रत्येकवर्षी 25 जून हा नाविक दिवस (सी-फेरर डे) साजरा केला जातो. या दिनानिमित्त गेल्या दोन दिवसापासून (27 ते 28 जून) मंत्रालयाच्या प्रांगणात हे माहितीपर प्रदर्शन सुरू होते. मुलींनी सर्व क्षेत्रे पादाक्रांत करण्यास सुरूवात केली आहे. मर्चंट नेव्ही या क्षेत्रात त्या मागे नाहीत, इथं मुलांबरोबर मुलींनाही भरती करून घेतलं जात आहे.

मंत्रालयाच्या मुख्य गेटवरून प्रवेश केल्या-केल्या मोकळ्या प्रांगणात पाण्यातील जीवरक्षकाचा पोशाख घालून उभा असलेला पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यामुळे आपोआपच येणाऱ्यांची पावले तिकडे वळत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय आहे...याची उत्सुकता ताणलेली होती. अधिकारी व कर्मचारी डोकावून जात होते. वेळ मिळेल तेव्हा किंवा जेवणाच्या सुटीत प्रदर्शनाला गर्दी होत होती. पहिल्या दिवशी प्रदर्शन पाहिल्यानंतर मुंबईतील अनेक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जणू काही जहाजातून समुद्राची सफर करून आल्यासारखे समाधानी होते.

प्रदर्शनाच्या गेटवर नाव, हुद्दा, संपर्क नंबर लिहून आत जायचे होते. मंगळवारी जाता आले नाही, म्हणून बुधवारी महान्यूजचे सहकारी प्रदर्शन सहायक सुनील डुंभेरे यांच्याबरोबर मर्चंट नेव्हीचे प्रदर्शन पाहण्यास गेलो. तिथे कॅप्टन आर. गोपालकृष्णन व खलाशी न्याय हक्क संघटनेचे अक्षय बिरवाडकर यांनी आम्हाला जुजबी माहिती दिली. मर्चंट नेव्हीच्या एका जहाजावर साधारणपणे कॅडेट, इंजिनिअर, क्रू (खलाशी) आणि जहाजप्रमुख (कॅप्टन) असे मिळून वीसजण असतात. इथं प्रत्येक जहाजाची प्रतिकृती, जहाजावर चढ-उतार करण्यासाठी लागणारे साहित्य, जहाजामधील काही भागांचे प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. प्रत्येक प्रदर्शनाच्या ठिकाणी तज्ज्ञ डेक कॅडेट माहिती देण्यासाठी उभे होते.

पहिल्यांदा आम्ही ‘कार्गो होल्ड’ याठिकाणी गेलो. तिथल्या कॅडेटने ‘कार्गो होल्ड’ आणि ‘बल्क कॅरिअर’बद्दल माहिती दिली. हा जहाजाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. याच भागात धान्य, सुटे साहित्य आदी पॅकिंगशिवाय ठेवता येतात. शिवाय जहाजाला स्थिर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. धान्याचा व्यापार व माल कसा जहाजात चढवितात, उतरवितात याचीही माहिती इथं मिळाली.

त्यानंतर ‘कंटेनर गॅन्ट्री क्रेन’ याची माहिती घेतली. याचा उपयोग अवाढव्य सामान व माल उचलण्यासाठी होतो. ‘सेफ मुरिंग ऑपरेशन’चा वापर जहाज स्थिर ठेवण्यासाठी किंवा पार्किंग करण्यासाठी होतो. ‘टेलेग्राफ’ हा एक महत्वाचा पार्ट आहे. हे जहाजाचे गिअर आहेत. याद्वारे जहाजाचा वेग कमी-जास्त केला जातो. गती किती ठेवावी, याचा संदेश इंजिन कंट्रोलपर्यंत पोहोचविण्यासाठीही याचा वापर होतो.

