सातारा जिल्हयातील कोरेगाव आणि वाई तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चवणेश्वर डोंगराला ऐतिहासिक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्याचा पाया महान तपस्वी च्यवनॠषी यांनी घातलेला आहे. कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर वसलेले हे गाव असून गावच्या पुढील व मागील बाजूस कडा असल्याने इंग्रजी आठ अक्षरात हे गाव वसले आहे. या गावच्या महिला सरपंच म्हणून नीता पवार या काम पहात आहेत.समुद्र सपाटीपासून 1300 मीटर उंचीवर असणाऱ्या या डोंगरामध्ये अनेक औषधी वनस्पती आढळून येतात. निसर्गरम्य परिसर लाभल्यामुळे या ठिकाणी पर्यावरणपूरक व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. या डोंगरावर पवनउर्जा प्रकल्पाची उभारणी झाल्यामुळे गावच्या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्याची स्थापना करण्यासाठी चवणेश्वरच्या कडया कपाऱ्यातील मावळयांनी छातीचा कोट करुन लढाई जिंकली याची इतिहासात नोंद आहे. त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्य लढयात भूमिगत झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना चवणेश्वरकरांनी मोठी मदत केली होती. आजही स्वातंत्र्य लढयाच्या आठवणी जुने जाणते चवणेश्वरकर अभिमानाने सांगत आहेत. गावात प्रवेश करतानाच ग्रामपंचायतीचा फलक दिसतो.रस्त्यांच्या दुतर्फा केलेले वृक्षारोपन आणि घटांवर लिहीलेली प्रबोधनात्मक घोषवाक्ये लक्ष वेधून घेतात. तब्बल 110 वर्षापासून अनेक घटनांचा साक्षीदार असणारा येथील पोलीस पाटलांचा वाडाही लक्ष वेधतो. चवणेश्वर मंदिराकडे जातानाच एक मोठे तळे लागते. मंदिराच्या दारात एक मोठी विहीर आणि तिच्या लगतच एक छोटा आड (बारव)आहे. या दोन्ही ठिकाणचे पाणी अत्यंत थंडगार आहे. समोरच भूर्गभातील घडामोडींचे साक्षीदार असणारे दोन मोठे दगड आहेत. या दगडांचे वैश्ष्टिये म्हणजे या दगडांवर छोटया दगडाने मारले असता, धातुवर मार बसल्यानंतर होणारा टणत्कार ऐकू येतो. जवळच दगडात कारेलेले दगडी पात्र आहे. मंदिराच्या समोर दगडी न्रदी आणि दोन्ही बाजूला दगडी शिल्प कला कोरलेल्या दोन शिळा आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यत दगडी मूर्ती आहेत. गाभाऱ्यात मूळ दगडी खांबांवर अधारीत मंदिर उभे असून त्याच्यावरील कोरीव काम सुदर आहे. मंदिर परिसरात अनेक देवतांच्या प्राचीन दगडी मूर्ती व शिळा आहेत. भृगृश्रुषींनी कृष्णा काठच्या परिसरात तपश्चर्या केली तर त्यांचे पुत्र असलेल्या च्यवॠषींनी आयुर्वेदामध्ये खूप मोठी मजल मारली. च्यवॠषींनीच या ठिकाणी तपश्चर्या करुन कर्नाटकात जावून समाधी घेतली. चवणेश्वर येथे असताना अनेक वनौषधींचा शोध च्यवॠषींनी लावला. आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चव्यवनॠषींनीच या ठिकाणी च्यवणप्राशची निर्मिती केली. चवणेश्वरचा झरा आजही शुध्द पाण्याचा झरा म्हणून सातारा जिल्हयात परिचित आहे असे बोलले जाते.