‘अँकर’ हा सागरामध्ये काही ठिकाणी जास्त जहाजे असतील किंवा गर्दी असेल तर वेटिंग पार्किंग करण्यासाठी याचा वापर होतो. याचबरोबर एलएनजी टँकर (Liquefied Natural Gas) गॅसची ने-आण करण्यासाठी असतात. ‘कार कॅरिअर’चा वापर हा कारची ने-आण करण्यासाठी होतो. एकावेळी यातून आठ ते नऊ हजार कारची वाहतूक केली जाते. ‘गँग वे’ हा अचानक काही प्रसंग उद्भवला तर जहाजातून खाली उतरण्यासाठी व चढण्यासाठी झोपाळा टाईप मार्ग असतो. यातून एकावेळी फक्त तीन व्यक्ती जावू शकतात. जहाजाला योग्य मार्ग दाखविण्यासाठी महत्वाचे म्हणजे चार्ट (नकाशे). हे जहाजाचे कान-नाक-डोळे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण समुद्रातून जाण्यासाठी मार्ग महत्वाचा आहे. कुठे खडक आहे...कुठे धोका आहे...कोणीकडून जावे हे समजण्यासाठी नकाशे महत्वाचे आहेत. हे पाहण्यासाठी चार-चार तासाची शिफ्ट आहे. परदेशातील जहाज आल्यानंतर आपल्या देशातील ‘त्या’ बंदराशी संपर्क करून एक तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन जातात.

त्यानंतर ‘लाईफ सेव्हिंग ॲप्लाईन्सेस’ याकडे गेलो. यात कंपास (दिशा समजण्यासाठी), लाईन थ्रोईंग अपारेटस, ‘मॅन ओव्हरबोर्ड मार्कर’, ‘रॉकेट पॅराशूट’ (धोक्याचा इशारा देण्यासाठी), मिरर, ‘रेड हॅन्ड फ्लेवर’, टेलिफोन, ‘ईपिर्ब’ (धोक्याचे सिग्नल पाठविण्यासाठी), ‘सिग्नल ऑरेंज स्मोक’ (रात्री संकटसमयी), ‘सार्ट’ (संकटसमयी दुसऱ्या जहाजाची माहिती घेण्यासाठी), ‘नॅवटेक्स रिव्हर’ (संदेशासाठी) आणि ‘नेव्हिगेशन लाईट’ (बत्ती) याविषयी माहिती घेतली. छोटी-छोटी उपकरणे होती, मात्र त्यांचा उपयोग ऐकल्यानंतर त्यांचे महत्व समजले.

शेवटचा टप्पा हा लाईफ बोट आणि विविध मिटरचा होता. ‘फॉग हॉर्न’ हा सिग्नल देण्यासाटी व जहाजाची दिशा दाखविण्यासाठी वाजविला जातो. ‘बॅरोग्राफ’ हा हवेचा दाब सात दिवसाच्या अगोदरचा दाखवितो तर ‘बॅरोमीटर’ हा त्या दिवशीचा दाब दाखवितो. ‘ॲनेमो मीटर’ हा सद्यस्थितीत हवा किती चालू आहे पाहण्यासाठी आहे. शिवाय ‘क्रोनोमीटर’ हे घड्याळाचे काम करते तर ‘सेक्सटंट’ हे जहाजाचे लोकेशन पाहण्यासाठी उपयोगी पडते.

महत्वाचे म्हणजे जहाजावर संकट आले...आग लागली...आपत्कालिन स्थितीसाठी लाईफ बोट आहे. यात एका बोटीमध्ये एकावेळी 25 व्यक्ती बाहेर पडू शकतात. यात प्रथमोपचार, खाण्याचे साहित्य, हवेसाठी ऑक्सिजनची सोय असते. या प्रदर्शनातील प्रॅक्टिकल पाहून थेट मर्चंट नेव्हीच्या जहाजातून प्रवास केल्याचा भासच अनेकांना झाला. प्रत्येकजण प्रत्येक वस्तूकडे कुतूहल म्हणून पाहत होते. माहिती जाणून घेत होते. कॅडेटही सर्वांना जहाजाची प्रक्रिया समजावून देत होते तेही स्वखुशीने... आपल्यालाही मर्चंट नेव्हीचे आकर्षण वाटू लागले असेलच.

लेखक-धोंडिराम अर्जुन

माहिती स्रोत: महान्युज