हे पाणी तीर्थ म्हणून अनेक भक्तगण आजारी माणसांसाठी घेवून जातात. हे पाणी पिल्याने आजारी माणसाचा आजार दूर होतो. अशी त्यांची श्रध्दा आहे. चवणेश्वर परिसरात उन्हाळयामध्ये फारसा उन्हाळा जाणवत नाही. तसेच येथील हवामान हिवाळयात सुध्दा शरीराला त्रासदायक ठरत नाही. याठिकाणी असलेली ऐतिहासिक गुहा आज इतिहासाची साक्ष देत आहे. या गुहेमध्ये पूर्वी पाच ॠषीमुनींनी गहन तपश्चर्या केली होती. सध्या या गुहेच्या तोंडावर मोठी शीळा बसवली आहे. या परिसरात अशा अनेक गुहा आहेत. चवणेश्वरच्या डोंगरावर श्री. चवणेश्वर, महादेव, जानुबाई ही तीन मंदिरे असून गावापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलात श्री. केदारेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पांडव कालीन असल्याचे सांगितले जाते. याठिकाणी वर्षभर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. विशेषत: दर रविवारी, सोमवारी, अमवस्या, पोर्णिमेला याठिकाणी मोठी गर्दी असते. अश्विन महिन्यातील चौथ्या शनिवार व रविवार येथे वार्षिक यात्रा भरते. गुळुंब, वरखडवाडी, वाण्याचीवाडी, करंजखोप, रणदुल्लाबाद, सोनके, मोरबेंद, हिवरे आदी गावांमधून मानाच्या सासनकाठया याठिकाणी येत असतात. या सासनकाठयांची भेट हेच यात्रेचे मुख्य आकर्षण असते. याठिकाणचे महात्म्य व निसर्गसौंदर्य यामुळे दिवसेंदिवस याठिकाणी येणाऱ्या भविकांची संख्या वाढू लागली आहे. व्यवसायानिमित्त याठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होते. तसेच पशुहत्येला पूर्ण बंदी घातली जाते. अनिष्ट रुढी, पंरपरा नाही एवढेच नव्हे तर यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रमही ठेवण्यात येत नाही. भाविक याठिकाणी भेट देत असतात. ते केवळ देवाच्या महतीमुळे. गावाची माहिती सन 2000 साली पर्यटनस्थळ क वर्ग दर्जा मिळाला, तपस्वी चव्यवनॠषींची तपोभूमी म्हणून ओळख, पांडवकालीन मंदिरे, गुहा, लेण्यांसाठी प्रसिध्द, यात्रेदिवशी मंदिराशेजारील आंब्याच्या झाडाला आंबे येतात अशी अख्यायिका, समुद्रसपाटीपासून सुमारे 1300 मीटर उंचीवर, वनराईने नटलेला समृध्द परिसर, विविध प्रकारच्या वनऔषधींसाठी प्रसिध्द ठिकाण, चव्यवनॠषींच्या वास्तव्यामुळे चवणेश्वर हे नाव पडले. गावात राबविलेल्या विविध योजना सौरउर्जेवर आधारित दुहेरी हातपंप बंदिस्त गटर योजना, पर्यटनस्थळ विकासासाठी डीपीसीतून विधि कामे, प्राथमिक शाळा, डीपीसीतून अंगणवाडी इमारत, शिवकालीन पाणीसाठवण योजना , पर्यावरण समृध्दी गाव योजनेतून विविध कामे, पाणलोट प्रकल्पांतर्गत विविध कामे, वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम. गावाला मिळालेले विविध पुरस्कार शासनाचा तंटामुक्त ग्राम पुरस्कार, शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार, पर्यावरण समृध्दी ग्राम योजनेत भरीव कामगिरी, महसूल व ग्रामपंचायत करवसुली दरवर्षी 100 टक्के. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी याठिकाणी झली आहे. आगामी काळातही शासकीय योजना या गावात मोठया प्रमाणात राबवण्याचा निर्धार सौ. नीता पवार यांनी व्यक्त केला आहे. लेखक - प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, सातारा स्त्रोत: महान्यूज